Sunday, January 7, 2024

स्मृतिचित्रे-लक्ष्मीबाई टिळक

 

 


स्वातंत्र्यपूर्वीचा १८७०-८० मधील काळ जलालपुरच्या मनकर्णिका कोकणस्थ नारायण टिळक यांच्याशी तेव्हाच्या पद्धतीनुसार बालपणीच विवाहबद्ध झाल्या आणि त्या लक्ष्मी नारायण टिळक झाल्या.मी अगदीच सामान्य रुपाची टिळकांसारख्या सुस्वरूप व्यक्तीला कशी पसंत पडले कोण जाणे? असे त्या म्हणतात.पण नारायण टिळक आहेतच अगदी विलक्षण आणि हे लक्ष्मी नारायणाचे जोडपं दुधात साखर विरघळावी अगदी तसच अविरत गोडीचे ,हे त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात पानोपानी समजते.

या पुस्तकाचे लिखाण त्यांनी टिळकांच्या हयातीनंतर त्यांच्या आठवणी मांडण्यासाठी तत्कालीन पाक्षिकात तीन भागात केले आहे.सासर माहेर दोन्ही अगदी धार्मिक कुटुंब आहेत.इतके की लक्ष्मीबाई लहानपणी त्यांच्या वडिलांना सोवळे कसे होत,व ती खोड भावंड कशी मोडत ते वाचतांना कमाल वाटते.सासरी सासू नाही पण सासरेही देशवार सुनेची नेहमी परीक्षा घेत.हे सगळ वाचताना सासू –सून मालिका प्लॉट वाचतोय अस वाटत .पण त्यातच नारायण टिळकांची चंचल वृत्ती सतत दिसून येते.ते खूप ज्ञानी,वेद जाणणारे पंडित पण ‘दामाजी’ त्यांना कधीच प्रसन्न नसे.तेव्हा ते सतत नोकरी निमित्त स्थलांतर करीत राहत.यात लक्ष्मी बाईंना कधी सासरी,माहेरी,आत्याकडे,बहिणीकडे अनेकदा मदत मिळत पण कडक बोलणेही मंडळीची ऐकावी लागत.टिळक कवीही थोर ,कीर्तनही करत .अशा प्रसंगाची कविता ते सहज रचत आणि कीर्तनातूनही सादर करत .असेच काव्य त्यांनी भिकुताई,’मंबाजीबाई’इतर अनेकांवर रचलेली लक्ष्मीबाईंनी सांगितले आहेत.पहिल्या अपत्य निधनानंतर टिळकानी रचलेले बापाचे अश्रू हे काव्य आणि घारू ताईला शब्दांचे घातलेले दागिने हे काव्य खूपच सुंदर आहे.

अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.”

टिळकाना रेल्वेत एक ख्रिस्ती भेटतात वादविवाद आणि व्याख्यानांसाठी प्रसिद्ध असलेल्या टिळकांनी ख्रिस्ती धर्माविषयी अनेक प्रश्न केले,तेव्हा त्यांच्या हाती पडला ख्रिस्ती धर्मग्रंथ ,आणि प्रभू ‘येशू’यांचे ते हळू हळू अनुयायी होऊ लागले.टिळक धर्मांतर करणार तेव्हा लक्ष्मीबाई बहिणीकडे होत्या.उच्च धर्मियाने धर्मांतर करणे त्या काळात गहजबच होता.लक्ष्मी बाईंचे त्या व नंतर पाच वर्षेचे दुसऱ्याकडील जीवन जीव आहे पण आत्मा नाही असेच होते.आजारांनी त्यांना बेजार केलेच आपण टिळकांवरचे त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही.अखेर टिळक लक्ष्मी आणि मुलगा दत्तू यांना आपल्याकडे वळवण्यास यशस्वी झाले.आणि लक्ष्मीबाई खऱ्या अर्थाने टिळकांच्या सावली झाल्या.बरेच दिवस त्या सोवळ,पूजा चालीरीती पाळायच्या पण आजूबाजूच्या वातावारणामुळे आपसूकच  प्रार्थना करू लागल्या आणि त्या आणि दत्तू ख्रिस्ती झाल्या.व्याख्याने ,ख्रिस्ती कीर्तनेही करायच्या.

आणि नगरमधील त्यांचे वास्तव्य सुरु झाले नगर हे माझेच गाव तेव्हा तिथल्या स्टेशन ,चांदबीबी,डोंगरगण,फर्ग्युसन गेट,हिवाळे,रोबर्ट ह्यूम,राहुरी  इत्यादी विषयी त्या सांगताना कोणी शेजारीणच माझ्याशी गप्पा मारत आहे असे वाटले.

लक्ष्मीबाईंकडे  माणस जोडण्याची टिळकांप्रमाणे कला होती.अनेक मुले त्यांनी सांभाळली काही अनाथ,गरीब,आई नसलेली त्यात मराठीचे थोर कवी बालकवी हेही होते.तसेच अतरंगी लोकही भेटले.हे सगळे प्रसंग- काही प्लेगच्या कारुण्याचे त्यातही दांपत्याचा सेवाभाव दाखवणारे,ठोंबरे (बालकवी)बरोबरच्या आंबट गोड तरीही  आई मुलांच्या नात्याच्या हळव्या आठवणी आहेत.नगरला असतांना टिळकांनी अभंगांजली,ख्रिस्ती दरबार रचला.टिळक अनेकदा अडलेल्या मदत करत तेव्हा या कुटुंबाची काळजी रोबर्ट ह्यूम यांना असत व ते विविध योजनांद्वारे मदत करत हे जागोजागी त्यानी लिहिले आहेच.लोणावळा,सातारा येथले दिवस त्या उबदार आठवणी लिहिल्या आहेत.

दत्तूचे लग्न, बेबीचे शिक्षण ,शेवटच्या दिवसांत टिळकांची संन्यस्त वृत्ती या बाबतचे एक कौटुंबिक सौख्य शब्दोतीत होते.टिळकांनंतर  मुंबईत एक मुलींच्या वसतिगृहावर मेट्रन ही नोकरी स्वीकारली  तेव्हा कुटुंबाला स्थिरत्व देतांनाही  त्यांना आनंदच होतो,मी अशिक्षित मला नोकरी मिळाली हेही खूप महत्वाचे असे त्यांना वाटत.त्यांनी इंग्रजी शिकण्याचा,अगदी नर्सही होण्याचा प्रयत्न केला पण नशीब साथ देईना.मराठी वाचता ,लिहिता येत पण जोडाक्षरे त्यांना लिहायला अवघड जात त्याचा बालकवीबरोबरच ‘मनुष्य’ शोधतेय हा आणि बालकवी यांनी त्यांच्या पुस्तकासाठी लिहिलेली खोटी खोटी प्रस्तावना खूप गमतीशीर आहे.

बेबी ,सून रुथ आणि नातवंड नाना ,अशोक बरोबरचे कराचीचे पारप्रांतातले घराचा अनुभव अखेरच्या पानांवर आहेत.

नारायण टिळक नावच शब्दांचे,लोकसेवेचे ,असामान्य वादळात लक्ष्मीबाई यांनी अनेक उतार चढाव करत परिपूर्णपणे अनुभवलं.त्या याच वर्णन करताना लिहितात , “आमच्यात जे खटके उडत ते जेव्हा जेव्हा मला त्यांच्या प्रगतीचा सवेग सहन होत नसे तेव्हा तेव्हा.डेक्कन क्वीनच्या मागे एखादा खटारा बांधला व ती आपल्या पूर्ण वेगात निघाली म्हणजे त्या खटार्याची जी आदळआपट होईल ती माझी होत असे.त्यांचा वेग मला मानवेल इतपत असला व मला त्यांची ध्येये पटवून घेण्यास अवसर मिळाला ,की मग मात्र आमचे गाडे सुरळीत चाले”

लक्ष्मी बाईचा कविता प्रवासही या स्मृतिचित्रांतून उलगडतो.टिळक धर्मांतरासाठी दूर जातात तेव्हा-नवरा,करंज्यातील मोदक,पतीपत्नी,श्रीमती,नातवावरची कविता यात वाचायला मिळतात.
टिळक लिहित असलेल्या अपूर्ण  ‘ख्रिस्तायन’ ह्या काव्याचे चौसष्ट अध्याय लिहून लक्ष्मीबाईंनी ‘ख्रिस्तायन’ पूर्ण केले. १९३३च्या साहित्य संमेलनात त्या कविसंमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या.

या आत्मचरित्रात अनेक प्रसंग कालानुसारच पण आठवतील असे गप्पांसारखे लिहिले आहेत.सहजच आनंद,दुखा:ची रेशमी झालर,माणसांची ऊब,ईश्वाराची असीम कृपा पानोपानी वाहत आहे.म्हणूनच एका शतकानंतरही लक्ष्मीबाईन्चे ही स्मृति चित्रे अजरामर आहेत. 

-भक्ती

नारायण वामन टिळक यांहही नगरमधील सिद्धार्थ नगर येथील ख्रिस्ती दफनभूमितले स्मृतीस्मारक(त्यांचे दहन करून त्यांच्या अस्थी येथे ठेवण्यात आल्या आहेत).टिळकांच्या शेवटच्या इच्छेनुसार इथे पांढऱ्या दगडात “पुष्कळ अजुनी उणा प्रभू,मी पुष्कळ अजुनी उणा रे !”  ह्या ओळी कोरला आहेत.पुस्तकातील ८० व्या “छाया” टिळकांच्या मागेच जवळ त्यांचे अखंड हितचिंतक रोबर्ट ह्यूम यांचेही पुढील काळात  दफन करण्यात आले आहे.स्मृतीभागात त्याच्या मृत्युपत्र सविस्तर सांगितले आहे.त्यामुळे हे स्थळ आज पाहताना काळ मागे गेला व समोर उभा राहिला असे वाटले.  







No comments: