Wednesday, December 27, 2023

राजमा गस्सी



गुगला विचारले असता त्याने गस्सी म्हणजे "थिक करी" असं सांगितलं आहे 😀 तर दक्षिण भारतात इडली,डोशासाठी वापरल्या जाणाऱ्या पोडीची तर मी फैन झालेच आहे अगदी डबा भरून ठेवते,लेकीला भातावर कधी चटणी तेल म्हणूनही आवडते.यात डाळी वापरल्या जातात हे आवडतं.त्याचाच एक पुढचा पदार्थ समजला गस्सी भाजी.यात मसाला ताजा बनवून वापरल्या गेल्याने चविष्ट पदार्थ होतो.मी राजमा वापरला.गस्सीसाठी हरभरे,वाटाणे,चवळी असे भिजवून -शिजवून वापरले जाऊ शकतात.

साहित्य -

१ वाटी आठ तास भिजवलेला राजमा

१/२ वाटी चिरलेला बटाटा

१/२ वाटी चिरलेले गाजर

मसाला

२ चमचे धने

२-२ चमचे उडीद डाळ,हरभरा डाळ

१ चमचा तीळ,जिरे

१/२ चमचे मेथी दाणे

१ वाटी ओले वा सुके खोबरे

३-४ लाल मिरच्या

चिंच गूळ कोळ छोटी १/२ वाटी

चिरलेला कांदा टोमॅटो -१/२ वाटी प्रत्येकी

कृती-


१.राजमा आणि बटाटा-गाजर स्वतंत्र मीठ आणि हळद टाकून कुकर मध्ये शिजवून घ्यायचे(कमीच शिट्ट्या कारण राजमा,भाज्या गाळ होऊ नये)

२.मसाला -धने व इतर सर्व मसाल्याचे पदार्थ एक चमचा तेलात परतून घ्यायचे.व परतलेला कांदा टोमॅटो, कोथिंबीर टाकून बारीक वाटायचा , खोबरे सुकं असेल तर किंचित पाणी टाकावं,सरभरीत होण्यासाठी.

३.मोहरीची, कडीपत्ता फोडणीनंतर भाज्या परतून घ्याव्यात. मग मसाला टाकून परतून घ्याव्यात.

४.चिंच-गुळ कोळ टाकावा.

५.१/२  वा १ फुलपात्र पाणी टाकून १० मिनिटे गस्सी भाजी शिजू द्यावी.

खोबर्याचा आणि चिंच गुळाचा स्वाद इतका फ्रेश लागतो की क्या बात है😊

पोळी वा डोसा वा अप्पे वा घावण बरोबर गस्सी करी फस्त करा!

-भक्ती

No comments: