हंपीमधले अजून एक भव्य पण अगदीच कोपऱ्यात असणारे "अच्युतराय मंदिर ' आहे .
प्रसन्न वीरूपाक्षाचे दर्शन घेऊन रिक्षाने पुन्हा मुख्य विरुपाक्ष मंदिराजवळ पोहचलो .आणि थेटच अच्युतरराय मंदिर पाहण्यासाठी तुंगभद्रा नदीच्या काठेने पुढे निघालो.
"चक्रतीर्थ घाट "
तिथेच त्या नदीवरील नैसर्गिक घाटाचे नाव आहे "चक्रतीर्थ घाट "या नावामागे दोन वेगवेगळ्या आख्यायिका आहेत.
येथे भगवान शिवाने विष्णूला सुदर्शन चक्र दिले होते, अशी आख्यायिका आहे.
तर 'चक्रतीर्थ' म्हणजे 'पाण्याचे पवित्र आवर्तन' तुंगभद्रा नदी विरुपाक्ष मंदिराच्या जवळून पूर्वेकडे वाहते आणि सुमारे एक किलोमीटर पुढे जाऊन उत्तरेकडे एक तीव्र वळण घेते. नदीचे हे जवळजवळ ९० अंशांचे वळण,ज्यामुळे अनेक भोवरे आणि अधोप्रवाह निर्माण होतात. ज्या कोपराच्या वळणावर नदी पूर्वेकडून उत्तरेकडे आपली दिशा बदलते,त्याला चक्राकार वळण जाणून याचे नाव चक्रतीर्थ असे पडले .
कोदंड राम
पुढे चढ चढून जात असतांना उजवीकडे कोदंड रामाचे मंदिर आहे.या मंदिरात अजूनही पूजा होते हे समाधानकारक होते. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे, चक्रतीर्थ नावाच्या पवित्र स्नानघाटासमोर काही पायऱ्या चंदन वर गेल्यावर आहे.गर्भगृहात एका एका मोठ्या नैसर्गिक खडकातून कोरलेल्या राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या उंच सुमारे १५ फूट -मूर्ती आहेत.
राम धनुष्य म्हणजेच कोदंड धरलेल्या मुद्रेत आहेत, म्हणून नाव कोदंडराम- धनुष्यधारी राम.
काही कथेनुसार सुग्रीवही रामासमोर वाकलेला दाखवला आहे.रामायण कथेनुसार हे ठिकाण किष्किंधा राज्याशी जोडलेले आहे.
भगवान राम सीतेला शोधत हम्पी -किष्किंधाप्रदेशात आले.सुग्रीवाने वालीशी युद्ध करण्यासाठी रामाची मदत मागितली.रामाने वालीला मारले आणि लक्ष्मणाने सुग्रीवाला किष्किंधेचा राजा म्हणून अभिषेक केला.या घटनेच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले गेले असल्याचे मानले जाते.काही स्थानिक कथांनुसार रामाने सुग्रीवाला राज्याभिषेक केल्याचे ठिकाण हे आहे.तर सुग्रिव याने ही मूर्ती बनवून घेतल्याची धारणा आहे .
पावसाळ्यात तुंगभद्रा नदीचे पाणी मंदिरापर्यंत पोहचते .
यंत्रोद्धारक हनुमान
या मंदिराच्या वरच्या बाजूलाच हंपीतील यंत्रोद्धारक हनुमान मंदिर आहे.श्री व्यासराज (१४४७–१५३९) हे विजयनगर साम्राज्याचे राजगुरू होते. ते कृष्णदेवराय यांचे गुरू होते. ते चार राजांच्या काळात राजगुरू म्हणून राहिले.
ते द्वैत दर्शनाचे महान विद्वान होते आणि पुरंदरदास, कनकदास यांचे गुरूही होते.हनुमान भक्तीचा प्रसार: व्यासराज यांनी ७३२ हनुमान मूर्ती दक्षिण भारतात स्थापित केल्या. यातील बहुतेक वीर हनुमान (वीर मुद्रेत) होत्या.
व्यासराज यांनी ७३२ जैन विद्वानांना शास्त्रार्थात हरवले आणि प्रत्येक विजयानंतर एक हनुमान मूर्ती स्थापित केली.राज्यात हिंदू धर्माचे रक्षण आणि लोकांच्या मनोबल वाढवण्यासाठी वीर हनुमान पूजेला प्रोत्साहन दिले.
हंपीत यंत्रोद्धारक हनुमान मंदिर चक्रतीर्थ जवळ हे व्यासराज यांनी स्थापित केले.यामागची कथा अशी कि,व्यासराज रोज खडकावर कोळशाने हनुमानजींचे चित्र काढायचे, पण ते नाहीसे व्हायचे. १२ दिवसांनी हनुमानजी प्रकट झाले आणि षट्कोण यंत्र मध्ये स्वतःला बांधून (यंत्रोद्धारक) स्थापित करण्यास सांगितले.
ही मूर्ती पद्मासन या योग मुद्रेत बसलेल्या अवस्थेत आहे.
कंपा भूपाचा मार्ग
या दोघांचे दर्शन घेऊन पुढे अच्युतराय मंदिराकडे निघालो .पण आता गडबड झाली.मंदिर उजवीकडे होते.पण कोण जाणे कशी मी वळाले डावीकडे !! आणि तिथे पहिल्यादा दिसले "वराह मंदिर" ! भव्य प्रवेशदाराच्या आतच विजयनगरचे राजचिन्ह असलेले वराह चिन्ह मोठ्या आकारात कोरलेले भिंतीवर दिसले.मंदिर छोटे आणि साधे आहे परंतु हे मंदिर वराह कि विष्णू मंदिर या बाबत मतभेद आहेत.
पुढे चालत राहीले अच्युतराय मंदिर का येईना हे कळेना .मग हा मार्ग जरा चढ़ायाकडे जातो त्या आधी अजून एक मंदिर आहे .ज्याला काही पायऱ्या दिसतात .या भागात अजिबात वर्दळ नव्हती जी मला वेरूळच्या अगदी कोपर्यातल्या अशाच कमी व वर्दळीच्या जैन मंदिरांची आठवण करून देत होती .हे मंदिर कोणते हे ओळखू शकले नाही .आता अजून पुढे गेल्यावर एक दुमजली देखरेख करायला असलेले गेट (Two Storied Gateway) दिसले .समोरून एक जण येत होता ,त्याला विचारले इकडे पुढे काय आहे ? तो म्हणाला "विठ्ठल टेम्पल"!!
हाय राम तर मी थेट विठ्ठल मंदिराच्या जवळ पोहचले होते तर ....पण मला विठ्ठल मंदिर अगदी निवांत पाहायचे होते ,आणि आता वाजले होते चार ! म्हणून पुन्हा मागे फिरले.नंतर नेटवर शोधल्यावर समजले की मी आता जो इतका मोठा मार्ग चालत आले त्याला म्हणतात "कंपा भूपाचा मार्ग"!!
हा हम्पीमधील एक ट्रेक मार्ग आहे, जो त्याच्या आकर्षक खडकाळ भूभागासाठी ओळखला जातो. हा सुमारे २ किलोमीटर लांबीचा ट्रेक मार्ग आहे. हा ट्रेक मार्ग हम्पी बाजारापासून सुरू होतो आणि प्रसिद्ध विठ्ठल मंदिराच्या जवळ संपतो.ज्यात वराह मंदिर,नदीकाठच्या १०८ शिवलिंग रांगा नरसिंह मंदिर,सुग्रीव गुहा आहे.ज्यातील मी फक्त वराह मंदिर आणि नरसिंह मंदिर पाहू शकले .
अच्युतराय मंदिर/तिरुवेंगलनाथ मंदिर
आता पुन्हा अच्युतराय मंदिर कोठे आहे हे पाहत मागे त्याच मार्गाने निघाले.आता जरा धावतच सुटले.अखेरीस डावीकडे भव्य पुष्करणी आणि बाजाराचा भाग आणि ३०० मीटर अंतरा दूर अच्युतराय मंदिर दिसत होते .आधी मंदिराकडे निघाले.एका बाजूला अच्युतराय बाजाराच्या पडव्या/व्हरांडा होत्या पूर्वी दुकाने आणि निवासासाठी वापरला जात असे.तर दुसरीकडे विस्तीर्ण पुष्करणीही होती.मंदिर आणि त्याच्या समोरील गजबजलेला बाजार मिळून 'अच्युतपुरा' हा हंपीच्या पवित्र केंद्राचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. मंदिरासमोरील रस्ता 'वेश्यांचा रस्ता' किंवा 'सूलाई बाजार' म्हणून ओळखला जातो.
अच्युतरायाचे मंदिर म्हणूनही ओळखले जाणारे तिरुवेंगलनाथ मंदिर, इ.स. १५३४ मध्ये बांधले गेले. अच्युतराय हे महान विजयनगर सम्राट कृष्णदेवराय यांचे धाकटे बंधू होते.
सामान्यतः राजा अच्युत देव राय यांच्या नावाने हे मंदिर ओळखले जाते तरी, ऐतिहासिक शिलालेखांमधून असे उघड झाले आहे की याचे बांधकाम अच्युत राय यांचे मेहुणे आणि दरबारातील एक उच्चपदस्थ अधिकारी हिरिया तिरुमला होते. हे मंदिर ‘तिरुवेंगलनाथ’ या देवतेच्या नावापेक्षा, ज्यांच्या काळात ते बांधले गेले त्या अच्युतराय मंदिर या नावाने अधिक ओळखले जाते.
या मंदिर संकुलाला दोन आवार आहेत, आणि प्रत्येक आवारात एक प्रवेशद्वार व गोपुर आहे. मुख्य मंदिर दुसऱ्या आवारात वसलेले आहे. मंदिराच्या समोर गरुडाचे मंदिर आहे. आतील अंगणाच्या भोवती खां
या मंदिर संकुलातही एक कल्याण मंडप होता, जिथे देवतेचा वार्षिक विवाह सोहळा आयोजित केला जात असे. जवळपास १०० खांबांवर कुशलतेने कोरलेली शिल्पे आहेत.
अजिबात गर्दी नसलेल्या या मंदिराला मला कमी वेळ देता आला कारण वाजले होते पाच आणि आता मला सूर्यास्त पाहण्यासाठी मातंग टेकडी चढायची होती.पुन्हा चक्रतीर्थ मार्गे बाहेर पार्किंगच्या आलो.
मोनोलिथिक नंदी
उजवीकडेच भव्य मोनोलिथिक नंदी एका मोठ्या मंडपात दिमाखात होता .नंदी शांत मुद्रेत बसलेला आहे आणि त्याचे लक्ष विरुपाक्ष मंदिराकडे आहे.
मातंग टेकडी
मातंग टेकडी अजून चढायला सुरुवात असल्यामुळे नंदीसमोर रेंगाळता ,टेकडी चढायला सुरुवात केली.मोठं मोठ्या उंच शिळा चढणे सुरुवातीला सोपे वाटत होते पण नंतर जरा चढाई अवघड वाटू लागली ,कारण दिवसभराचा थकवा आणि खूपच कमी वेळात खूप चढाई केली होती.त्यात मी स्पेशल साडी नेसली होती .मला पाहून अनेक जण अय्यो साडीत ही हा कठीण ट्रेक करतेय असे आश्चर्यपूर्ण कुजबुज जाणवत होती .थोडा स्वतःचा अभिमान वाटला पण माझी ट्रेक इन सारी ची मात्र हौस फिटली होती ..जिरली होती.अखेर मातंग टेकडी पूर्ण न चढता एका टप्प्यावर जेथून हंपीच्या प्रचंड शिळा अगदी खेळण्यातल्या चौकोनी ठोकळ्यासारख्या सगळीकडे विखुरलेल्या मनोरम वाटत होत्या.
