Sunday, February 9, 2025

फुलांचे हास्य, बहरलेली भाषा..



फुलांचे हास्य, बहरलेली भाषा..

फुल कधी आहे मागत नाही फक्त देण्याची त्यांची वृत्ती आहे,गोड मंद सुगंध,रंगाचे इंद्रधनू,कोवळा मकरंद, जीव लावणारं प्रेम!

सकाळी फिरून घरी येतांना अनेकांच्या दारात बहरलेली ही किमयागार फुलं दोन लोकांत हास्य उमलू देतात.

 खुपदा या फुलांच्या मालकांना विचारून फुलं घेते,आता न विचारताही त्यांचे हसू याची मूक परवानगी देतात.

शब्दांपेक्षा हास्याची भाषा मनाचा मृदू कोपरा उघडणारी आहे.

झालं असं की एक काकू आहेत, खुप काळापासून एकट्याच आहेत.त्यांच्या दारातला पारिजात त्यांना सुगंधाच्या राशींसह अंगणात केशरी गालिचा घालून देतो.ती प्राजक्ताची फुलं वेचतांना त्यांच एक हसू प्रेमाचा धागा विणत राहते.

एकदा बोगलविलाची लाल, गुलाबी,पांढरी,केशरी अशी भरपूर रंगांच्या फुलांच्या फांद्या घरी नेत होते.तेव्हा वाह! किती सुंदर कागदी फुलं आहे,असं म्हणत ररस्त्याभर खुप जणींच्या सुंदर हास्यांना निरखत जात होते.

रातराणीच्या मालकीण बाई लगबगीने फुलं देतांना खुप मोलाचं स्मित त्यांच्याबरोबर देतात.

कुंदा घ्या मालकीण बाई अजून घे गजरा होईल असा नाजूक नात्यांचा दोर विणतात.

आणि मग रोज डे ला विसरला ना,असं 'ह्यांना' लाडिक म्हणतांना रात्रीच पंधरा मिनिटे आसपास शोधून कोणत्या तरी झाडावरून गुलाब जणू टुणकन ह्याच्या हातात येतो!!

वसंत आता कुठे फुलायला लागलाय... अजून निर्मळ हास्याचा ऋतू खुप बहरणार आहे,मला अनोखी भाषा परत परत शिकवणार आहे...मी तय्यार आहे ❤️

-भक्ती

No comments: