लग्नासाठी जमलेली सर्व राजेमंडळी परतल्यानंतर द्रुपद, विराट आणि युधिष्ठिर यांनी, देशोदेशी आपले दूत पाठवून कौरव-पांडवांचे युद्ध उभे राहिल्यास आपल्या पक्षास मदत करण्याची निमंत्रणे आणि आवाहने त्यांच्याकडे रवाना केली.
दुर्योधनानेहि देशोदेशी असेच दूत पाठवण्याचा सपाटा चालविला. दुर्योधनाने बाप आणि अभिषिक्त सम्राट असा मोठा भाऊ जिवंत असता, राजसूययज्ञ करण्याचा भ्रष्टपणा केला होता. बलाने अगर मित्रत्त्वाच्या नात्यानेआपलीच बाजू खरी असल्याचे त्याने अनेकांना पटविले होते, त्यामुळे हे संदेश मिळताब विविध राज्यातून त्या त्या देशाच्या राजांनी ससैन्य हस्तिनापुराकडे तद्बत उपप्लाव्याकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.
- द्रुपदने पांडवांतर्फे बोलणी करण्यासाठी आपल्या राजपुरोहिताला योग्य अशा सूचना देऊन हस्तिनापुरी धृतराष्ट्राकडे पाठविले होते. (या नाही त्या पद्धतीने बोलणी लांबवून पांडवांना मित्रराजांना निमंत्रणे पाठविण्यास अवधी मिळण्याएवढा वेळ त्याने हस्तिनापुरात काढावा अशा सूचना त्याला दिल्या होत्या.
**यादवांना युद्धार्थ निमंत्रण
मध्यंतरीच्या काळात यादवांनी युद्धामध्ये आपल्या बाजूने लढावे अशी विनंती रामकृष्णांना करण्यासाठी हस्तिनापुराहून स्वतः दुर्योधन आणि उपप्लाव्याहून धनंजय द्वारकेत हजर झाले. त्यातहि दुर्योधनाने बाजी मारली तो अर्जुनाआधी कृष्णाच्या महालात पोचला. आणि त्याच्या डोक्याशी बसून राहिला.
दुर्योधन आला तेव्हा कृष्ण निद्रिस्त होता. पाठोपाठ आलेला अर्जुनही कृष्णाच्या शयनमंदिरात आला आणि त्याच्या पायाशी हात जोडून उभा राहिला. कृष्ण उठला तो समोर अर्जुन त्याच्या दृष्टीला पडला. मागे वळून पाहतो तो डोक्याशी दुर्योधन. कृष्णाने हसून दोघांचेहि स्वागत केले
कृष्ण हसला. म्हणाला 'दुर्योधना तू इथे पहिल्याने आला असलास तरी अर्जुन माझ्या दृष्टीस पहिल्याने आहे. दृष्टिप्रामाण्याच्या अनुरोधाने अर्जुनच माझ्याकडे पहिल्याने आपण असे होऊ शकेल, तरी पण मी तो तांत्रिक मुद्दा पुढे करीत नाही, तू पहिल्याने आलास, अर्जुन पहिल्याने मला दिसला. तेव्हा मी दोघांनाहि मदत करण्यास तयार आहे. तुम्हां दोघांचाही माझ्यावर सारखाच अधिकार लागू झाला आहे. पण रूड प्रथेनुसार हा अधिकारहि पहिल्याने अर्जुनाने वापरावयास हवा. कारण अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे, कारण प्रथेप्रमाणे लहानाचे समाधान पहिल्याने करायचे असते आणि सज्जन माणसे प्रथा काटेकोरपणे पाळतात. एका बाजूला मी, माझी एक अक्षौहिणी नारायणी सेना देणार आहे तर दुसऱ्या बाजूला मी स्वतः जाईन, मात्र मी युद्ध करणार नाही. तेव्हा लढणारे सैन्य आणि मी दोहोमधून तुम्ही निवड करायची आहे. मात्र निवडीचा पहिला अधिकार अर्जुनाचा. नंतर तुझा. माग धनंजया तुला काय हवे?
कष्णाने युक्तीने निर्णयाचा अधिकार अर्जुनाला दिला.
अर्जुनाने कृष्णाला आपल्या पक्षाकडे यायची विनंती केली. अर्जुनाने कृष्णाला मागितलेले पाहून दुर्योधन खूष झाला. त्याने नारायणी सेनेचा स्वीकार करून आनंदाने कृष्णाचा निरोप घेतला. कृष्ण म्हणाला, 'पार्था पण मी जरूर तुझ्या रथाचे घोडे सांभाळीन."
कृष्णाच्या महालातून बाहेर पडलेला दुर्योधन तडक बलरामाच्या महाली गेला. बलरामाने त्याला स्पष्ट सांगितले की, 'दुर्योधना तू माझा शिष्य आहेस. तुझ्यावर माझे प्रेम आहे. पण कृष्ण पांडवांच्या बाजूने उभा असता, मला तुझ्या बाजूने त्याच्या विरूद्ध लढणे शक्य नाही. खूप विचार करून या युद्धात मी तटस्थ रहाण्याचा निर्णय घेतला आहे. मी तीर्थयात्रेला जाणार आहे.' कृष्ण पांडवांकडे गेला तरी तो युद्ध करणार नाही आणि बलराम कुणाच्याच बाजूने लढणार नाही, म्हणजे पांडवांचा पराभव अटळ आहे, असे मांडे मनांत खात दुर्योधन द्वारकेहून हस्तिनापुरी परतला.
**शल्यावर धर्मसंकट
दुर्योधनाने मद्र देशाच्या बलाढ्य राजाला, महारथी शल्याला, मोठ्या युक्तीने फसवून आपल्या बाजूला दाखल केले. शल्य माद्वीसुत नकुलसहदेवांचा मामा होता. युद्ध सहाय्यार्थ युधिष्ठिराचे निमंत्रण आल्यानंतर तो ससैन्य उपप्लाव्यनगरी निघाला. मजल दरमजल करीत शल्य आपल्या एक अक्षौहिणी सैन्यासह युधिष्ठिराकडे निघाला असता, मुक्कामाच्या निरनिराळ्या ठिकाणी त्याची आणि त्याच्या सैन्याची रहाण्याची चोख व्यवस्था दुर्योधनाने केली. ही सारी व्यवस्था युधिष्ठिराकडूनच होत असावी अशी 'शल्याची समजूत होती. त्याने एका मुक्कामी युधिष्ठिराचे जे सेवक ती व्यवस्था करीत असतील त्यांना आपल्यापुढे उपस्थित रहाण्याची आज्ञा केली. आपण त्यांना ते मागतील ते भेट देणार आहोत, असेहि त्याने जाहीर केले. हे कळल्यावर, दुर्योधन शल्यापुढे हजर झाला. आपली आणि आपल्या सैन्याची इतकी चोख व्यवस्था दुर्योधनाने ठेवली होती हे समजल्यावर शल्य चकित झाला. पण त्याच्या तोंडून शब्द गेला होता. त्यामुळे दुर्योधनाच्या मागण्याप्रमाणे त्याला उपप्लाव्या ऐवजी हस्तिनापुराकडे सैन्याचा मोहरा वळवावा लागला. धर्मज्ञ युधिष्ठिर म्हणाला, 'मामा, क्षत्रियाने शब्दाला जागले पाहिजे. आपण दुर्योधनाच्या बाजूने लढलात तर त्यात आपला दोष नाही. पण आपण आमचे आप्त आहात. जगात महारथी म्हणून जसा तुमचा लौकिक आहे, तद्वत् सारथ्य कर्मात कृष्णाच्या तोडीचे सारथी म्हणूनही आपला लौकिक आहे. युद्धात राधेय आणि अर्जुन यांचा जेव्हा संग्राम उभा राहील तेव्हा राधेयाचे सारथ्य करण्याची विनंती तुम्हाला होणारच. | आपल्या सारख्या महारथ्याला दुसऱ्या महारथ्याचे सारथ्य करावयाला लागणे अपमानाचे खरे. पण आमच्यासाठी ते मान्य करा. आणि आयत्यावेळी राधेयाचा तेजोभंग करा शल्याने ते मान्य केले. आणि तो आपल्या सैन्यापाठोपाठ हस्तिनापुरी निघून गेला
युधिष्ठिराने शल्याकडून राधेयाचा तेजोभंग करण्याचे वचन घेणे हा प्रसंग मागून घेतला गेला असावा असे वाटते. कारण महारथी शल्यावर कर्णाचे सारथ्य करण्याचा प्रसंग येईल हे भविष्य युधिष्ठिराला माहीत होते असे समजणे बुद्धीला पटण्यासारखे नाही.
**संजय शिष्टाई
कावेबाज धृतराष्ट्राने आपला दूत म्हणून पांडवांशी बोलणी करण्याकरिता ठरल्याप्रमाणे संजयाला उपप्लाव्य नगरीस पाठविले.
त्याने राजाज्ञेप्रमाणे पांडवाच्या धर्मानुरूप वागण्याच्या वृत्तीचे कौतुक करून त्यांनी आपले राज्य परत मागण्याचा क्षुद्र प्रकार आपली धर्मवृत्ती सोडून करू नये, कारण त्यातून एकंदर जगाचा विध्वंस करणारे महायुद्ध उभे राहील, आणि त्याचे सर्व उत्तरदायित्त्व, पाप आणि दोषारोप अत्यंत धार्मिक अशा तुम्हा पांडवांवर येईल. कारण युद्धात कुणाचाहि जय झाला किंवा पराजय झाला तरी त्यातून काहीहि निष्पन होणार नाही, असा राजाचा संदेश त्यांना ऐकविला. चुलत्याचा हा संदेश ऐकून युधिष्ठिरहि चकित झाला. दुर्योधनापेक्षाहि आपला चुलंता अधिक दुष्ट आहे याची त्याला खात्री पटली.
संजयाने युधिष्ठिराला राजाचे म्हणणे आणखीहि ऐकवले म्हणाला, 'युधिष्ठिरा, सुख दुःख हे ज्याच्या त्याच्या भाग्यावर अवलंबून असते. म्हणूनच मनुष्याने मिळेल तेवढ्यावर संतुष्ट राहावे. माणसाने जपावे ते चारित्र्य. जगावे ते धार्मिकपणे, लोक तुला धार्मिक म्हणतात. कुरुकुलाची धर्मपताका उंचफडकावीत ठेवणे हे तुझे काम आहे. दुर्योधन तर पतित आहे. तो लान कोळून प्याला आहे. पण तू चांगला आहेस, आजवर धर्म वृत्तीने वागत आला आहेस. तीच कीर्ती शेवटी बरोबर येणार आहे. पुत्रा, मला महिती आहे कुलनाशक युद्ध करण्याऐवजी बंधूंसह द्वारकेला भिक्षा मागणेहि तू पसंत करशील. कारण तुला माहित आहे की राज्य कुणाचेच टिकले नाही. धमपिक्षा राज्य मोठे नाही. धर्माची पताका सांभाळण्यासाठी जग आज तुझ्याकडे डोळे लावून बसले आहे."
संजयाच्या बोलण्याचा आणि चुलत्याच्या संदेशाचा युधिष्ठिर प्रमुख पांडवांच्या मनावर एवढा परिणाम झाला की, खरोखरच कुलनाशक युद्ध टाळून राज्यावरचा अधिकार सोडून द्यायला ते तयार झाले. कृष्णाने म्हणूनच धार्मिक परिभाषेतच संजयावर आणि पर्यायाने त्या कणिकशिष्य धृतराष्ट्रावर बाजू उलटविली. उद्योगपर्वाच्या एकोणतिसाव्या अध्यायात कृष्णाचे ते भाषण आले आहे
कृष्ण म्हणाला, 'संजया आम्हाला मोठा धर्माचा उपदेश तू करतोस. माझ्यापेक्षा आणि या धर्मराजापेक्षा तुला धर्म अधिक समजतो काय? प्रत्यक्ष धर्मालाच तू धर्माचा उपदेश करतोस ? धर्म तुला कळतो तर मला सांग, क्षत्रियांचा घुर्म कोणता ? न्यायासाठी युद्धाला सामोरे जाणे की, पाठ फिरविणे? जे राज्य पांडवांचे आहे, ते गिळंकृत केले असताना आणि राजा धृतराष्ट्र त्यांना ते पुन्हा कधीहि परत मिळू नये म्हणून कारस्थाने करीत असताना, राजधर्माची त्याला पुसटशीहि ओळख आहे असे कसे म्हणता येईल ? धर्माची ढाल करून राजा धृतराष्ट्र आपला लोभ, मनाचा पाताळयंत्री दुष्टपणा, कदूपणा झाकू पाहत आहे. संजया, तुला थोडा धर्म तरी समजत असला, तर, तू त्याचा उपदेश धृतराष्ट्राला आणि त्याच्या पुत्रांना कर. असल्या पापी अधर्मी लोकांचे अन खाऊन प्रष्ट झालेला तू आम्हांला धर्मोपदेश करतोस? जा, धृतराष्ट्राला आणि त्याच्या पुत्रांना जाऊन सांग 'पांडव त्यांची सेवा करायला सिद्ध आहेत आणि त्यांच्याशी युद्ध करायलाहि सिद्ध आहेत. धर्मनिष्ठ पांडव जसे शांततेचे पुरस्कर्ते आहेत तद्वत् ते समर्थ आणि अद्वितीय योद्धेहि आहेत ही गोष्ट लक्षात ठेवून पुढचे पाऊल टाका.'
