Friday, May 30, 2025

माझा साक्षात्कारी हृदयरोग (पुस्तक परिचय)



 माझा साक्षात्कारी हृदयरोग 

डॉ. अभय बंग


शोधग्राम, गडचिरोली येथील प्रसि‌द्ध सामाजिक नेते डॉ अभय नंग यांनी त्यांच्या हृदयरोगावर कशाप्रकारे काम करत यशस्वीपणे हा आजार दूर केला याबाबतचे 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' हे पुस्तक आहे, जे अनेकांना प्रेरणा देणारे आहे.


पहिल्या 'आघात' प्रकरणात हृदयरोगाचा झटका (हार्टअॅटक) आल्यानंतर कशाप्रकारे दवाखान्यात पोहचेपर्यंत, पोहचल्यानंतरची  धावपळ सांगितली आहे. यामध्ये अनेक वैदयकीय संज्ञा, वैदयकीय  उपचारप‌द्धती या समजतात. शस्त्रक्रियेच्या दरम्यान(angioplasty )जेव्हा खुद्द डॉक्टरांचीच अभय बंग यांची हृदयाची नस फाटते. तेव्हा फारच भीती वाटते, डॉक्टरांना देखील 'अणुविसर्जनाची (मृत्यूची) वेळ आली आहे असे वाटते. मृत्यूबाबत 'अणुविसर्जन हा अनोखा शब्द छानच वाटला. [ पान नं. 32]


पुढच्या 'ऑर्निश'प्रकरणात ऑर्निशच्या शाकाहार, योगासने, शवासन, अध्यात्मिक समाधानावर आधारित उपचार पद्‌धतीचा अभय बंग यांनी हळूहळू कसा स्वीकार केला हे लिहिले आहे. यामध्ये 'भोजध्यान' जेवणाच्या सवयी, गरज नसताना जास्त खाणे, खाण्याचा खरा अस्वाद 'सुचवला.


याच प्रकरणात व्यायामाबाबत सांगतांना, चालण्याचा व्यायाम करताना हृदयगती कशी महत्त्वाची हे लिहिले आहे. तसेच पुढे ७.७ प्रकरणात चालण्याच्या व्यायामाच्या तीन Strolling, Brisk walking, Aerobic walking विषयी नवी माहिती मिळाली. या चढता क्रम सवय, नियमितपणाने प्राप्त करता येतो.


पुढील 'क्षणस्थ' हे प्रकरण अत्यंत सुंदर आल्हाददाय आहे. अध्यात्म ही या भूमीची/संस्कृतीची मोठी देणगी आहे.

परंतु या गोष्टी सध्याच्या धावपळीत अनेकांना अध्यात्म अगम्य वा वेळेचा अपव्यय वाटतो. परंतू माझ्या वैयक्तिक अनुभवानेही हे मान्य करते की, एकदा यातील साधनेची किल्ली गवसली की आपल्या गतीनुसार ही दिव्य शांती आयुष्य सुकर करते.


अभय बंग यांवर विनोबा भावे, महात्मा गांधी यांचा विशेष प्रभाव आहे. अभय बंग यांना विनोबा भावे यांचा मार्गदर्शक सहवासही आयुष्याचा प्रारंभी मिळाला आहे. त्याचमुळे या प्रकरणात विनोबांच्या लिखाणातील,आचरणातील 'गीतेतील तत्व डॉक्टरांच्या भाषेतून वाचायला मिळते. योगनिद्रा, ध्यान याचे महत्त्व यात अधोरेखित करताना 'स्वधर्म, म्हणजेच कर्म करण्याची चालना हेच निरोगी आयुष्याचे रहस्य अनेक उदाहरणांनी सांगितले आहे. मन एकाग्र करण्यासाठी 'स्वसंवेद्य सत्य' जागृत करणे व अनुभवणे म्हणजे काय याचा उहापोह आहे.


पुढील 'दर्शन' प्रकरणात विपश्यना त्राटक, श्रवण, मन केंद्रित करणे इ. ध्यानावर आधारित पद्धतीवर काम कसे झाले याचे अनुभव कथन आहे. यात अनेकदा भारतीय संत, साहित्यातील अध्यात्म - ध्यान अनुभव का सुंदर वचनांतून मांडला आहे.


स्वधर्म प्रकरणात अर्जुन विषाद या गीतेतील प्रकरणा प्रमाणेच आता काय करावे? युद्ध की निवृत्ती?असा प्रश्न हाताळला आहे.

 अध्यात्माची गोडी लागली तरी संन्यास हा मार्ग कसा नाही हे सांगतांना 'स्वधर्म' म्हणजेच 'कर्म' करण्याचे महत्त्व आधुनिक पद्‌धतीने आहे. कर्म करताना ताण कसा दूर ठेवावा सांगितले आहे ,जो हृद‌याला हानीकारक आहे. कर्मक्षेत्र व धर्मक्षेत्र एक झाल्यास ताणरहित, नैसर्गिक, अध्यात्मिक कर्म हे आपसुक प्राप्त होते हे सांगितले आहे.


शांती प्रकरणात


"मी अजूनही माझ्या मनाचे शेत नांगरत आहे पाऊस अजून पडलेला नाही. पण हे नांगरणच किती सुंदर अनुभव आहे! "


हे वाक्य खुपच आवडले.अनेक मोह,वासना,ताण हे ध्यान, वाचन, योग साधनेने दूर करणे ही खरच शांती मिळवण्याची नांगरणी आहे.


पुढच्या प्रकरणात व्यायामाची आहाराची यथोसांग वैज्ञानिक दृष्टीकोनातून उत्तम माहिती आहे . वजन, कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या आहाराची माहिती आहे.


पुस्तकातील एक वाक्य खुपच गमतीशीर आहे. 


"सर्वांना मी एकच शुभेच्छा देऊ शकतो, प्रत्येकाला एकदा तरी मृत्यूचं दर्शन अवश्य व्हावं."


खरोखर स्वानुभवातून  मृत्यूच्या साक्षात्कारी अनुभव अभय बंग यांना आला व ते पूर्ण बदलले.


पण याची आपण वाट न पाहता यावर सदैव हृद‌यावर, आरोग्यावर काम करीत स्वधर्म पाळायला हवा. 

-भक्ती

Tuesday, May 20, 2025

गर्जा महाराष्ट्र -पुस्तक परीचय

#गर्जामहाराष्ट्र 

लेखक-सदानंद मोरे




 इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते.

नीरक्षीरविवेक बुद्‌धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व  सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने  'गर्जा महाराष्ट्र'  या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात दिसतात.

ग्रंथात मराठी भाषेच्या इतिहासात पोवाड्याचे, पाकृत भाषेच्या जडणघडणीचे महत्त्व अधोरेखित केले आहे, यामध्ये संस्कृत विरु‌द्ध प्राकृत', 'याकडेही लक्ष वेधले आहे.

सातवाहन ,यादव ते शिवछत्रपती ते महाराष्ट्र १ मे १९६० या प्रदीर्घ काळात मराठ्यांचा संघर्ष अवर्णनीय लेखनाने उलगडला आहे.

छ. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आगळी, मुत्सद्दी बाजू, वाचायला मिळाली पण याच मराठ्यांना इंग्रजांनी 'लुटारु' अशी,धादांत खोटी ओळख दिली. भारतीयांनी एका प्रेरणास्थापासून दूर जावे म्हणून ही खेळी खेळली. परंतू लोकमान्य, फुले यांनी ती अस्मिता छत्रपती शिवाजींची प्रेरणा पुन्हा जागृत केली .पण महादेव मोरेश्वर कुंटे यांचे 'राजा शिवाजी' मराठ्यांशी संबंधित पहिले (१८६९) महाकाव्य होते हे सध्या विस्मृतीत गेले आहे या विषयी लेखही यात आहे.


मराठी माणसाचे कूळ शोधताना काही इतिहासकारांनी ते शु‌द्धतेच्या अट्‌टाहासापायी असे उत्तर भारतात शोधण्याचा श्रेष्ठ कनिष्ठ संकल्पना रुढ करण्याचा प्रयत्न केल्या. परवलीचे वाक्य 'महाराष्ट्र धर्म 'ही संकूषित शब्द पहिल्यांदा न्या. रानडे यांनी नी १८९५ ला व्याख्यानात वापरला होता.या वाक्याचा अर्थ महाराष्ट्र वा धर्मापुरता नसून राष्ट्रीय धर्मा प्रसरण क्षमता या 'महाराष्ट्र राष्ट्रीय शक्ती होण्यात आहे. यावर

'सनातन धर्म हाच महाराष्ट्र धर्म 'या प्रकरणात प्रकाश टाकण्यात आला आहे.

अनेक इतिहासकारकांनी धर्मशास्त्रावर जोर दिला व इतिहास मांडला  व तो मांडताना वर्णश्रेष्ठत्वाचा पुरस्कार दिसला हे केल्यामुळे भविष्यात अनेक वादांची नांदी झालीच, अशा प्रकारचे परखड मत देतांना नंतर महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींच्या राजकीय, ऐतिहासिक संघर्षाच्या कधी न वाचलेल्या गोष्टी यात समजल्या. तत्कालीन महाराष्ट्रातील ब्राम्हण व ब्राम्हणेतर तद्‌नंतर  ब्राम्हणेत्तर मराठा चळवळीत मराठे विरूद्ध मराठेत्तर याविषयी साहित्यनिर्मितीचे टप्पे /संदर्भ समजले.

दुर्लक्षित विठ्ठल रामाजी शिंदे यांच्यावरील प्रकरणात  शिंदेंसारख्या व्यासंगी संशोधकाने केवळ पुस्तकी नाही तर क्षेत्रीय (Field Study) प्रकारचा अनुभवाधिष्ठित अभ्यास अस्पृश्यांच्या प्रश्नांचा केला हे सांगितले. १९३५ला बडोदा येथे भरलेल्या साहित्य संमेलनाला अध्यक्षीय भाषणाचा समारोप करतांना ते म्हणाले "बाबांनो, तुम्ही आपले पूर्वग्रह पुन्हा सोडून दया आणि तुमच्यासाठी आधीच मिळवलेल्या मिळवून ठेवलेल्या माहितीला तुमच्या स्वतःच्या स्थानिक निर्विकार अनुभवांची जोड देऊन अशी काही नवी दिशा दाखवा, की जेणेकरुन आमचे पूर्वग्रह नाहीसे होतील आणि नवीन आशा उत्पन्न होईल."

लोकहितवादींनी आज्ञापत्राच्या कर्त्याने शिवाजीराजांनी नूतन सृष्टी निर्मिली असे म्हटले आहे. शिवाजी महाराजांनी केलेले कृत्य हे साधे बंड नसून, क्रांती म्हणजे रिव्होल्यूशन असल्याचे प्रतिपादन केले, 

बंड- नवीन सत्तेत वरचे मूल्य असतीलच असे नाही

क्रांती - सत्तांतर हे मूल्याधिष्ठित, अगोदरपेक्षा चांगली राज्यव्यवस्था असते.

शेजवलकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्य त्रयींचा फ्रेंच राज्यक्रांतीत मिळाले अस उल्लेख करत शिवकाळात समता व बंधुतेमुळे मराठे एकवटले व स्वातंत्र्य मिळाले हे अधोरेखित केले.

शेवटच्या लेखांमध्ये औरंगजेबाच्या विरुद्‌धची मराठ्यांची झुंज सांगतांना त्याच मोगलांना संरक्षणासाठी मराठ्यांवर अवलंबून राहावे लागत. दिल्ली सल्तनत क्रमांक एक वर केवळ नामधारी तर क्रमांक दोनवर मराठ्यांचीच वर्णी सर्वार्थाने राहिली.

यावर शिवाजी लोकांचा राज्यविस्तार हिंदूस्थानचा बंदोबस्त, मराठ्यांचा गनिमी कावा ,अटकेवर फडकव‌ले, तत्वासाठी लढणारे मराठे या लेखांत मराठ्यांचे शौर्य दिसते.

इंग्रजी सत्तादेखील अनेक दशके मराठ्यांनी झुंजत ठेवले, जे कार्य पातशाह्या राजपूत, मोगल कोणीही करू शकले नाही. त्याची दखल न घेता व्यवहार करणे अशक्यप्राय होते. १६७५च्या  मे महिन्यात मुंबईच्या वखारीतील इंग्रजांनी राजापूरच्या इंग्रजांना लिहिलेल्या सूचना वजा पत्रातील मजकूर महत्त्वाचा आहे.

"ज्यांच्याशी तुम्हाला वागावयाचे आहे ते लोक (म्हणजे अर्थात मराठे) चतुर व चौकस(searching) आहेत. त्यांच्याशी व्यवहार करताना  मर्यादाने व विचाराने वागावे."

मराठ्यांच्या स्वभावाचा व कर्तृत्वाचा उल्लेख कधी कधी सहजगत्या येऊन जातो तेव्हा त्याच्या प्रामाणिकपणाबद्‌दल शंका घ्यायला अवसरच राहत नाही'

ज्यावेळी अनेक संस्थानिक ऐषो आरामात ब्रिटीश अंमलाखाली दंग होते. त्यांच्या अनेक सुरस कथा प्रचलित आहेत. या कथांना ठळक आणि सन्माननीय अपवाद मराठी संस्थानिकांमध्ये आढळून येतो. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे शाहू महाराज, औंधचे भवानराव पंतप्रतिनिधी हीज्ञतीन नावे या संदर्भात सहज आठवावीत अशी आहेत.


आपल्या वर्तमानातील लढ्यात ऐतिहासिक पुरुषांच्या नावाने लढण्याच्या आणि त्यासाठी इतिहास लेखनाला रणमैदान बनवण्याच्या प्रवृत्तीविषयी शिद्यांनी नापसंती व्यक्त केलेली आहे. इतिहासात पूर्वजांनी केलेल्या पराक्रमात गुंतून आपल्या वर्तमानातील प्रश्नांकडे व खऱ्या संघर्षाकडे दुर्लक्ष करू नये असे त्यांना सांगावयाचे आहे. त्यांच्या त्या पदातील काही ओळी उद्धृत करणे उचित होईल.


बंधू हा भवाचा किल्ला सर करणे आम्हा सकला ॥धृ॥ सिंहगड तो एकचि नोहे महाराष्ट्रामधला साचा ॥ तान्हाचि नव्हे एकुलता शेलारमामाचा भाचा ॥ श्री शिवाजी होऊनि गेला कधी काळी इतिहासाचा अशी गोष्ट न बोला कधीही ॥ जीवन हे युद्धचि पाही ॥ दिनरात अंतरी बाही ॥


मग काहो स्वस्थसे बसला ॥ बंधुहो...


जग नव्हे मराठ्यांपुरते, पसरे ते अनाद्यनंती राहणीचे जे जे साधे, स्वार्थाबाहिर जे पाहती ॥ सत्याची भूक जयांना, अन्याया जे न सहती ॥ ते सर्वची अस्सल मराठे ॥ कालदेश केव्हा कोठे ॥ सोडा हे विचार झुटा ॥

महाराष्ट्र धर्म हा अपुला ॥ बंधुहो....

'ज्यांची राहणी साधी असते, जे स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे पाहू शकतात व ज्यांना सत्याची चाड आणि अन्यायाची चीड आहे त्यांना अस्सल मराठे म्हणावे' असे शिंदे सांगतात.


महाराष्ट्र सध्या आपल्यापुरतच पाहण्याचा पायंडा पडत आहे, त्यासाठी ऐतिहासिक व्यक्तींना इतिहासाला साधन सहज केले जाते.दुसऱ्यांच्या चुका सांगताना स्वतःतच बदल करण्याला कोणी फारसे उत्सुक नाहीत ही शोकांतिका आहे.

Thursday, May 15, 2025

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत

 


तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले. यामध्ये अवैदिक तत्वज्ञान परंपरा बौद्ध, चार्वाक, जैन यांची मूळ विचारसरणी सांगितली आहे.तद्नंतर वैदिक परंपरेतील अभ्यासकांची मते सांगितली आहेत.


१.बौद्ध तत्वज्ञान 

बुद्‌धाला यात वैद्यराज म्हणून भूमिका पार पाडावयाची होती म्हणून 'अनुत्तर भिषक्को (निष्णात वैदय) आणि 'अनुत्तर सल्लकतो (कुशल शल्यकार) असे म्हटले  हे समजले कारण  बुद्‌धांनी जीवनातील (मनाच्या) व्याधीचे, रोगाचे निदान करून त्यावर रामबाण उपाय सुचविलेला आहे- दुःखमय जीवन हा एक आजार आहे, असे सांगून त्या आजाराचे मूल कारण शोधून ते नष्ट करण्याचे चार आर्यसत्य सांगितले


१.जीवन दुः कामय आहे (दुःखम)


२)दु:खाला कारण आहे, तृष्णा जगण्याची धडपड


३) दुःख नाहीसे करता येते.


४) दुःखमुक्तीचे मार्ग (आर्य अष्टांग मार्ग)


(सम्यक -दृष्टी, संकल्प, वाचा, कर्म, आजीविका, व्यायाम, स्मृती,समाधी)

तसेच सम्यक शील, प्रज्ञा, समाधी,


'भवतु सब्ब मंगलम्‌।'


२.इहवादी चार्वाक


चार्वाकांचे तत्व‌ज्ञान समजण्यासाठी कोणताही विशिष्ट अस्सल ग्रंथ अगर साधन नाही इतर दर्शनांवर लिहिलेल्या ग्रंथांमधून चार्वाकाचे खंडन करतांना ली चार्वाकसूत्रे विखुरलेली दिसतात. बहुजनांसाठी उपयुक्त असे विचार यात आहेत असा वाद्यांचा दावा असल्याने याला कदाचित लोकायत असे म्हटलेले आहे.

चार्वाकाने 'प्रत्यक्ष' हे एकमेव प्रमाण मानतांना  सुखवादाचा पुरस्कार केलेला आहे. आपल्या सुखवादाचा उपदेश करीत असताना चार्वाक म्हणतात,


'यावज्जीवेत सुकां जीवेत नास्ति मृत्योरगोचरः ।


भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः ।।


"जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत सुखाने जगावे. मृत्यु कोणालाही टळलेला नाही. भस्म होणारा देह पुनः कोठून येणार?"


परंतू चार्वाकाचे विरोधक चार्वाकाच्या 'सुखाने जगा' म्हणून सांगणाऱ्या श्लोकातील दुसऱ्या चरणाचा विपर्यास करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हा निंदात्मक श्लोक पुढील प्रमाणे सांगितला गेला.


यावज्जीवेल सुखं जीवेत ऋणं कृत्वा धृतं पिवेता भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः।


मूळ श्लोकात 'मृत्यु कोणालाही सुटलेला नाही' असे असताना त्या ठिकाणी 'कर्ज काढून तूप प्या' अशी शब्दरचना करण्यात आली आहे.


चार्वाकांनी पक्क्या इहवादी, जडवादी विचारांची इहवादी तार्कीक मांडणी केली. जी समाज जीवनाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक वाटतेच तसेच विज्ञानाला पोषक अशी विचारसरणी या तत्त्वज्ञानात आढळते.


३.विश्व आणि मानव-जैन दृष्टिकोन


विश्वाच्या निर्मितीविषयी जैनमतानुसार विश्वाला कर्ता म्हणून कोणीही नाही. हे विश्व अनादि वा स्वयंचलित असल्यामुळे विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही- उत्पाद, व्यय व धौव्य यांनी युक्त्त असे द्रव्य आणि स्वयंचलित कर्माचा नियम ही दोन मानल्याने विश्वाचा व्यवस्थित उलगडा होऊ शकतो.


जैनदर्शन हे माणसाच्या सामर्थ्यावर भर देते.दृढ इच्छाशक्तीने, आत्मसामर्थ्याने, तपोबलाने विशिष्ट शक्तीच्या सहकार्याविना स्वतःच्या माणूस खताच्या उत्कर्षाचा रचनाकार होऊ शकतो


- मोक्षप्राप्तीसाठी श्रद्धेय अशी सात तत्त्वे व नऊ पदार्थ सांगितले आहेत.


ही सात तत्त्वे म्हणजेच जीव, अजीव, आस्त्रव, बंध, संवर, निर्जरा व मोक्ष • पाप व  पुण्य आस्त्रवाचे दोन विशेष प्रकार आहेत. आस्त्रव म्हणजे कर्मकणांचा ओघ आणि हा ओघ आवरणे म्हणजे संवर होय.


मोक्ष प्राप्तीची तीन साधने


सम्यग्दर्शन-जी- सात तत्वांवरील संपूर्ण श्रद्‌धा

सम्यरज्ञाना - जीव व अजीव याच्या स्वरुपाचे ययार्थ ज्ञान

सम्यक्चरित्र - शु‌द्ध आचरण त्यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय ब्रम्हचर्य व अपरिग्रह ही पाच व्रते सांगितली आहेत.

***********

या तीन अवैदिक दर्शनानंतर वैदिक तत्वज्ञानाची व त्याच्या अभ्यासकांची चिकित्सा केली आहे,


वैदिक तत्त्वज्ञानात तत्त्वज्ञान व धर्म यांचा मिलाफ दिसतो. केवळ बुद्‌धीप्रामाण्यवादाचा आश्रय घेऊन तात्त्विक मीमांसा करता येणार नाही, तर्काच्या मर्यादा ओलांडून पुढे गेल्याशिवाय सद्वस्तूचे ज्ञान होणार नाही. याच कारणास्तव ते ज्ञानसाधनेत साक्षात्काराला, अपरोक्षनुभवाचा महत्त्व देत 'ईश्वर तत्व मान्य करतात.


१.अमृतानुभवातील तत्त्वज्ञान

 वेदान्तातील सर्व सांप्रदाय साक्ष्य प्रमाणाला विशेष महत्त्व देतात. परंतू ज्ञानदेव स्वानुभवाचीच कास धरतात',त्यांचे अनुभव शब्दाब‌द्ध झाले हेच करे भाग्य  म्हणावे लागेल.


'परी शिवे का श्रीवल्लभे । बोलिले येणेोचि लोगे। मानू ले हे लागे । न बोलताचि । [अमृ. ३-९२]


आत्मतत्त्व  सिदध करण्यासाठी प्रमाणांची आवश्यकता नाही, कारण ले स्वयंसिदध व स्वयंप्रकाशी आहे. उलट ज्ञानाची प्रमाणेच आत्म तत्त्वाने प्रकाशित होतात सूर्यप्रकाशामुळे अनेक वस्तू पाहता येतात, पण या वस्तू काही सूर्याला प्रकाशित करीत नाहीत. तद्‌वन आत्मतत्त्वाने प्रकाशित होणारी प्रमाणे आत्मतत्त्व सिद्‌ध करु शकत नाहीत (अमृ.५-१६).


तैसा आत्मा सच्चिदानंदू । आपण या आपणसिदधु आता काय ते शब्द। तयाचे आता ।।


शब्द आत्मतत्त्वाकडे आपले लक्ष वेधू शकतात, पण आत्मतत्व सि‌द्ध करू शकत नाहीत.


अविद्येचे खंड्ण करताना ज्ञानेश्वर म्हणतांत (अमृ ७-२५) 'काजवा ज्याप्रमाणे अंधाराचा आश्रय घेऊनच आपला प्रकाश मिरवीत असतो, त्याप्रमाणे अज्ञान खोटेपणाचा आश्रय घेऊन अनादि होत असते. असे असताना अज्ञानाचा व आल्याचा संबंध कसा घडेल ?