वानरराज वालीने दुंदुभी म्हशीला ठार मारून त्याचे प्रेत मातंग पर्वतावर फेकले. यामुळे मातंग ऋषींनी वालीला शाप दिला की तो त्या पर्वतावर पाऊल ठेवू शणार नाही.नंतर दुंदुभीचा पुत्र मायावी युद्धासाठी वालीला गुहेत घेऊन गेला. वालीचा भाऊ सुग्रीव गुहेचे दरवाजे बंद करून बाहेर राहिला. वाली गुहेतून बाहेर आल्यावर सुग्रीवावर विश्वासघाताचा आरोप करून त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागला. प्रभू रामाने वालीचा वध केल्यावर सुग्रीवाला वानरराज्य मिळाले.
आता किष्किंधा-हंपी नगरीतले वानर इथेही लीला करतांना दिसू लागले ,कोणाची बॅग ,पाण्याची बाटली,खाऊ पळवं !
त्या शिळांवर बसून इतरत्र नजर फिरवली तर वेगवेगळ्या देशातले पर्यटकही दिसू लागले .जे सर्वजण समोर सोनेरी किरणांत न्हाहलेल्या हंपीच्या विशेष अशा शिळा ते सौंदर्य वीरुपाक्षच्या साक्षीने अनुभवत होते .खरोखर जगातल्या अनेक सूर्यास्त स्थळामध्ये हा एक उत्तम सूर्यास्तबिंदू आहे .
हंपी विजयनगर बाजार
मावळतीचे रंग माखून आनंदाचे किरण घेत खाली उतरलो तर समोर विविध रोषणाईत विरुपाक्ष मंदिर नटलेले दिसत होते .१५ व्या शतकातलया जगप्रसिद्ध अशा विरुपाक्ष/ हंपी विजयनगर बाजारपेठेतून मी पुढे पुढे निघाले होते. प्राचीन काळी युरोपियन, अरबी, पर्शियन आणि चिनी व्यापारी येथे येत असत., विविध परदेशी देशांतील व्यापारी येथे मौल्यवान खडे, दागिने, रेशमी वस्त्रे इत्यादींसारख्या अनोख्या वस्तू विकत असत. तसेच, येथे गायी आणि घोड्यांचा व्यापारही होत असे.परदेशी प्रवासी जसे अब्दुर रज्जाक, निकोलो कोंती, डोमिंगो पेस,फर्नाओ न्युनीझ यांनी हंपी बाजाराची प्रशंसा करताना येथील प्रचंड समृद्धी आणि विविधतेचे वर्णन केले आहे.
पोर्तुगीज प्रवासी पेस आणि नुनिझ यांनी हम्पी बाजाराचे वर्णन केले आहे, "या रस्त्यावर अनेक व्यापारी राहत होते आणि तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे माणिक, हिरे, पाचू, मोती, लहान मोती, कापड आणि पृथ्वीवर अस्तित्वात असलेली व तुम्हाला खरेदी करण्याची इच्छा होईल अशी प्रत्येक वस्तू मिळेल."
पुढे ते शहरातील काही रहिवाशांचे त्यांच्या सर्व मौल्यवान दागिन्यांनी नटलेले वर्णन करतात. "या प्रत्येक स्त्रीने आपल्या अंगावर जे काही बाळगले आहे, त्याची किंमत आणि मूल्य कोण सांगू शकेल? त्यांनी बाळगलेल्या बांगड्या, सोने आणि दागिन्यांचे वजन इतके जास्त आहे की त्यांच्यापैकी अनेकांना ते पेलवत नाही, आणि स्त्रिया त्यांचे हात धरून त्यांना मदत करत सोबत असतात."
अशा या भूतकाळातल्या वैभवाचे दृश्य मनात तराळत ठेऊन पुन्हा एकदा मंद समईच्या ,दिव्यांच्या उजेडात उभ्या वीरूपाक्षाचे दुरून दर्शन घेत आजचा हंपी दर्शनाचा पहिला दिवस संपला होता .
-भक्ती
संदर्भ -
https://www.karnataka.com/hampi
https://www.pickpackgo.in/2015/09/achyuta-rayas-temple-complex.html
https://hampi.in
No comments:
Post a Comment