कृष्ण नसता तर, संजय शिष्टाईच्या जाळ्यात युधिष्ठिर अडकला असता, यात शंका नाही. संजयाला आणि पर्यायाने धृतराष्ट्राला गार करून टाकणाऱ्या धार्मिक परिभाषेतील या चपराकीने धृतराष्ट्राचे तोंड मिटले ते कायमचे.
कृष्णाने संजय शिष्टाई उलटविताना समाजातील विविध थरातील लोकांच्या स्वधर्म पालनाची मांडलेली चिकित्सा फार महत्वाची आहे. कर्म किंवा धर्माची इथे त्याने केलेली व्याख्या गीतेत विस्ताराने स्पष्ट झाली आहे. चोराच्या हातून आपल्या संपत्तीचे रक्षण करणे आपला धर्म आहे. इंग्रजी कायदा यालाच न्याय म्हणतो. राष्ट्राच्या दृष्टीने तसे करणे म्हणजे राष्ट्रभक्ती ठरते. कृष्ण त्याला स्वधर्म-पालन म्हणतो.
**कृष्ण-शिष्टाई
संजयाला परत पाठवून कृष्णाने पांडवांतर्फे बोलणी करण्यारिता स्वतः हस्तिनापुरास जाण्याचे ठरविले. उद्योगपर्वातील हा भाग महत्त्वाचा
कृष्णाला संधी मान्य होता का ? शिष्टाई प्रकरणाचा एकंदर विचार केला तर, कौरवांशी संधी करणे आणि त्यामुळे युद्ध टाळणे शक्य होईल असे कृष्णाला वाटत होते असे दिसत नाही
कृष्ण म्हणाला, 'मी दैव काही बदलू शकत नाही. दुर्योधन दुष्ट आहे. लोकलज्जा सोडून वागत आहे. स्वतःच्या अपकृत्यांचा त्याला काडीमात्रहि पश्चाताप नाही. कर्ण, शकुनी दुःशासन त्याच्या दुष्ट मनोवृत्तीला चेतावणी देत असताना, तुमचा वाटा परत देऊन शांती घडवून आणणे त्याला अशक्य आहे तेव्हा त्याचा वध हा एकच मार्ग आता उरला आहे. लहानपणापासून तुमच्यावर अन्याय करीत आलेला दुर्योधन माझ्या दृष्टीने तर वध्य आहेच.'
शिष्टाईसाठी पाठविताना फक्त पांच गांवांवर संतुष्ट होण्याची सुचिभिराची सिद्धता असली तरी ती कल्पना कृष्णाला पूर्णपणे अमान्य होती. हस्तिनापुरी जाण्यासाठी प्रस्थान ठेवण्यापूर्वी, कृष्णाने द्रौपदीलाहि स्पष्ट सांगितले होते की, मी जरी संधी करण्याच्या हेतूने कौरवांच्या दरबारात जात असलो तरी दुर्योधनादी कौरव माझे म्हणणे मानतील आणि संधी करतील असे मला मुळीच वाटत नाही. युद्ध अटळ असून पुढल्या काही दिवसातच साऱ्या कौरवांचे धारातीर्थी पतन होईल आणि त्यांच्या बायकांना धाय मोकलून रडताना दू पहाशील'
इथे प्रश्न असा उपस्थित होतो की संधी होणार नाही हे स्पष्ट दिसत असताना के बंकीमचंद्र म्हणतात त्याप्रमाणे, केवळ आपले कर्तव्यकर्म म्हणून कृष्ण शिष्टाई साठी हस्तिनापुरी गेला का? कै. बाळशास्त्री हरदासांनी, 'भगवान् श्रीकृष्ण' ह्या आपल्या ग्रंथात कृष्णशिष्टाईची जी कारणे दिली आहेत ती कृष्णाच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा आणि व्यवहारी दृष्टीकोनाचा विचार करता कुणालाहि पटण्यासारखी आहेत
पहिले कारण, युधिष्ठिराचा भ्रमनिरास; आणि तो त्याला प्रसन्न राखून करायचा होता. संजयशिष्टाई कृष्णाने उलटवून लावली असली, तरी तिचा युधिष्ठिराच्या मनावर इतका विलक्षण परिणाम झाला होता की कृष्ण नसता तर सर्वस्व त्याग करून आणि संन्यास घेऊन युधिष्ठिराने शांती पदरात पाडून घेतली असती कृष्णाच्या आग्रहामुळे कौरवांकडे आपल्या राज्याची नव्हे पांच गावांची तरी मागणी करायला तो तयार झाला. संजय शिष्टाईचा युधिष्ठिरावर नव्हे तर साऱ्या पांडवांवर तसाच परिणाम झाला होता.