आत्म्यावाचून अज्ञान स्वतंत्र रहात नाही, म्हणून अज्ञान केवळ शब्द‌मात्रच आहे, त्याला स्वरुपसत्ता नाही असे ज्ञानदेव प्रतिपादन करतात


मग जगताचे स्वरुप कसे मानावे. ज्ञानदेव म्हणतात आत्मरुपाला एकाकी रमले नाही, अनेक रूपाने प्रकट होण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्याने जगत् निर्माणकेले (अमृ. ७-१२८) आत्मतत्त्व स्वतः हाच विस्तारित होते आणि जगद्‌रूप धारण करते, दृष्टया वस्तु रुपात स्वतःला पाहू शकतो.

 'एकोडहं बहुस्याम प्रजायेय ।'

 जीव-जगतः शिवशक्त्यात्मक आत्मतत्त्वाचा चिद‌विलास आहे. जगत् मिथ्या नाही तर सद्स्वरुपीच आहे.


२.द्वैती तत्वज्ञान

द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.


मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात 

प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान.


अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही.

अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत .

शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा.

द्वैती तत्त्वात पहिले मूलतत्व स्वतंत्र आहे तर दुसरे त्याचा परिणाम अस्वतंत्र आहे.


एकमेव स्वतंत्र असे ब्रम्हतत्त्व नित्य । परिपूर्ण दोषरहित, स्वयंप्रकाशी व सद्‌गुणपूर्ण आहे. विष्णु अद्वितीय आहे."

सर्व उत्पत्ती - स्थिती-लयाचे कारण विष्णू होय .


मध्वाचार्याची केवलद्वैतम्य सूत्रांचा निराळा अर्थ सांगितला आहे. उदा०


१.अथतो ब्रम्ह जिज्ञासा - नारायणाच्या प्रसादावाचून मोक्ष नाही. प्रसाद‌ज्ञानाशिवाय शक्या नाही म्हणून ब्रम्हजिज्ञासा करावी.

२.जन्माद्यस्य यतः

३.शास्त्रयो नित्वात-श्रुति व स्मृती सहाय्याने प्रमाण ठरते-मध्वाचार्य यांनुसार शास्त्राचे प्रामाण्य विष्णूच्या ठिकाणी आहे.


पुढे द्वैतामध्ये विविध भेद-जीव ईश्वर, जड-ईश्वर, जीव परस्परभेद जड-ईश्वर, जड परस्पर भेद सांगून त्यांतील अनेकता ,प्रभाव प्रमाण,परात्तंबित्व दाखवले. तुर्या ही अवस्था जीवितासाठी नाहीतर ईश्वराचे ते ययार्थ स्वरूप वर्णन मानले आहे.


ईश्वर सेवा अंकन, नामकरण, भजन द्वारे होते. विष्णूप्रसादाने विष्णूषदापर्यंत पोहचण्याचा असल्याने मोक्षाचा अधिकार सर्वांना आहे. यात समा‌जातील कोणतीही उच्चनीच नाही, समता आहे.


३.कृष्णमूर्ती यांचे अंतर्यामाचा फुलोरा व मृत्यूची संकल्पना 

*जे. कृष्णमूर्ती सांगातात


सांबधिक 'मी 'त्वाचा जेव्हा अभाव होतो तेव्हा अंतमामाचा फुलोरा प्रफ्फुलित होतो. यासाठी प्रथम विचारांची कास सोडली पाहिजे, पाहिजे. याचा अर्थ सर्व ब क्षेत्रांत विचार वर्ज्य केले पाहिजेत असे नव्हे. तर धर्मा धनार्जन करून चरितार्थ चालविण्यासाठी, तांत्रिक व व्यावहारिक कारणांसाठी विचारांचा आधार घेतलाच पाहिजे. पण त्या पलीकडे जाऊन, परस्पर संबंधामध्ये

जेव्हा विचार येतात तेव्हा विचारच विषारी व‌ घातकी होतात त्यांच्यामुळे प्रेमाचे अस्तित्व संपते. हे समजून घेऊन विचारांना खो दिल्याने शाश्वत प्रेमाचे दर्शन होते.