लोकापवाद टाळणे, या कृष्णशिष्टाईचा दुसऱ्या कारणाचा उल्लेख मागे आला आहेच. कृष्ण उभय पक्षाचा नातलग होता. पांडवांप्रमाणे कौरवसभेतही त्याच्या शब्दाला मान होता. एक बलवंत योद्धा आणि बुद्धिमान राजकारणी म्हणून त्याचा सर्वत्र लौकिक झाला होता. कौरव-पांडवांचे युद्ध टाळणे कृष्णाने खटपट केल्यास शक्य आहे, असे खुद्द बलरामालाही वाटत होते.) तेव्हा आपणकाही केले नाही असे होऊ नये, आपण सर्व प्रयत्न करून कौरवांच्या हटवादामुळे यशस्वी झालो नाही असे सिद्ध करण्यासाठी कृष्ण शिष्टाईला तयार झाला.
भीष्म द्रोण आणि कृपाचार्य इत्यादी स्वतःला न्यायी, धार्मिक समजणाऱ्या लोकांच्या मनात, कौरवांच्या बाजूने समजले जाणारे त्यांचे खङ्ङ्ग अन्यायाच्या बाजूने समजले जात आहे हे स्पष्ट करून, त्यांची युद्धाची उत्साहशक्ती नष्ट करणे आणि त्यातून पांडवांच्या विजयाचा मार्ग मोकळा करणे, हा कृष्ण शिष्टाईमागील पहिला राजकीय हेतू होता.
प्रत्यक्ष हस्तिनापुरात जाऊन कौरव पक्षाचे बलाबलहि त्याला आपल्या दृष्टीखालून घालायचे होते. कौरवांकडील जिद्दी, युद्धनिपुण, श्रेष्ठ धनुर्धर, बलिष्ठ योद्धा, महारथी कर्ण होता.
दुर्योधनाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे ते जनित्र होते. या कर्णाचा तेजोभंग करून त्याचा रणोत्साह संपवावा असेहि कृष्णाच्या मनात होते.
कर्ण संपला की कौरवांचा पक्ष जवळ जवळ संपला, याची त्याला जाणीव होती. हस्तिनापुरी जाण्याचे तेहि एक महत्वाचे कारण होते. याशिवाय कौरवपक्षीय योद्धयांची परस्परात फूट किंवा मतभेद किती आहेत ते अजमावून पाहोणे, जो आपल्या दृष्टीने वध्य आहे तो जगाच्याहि दृष्टीनेच नव्हे तर त्याच्या पक्षाला साहाय्य करण्याऱ्या लोकांच्याहि दृष्टीने वध्य ठरविणे आवश्यक होते, म्हणूनहि कृष्ण हस्तिनापुरी गेला. आपल्या या विविध राजकीय हेतूंचे स्पष्टीकरण कृष्णाने उद्योगपर्वात अनेक ठिकाणी केले आहे. (म. भा. उ. प. अ. ७३, ७९)
**कृष्णाची स्वसंरक्षणाची तयारी
कौरवांच्या राजनगरीत हस्तिनापुरात शिष्टाईसाठी जात असता, कृष्ण केवळ स्वतःच्या ईश्वरी सामर्थ्यावर विसंबून तिथे गेला, आणि दुर्योधनाने त्याला बंदी करण्याचा घाट घातला, तेव्हा तो आपल्या ईश्वरी सामर्थ्यामुळेच त्यातून सुटला, असे सांगण्याचा आणि समजण्याचाहि प्रघात आहे. महाभारतानुसार तर ही समजूत खोटी आहेच, पंण अधार्मिकांना निखंदून, धर्मनिष्ठ राज्यसंस्था निर्माण करण्याचे आपले जीवनध्येय गाठीत असता, सर्वसामान्यापुढे एक मार्गदर्शक आदर्श ठेऊ पहाणारा कृष्ण, त्याच्यामधे असली, तरी ती ईश्वरी शक्ती प्रकट करण्याचा संभव नाही. मानवतेचा मार्गदर्शक ही भूमिका मानवाप्रमाणे वागण्यानेच सिद्ध होणार होती. त्यामुळे कुरुसभेत जाताना तिथे संभवनीय