*मृत्यू 

मृत्यू म्हणजे काय हे समजून घ्यावयाचे असेल तर सर्व अनुभव, सर्व ज्ञान, सर्व आठवणी पुसून टाकल्या पाहिजेत. याचा अर्थ वस्तुस्थितीच्या आठवणी, वास्तवाचे अनुभव पुसून टाकणे असे मात्र नव्हे. आपले घर, घरी जायचा रस्ता, अशा व्यावहारिक आठवणी, व्यावहारिक स्मृती पुसून टाकावयाच्या नाहीत तर मनातील भावनात्मक सुरक्षिततेला चिकटून रहाण्याच्या आठवणी, सुरक्षेसाठी ज्या आठवणी उराशी बाळगलेल्या असतात त्या सर्वांचे ओझे झटकून टाकणे होय. अशा प्रकारच्या सर्व भावना पुसून टाकणे होय. प्रत्येक दिवस हा नवा, ताजा, प्रसन्न असे झाले तर जिवंतपणीच मृत्यूही जाणता येतो. अशा प्रसंगी मन पूर्णपणे रिक्त झालेले असते. एकापरीने मनाचा अंतच झालेला असतो. जेव्हां मृत्यू अनुभवावयास मिळतो तेव्हांच अगदी नवीन असे कांहीतरी उदयाला येते. मृत्यू म्हणजे ज्ञातापासून मुक्ती होय. म्हणूनच कृष्णजी एक विचार नेहमी मांडतात तो म्हणजे 'दुसऱ्याच्या व स्वतःच्या सत्तेतून मुक्त होणे म्हणजे कालच्या प्रत्येक गोष्टीचा मृत्यू होणे. म्हणजे मग तुमच मन नेहमी ताजं, टवटवीत, चिरतरूण, निरागस उत्साहात आणि उत्कट भावनेनं भरलेलं राहील' (The Life & Death of Krishnamurti महाराष्ट्र टाईम्स, २३-४-९५)


४.जी. आर. मलकानी-एक अद्वैत वेदान्ती 


मलकानी यांनी दृष्टिसृष्टीवाद स्वीकारला की,

जगताची निर्मिती ही ज्ञातृसापेक्ष होत असल्याने जगत निर्मितीसाठी ईश्वराची आवश्यकता भासत नाही म्हणून डॉ. मलकानी यांनी ईश्वरी कल्पनेचा त्याग केला आहे. त्यांनी सत्-चित्- आनंदा था ब्रम्ह लक्षणांचा परस्पर संबंधही विशद केला. ही लक्षणे नकारद‌र्शी मानली. सत्‌मुळे ब्रम्ह मायास्वरुपी नाही आणि चित् मुळे तुम्ह जडस्वरूपी नाही. आनंदामुळे ते कलेशकारी नाही हे सिद्ध होते, ब्रम्ह ही सत्यस्वरुवी आहे ते सान्त नाही.

ही चारही सत्तचित्‌ आनंद ब्रम्ह व्याकरणदृष्टाभावरूप असली तरी तार्किकदृष्ट्या अभावरुप आहेत.


************

उपसंहारामध्ये धर्म आणि विज्ञान याचा विचार केला आहे.


धर्म व विज्ञान दोन्ही मानवनिर्मित आहेत. दोन्हींत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न होतो. एक श्रद्‌धा तर दुसरे इंद्रियानुभव । बुद्‌धीवरच भिस्त असणारे. पण दोन्ही जीवन सुकर करु शकते.


विज्ञानाने मानवाने भौतिकदृष्ट्या जग जवळ आणले व एक मानवी प्रतिसृष्टीच निर्माण केली. विज्ञानाचे अत्युच्च शिखर गाठल्याने धर्माची गरज काय, तो हळू हळू नष्ट होणार?


धर्म - ( धृ. - धारण करणे) याचा उगम निश्चित सांगता येता नसला तरी इंद्रियांच्या मर्यादा उल्लंघन जाण्याचा मानवी प्रयत्न म्हणजे धर्म). याच्या विकासाच्या तीन अवस्था गॅलोवेने सांगितल्या.


१.जमातीचा धर्म - प्राचीन खेळ्यांमध्ये अदृश्य शक्तीला संतुष्ट करण्यासाठी धार्मिक विधींची सक्ती होती. धर्मतत्त्वांविरुद्‌ध वर्तन करणाऱ्यास कडक शासन होत.


२.राष्ट्रीय धर्म - अनेक शोध लागले. शेतीची कल्पना सूचली. माणूस स्थिरावला, पूर्वीच्या अदृश्य शक्तींना खूप महत्त्व आले. जे गुण मानवात नाही, ते ईश्वरात असलात ही कल्पना आली. त्यातून राज्य वराष्ट्राची दैवले गरली. धार्मिक परंपरा मूर्ती, मंदिरे, यज्ञयाग, जप, तप, तंत्र-मंत्र गोष्टी धमाल शिरल्या, कला, स्थापत्य, काव्य, नृत्य इ. साहाय्याने धार्मिक भावना जागृत करण्याचा प्रयत्न होऊ लागला.


३.वैश्विक धर्म - प्रगल्भ विचारसरणीमुळे धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. सामाजिक समता, आर्थिक स्वायत्तता, राजकीय स्वातंत्र्य इ.चा धर्माशी संघर्ष नाही असे मानले.


नीतीशास्त्रापासून धर्मशास्त्र अलग झाले नीती संपन्न धार्मिक असलाच पाहिजे असे नाही. कलाही संगीतकला, नृत्यकला, शिल्पकला अशा स्वतंत्र विकसित झाल्या.


* ही अवस्था म्हणजे धर्म ही व्यक्तिगत बाब मानण्याची !धर्म व्यक्तीला शांतता व समाधान देण्याचे साधन झाले जमात, राष्ट्र बंधने झुगारुन...


मग विज्ञान युगात समाजाला धर्माची गरज आहे का? या संबंधात आइन्स्टाइन म्हणतो,


Science has progressed to far in present day society. There must emerge a new Spiritual civilizationto make full use of it'


विचार, उच्चार व आचारातून श्रेष्ठ मूल्यांचे दर्शन घडले पाहिजे म्हणजे spiritual civilization उदयास येईल.

संदर्भ -तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत

लेखक- डॉ .बी. आर जोशी

Tuesday, May 13, 2025

भूलेश्वर मंदिर



 #भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर वसलेले आहे.  १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी करण्यात आले आहे.  पुण्याचे पेशव्यांचे आध्यात्मिक गुरू ब्रह्मेद्र स्वामी धवडशीकर यांनी या मंदिराला पुनर्रचना करावयाची कल्पना सांगितली.भुलेश्वर मंदिर संकुलात ३ मजले आहेत. पण खालचे २ मजले सर्वांसाठी रहस्यमयपणे बंद आहेत. मंदिराचा फक्त ३ या मजला खुला आहे.


मंदिरातील पिंड ही जमिनाखाली पोकळ स्वरूपाची आहे.एका भव्य नंदी मंडपात उजव्या दिशेला डोके असलेला महाकाय सुंदर नंदी आहे.ही शैली दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये आढळते. नंदीच्या पुतळ्याच्या वरच्या भागावर अष्ट दिक्पाल , नवग्रह अनेक देवता कोरल्या आहेत.


भूलेश्वर मंदिराला पुण्यातले वेरूळ म्हटले जाते.तेही बरोबरच आहे.सर्व भिंती,खांबांवर,छतावर अक्षरशः प्रत्येक इंचावर सुबक मूर्ती कोरल्या आहेत.पण सतत आक्रमणाने असंख्य मूर्ती तोडल्या आहेत,हे पाहून खूप हळहळ होते.

तरीही मंदिराचे सौंदर्य अप्रतिम आहे.या मंदिरात काही अद्भुत शिल्प आहेत.


१.भगवान गणेश, शिव आणि कार्तिकेय यांचे स्त्रीलिंगी शिल्प

हे दुर्मिळ शिल्पांपैकी एक असावे, जिथे नर देवतांना मादी म्हणून चित्रित केले जाते.या गणेशाला विनायकी गणेश म्हणतात. प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये, लिंग-तरलता असामान्य नव्हती. भगवान शिवाची अर्धनारीश्वर संकल्पना असो किंवा महाभारतातील अर्जुनाचे बृहन्नला बनणे असो, लिंग हे अंतिम स्वरूप नव्हते. 


२.चामुंडा

या चामुंडा शिल्पातील विंचू, चामुंडाचे शरीर फासळे अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत.




३.रामायणपट

वेरूळप्रमाणे येथेही रामयणपट आहे.यात मध्यभागी राम व लक्ष्मणाची सुबक मूर्ती आहे.यात सीता स्वयंवराचा प्रसंग कोरला आहे.


४.महाभारत युद्ध प्रसंग 

यात भीमाचा पराक्रम हत्तींसह युद्ध, भीष्म पराभव ओळखू येतात.शल्य वध सहज ओळखता येत नाहीत.

अर्जुनाने केलेला मत्स्य लक्ष्यभेद आणि द्रौपदी विवाह प्रसंग ओळखता येतो.





सुंदरी

अलौकिक सुंदर आभुषणांनी नटलेल्या, आकर्षक सौंदर्यंवती येथे कोरल्या आहेत.परंतू यातील दर्पण सुंदरीचे मुख भाव शिल्प यात नीट राहिले आहे.तरीही इतर वादकांचे वाद्य अतिशय सुबक आहेत.





समुद्रमंथन

समुद्र मंथन प्रसंगाखाली जी रत्ने मिळाली तीही इथे कोरलेली दिसतात.



६.मासोळी

शेषशायी विष्णू मंदिरात या मासोळी कोरलेल्या आहेत.अगदी ३ डी आर्ट वाटते.




दगडी कोरीव नक्षीदार द्वार

याची नक्षीदार  जाळी , अप्रतिम कलाकुसर आहे.



६.मंदिराचा गुबंद कळस आणि मिनार