असलेले सर्व धोके विचारात घेऊन, आपल्या संरक्षणाची कडेकोट सिद्धता करून, कृष्ण हस्तिनापुरात गेला होता. त्यामुळेच हस्तिनापुरात जाताना त्याचा रथ सर्व शस्त्रास्त्रांनी सिद्ध होता. त्याच्या बरोबर दहा यादव महारथी, सात्यकीच्या नेतृत्वाखाली हस्तिनापुरास निघाले होते. एक हजार पायदळ, एक हजार घोडेस्वार, खाण्यापिण्याचे भरपूर साहित्य, विपुल सेवक, त्यानी बरोबर घेतले होते. (म. भा. उ. प. अ. ८४ श्लोक १, २) शिवाय दुर्योधनाच्या मदतीसाठी दिलेल्या नारायणी सेनेचा सेनापती हार्दिक्य कृतवर्मा, आपल्या एक अक्षोहिणी सेनेसह, म्हणजे जवळ जवळ अडीच लक्ष सैन्यासह, हस्तिनापुरी तळ देऊन बसला होता. आणि कृष्ण हस्तिनापुरात येत असल्याच्या सूचना त्यालाहि पोचल्या होत्या. कुरू-पांडवांच्या युद्धात तो पांडवांच्या विरूद्ध लढणार असला, तरी कृष्ण-कौरव संघर्ष उभा राहिल्यास तो कृष्णाच्याच बाजूने उभा राहणार होता, ही गोष्ट स्वतःसिद्ध होती.
बरोबर कृष्णाने खाद्यपेयादी पदार्थ घेतले होते. कारण कृष्णासारख्या पांडवांच्या आधारशिलेबर प्रहार करण्याची एकहि संधी कौरव सोडणार नाहीत, याची कृष्णाला कल्पना होती. कृष्णाच्या पहिल्या मुक्कामावर वृकस्थल येथे तो व त्याच्या सैनिकांच्या आदरातिथ्याची संपूर्ण व्यवस्था करण्याचा धृतराष्ट्राने केलेला प्रयत्न त्या दृष्टीने बोलका आहे.
भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या गणनेप्रमाणे शालिवाहन शकपूर्व ३१८० व्या वर्षी, कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी, सकाळी, सर्व आन्हिके उरकून, कृष्णाने रेवती नक्षत्रावर, उपप्लाव्य नगरीतून, हस्तिनापुरासाठी प्रयाण केले. वृकस्थली सारख्या ठिकठिकाणच्या मुक्कामी जनपदवासीयांशी हितगुज करीत धृतराष्ट्र आणि दुर्योधनाने केलेल्या व्यवस्थेचा आव्हेर करीत कृष्ण हस्तिनापुराकडे निघाला. प्रत्येक ठिकाणी उतरण्याची सोय कृष्णाने आपल्या बरोबर ठेवली होतीच.
**हस्तिनापुरी स्वागत
हस्तिनापुरच्या प्रवेशद्वारी कृष्णाचे भव्य स्वागत झाले. युवराज दुर्योधन सोडून धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, भीष्म, द्रोण, कृप, कुरुसभेतील ज्येष्ठ, श्रेष्ठ, अमात्य, भारत, ज्येष्ठ पौरजन, त्याच्या स्वागतार्थ उपस्थित होते. कृष्णाने सर्वांना यथोचित वंदन करून धृतराष्ट्राचा स्वागत सन्मान स्वीकारला आणि सर्वांशी हसत, खेळत, बोलत त्यांचा निरोप घेतला. दुःशासनाच्या महालात त्याची उतरावयाची सोय केली आहे हे सांगायला, कुणाला अवसरहि न देता आपली आत्याबाई कुंती हिला भेटण्याच्या मिषाने कृष्ण राजभवनातून निघून विदुराधरी गेला.
कृष्णावर देवत्व लादणारी मंडळी, भगवान् श्रीकृष्ण, दुर्योधन करीत असलेला आदर सत्कार अव्हेरून आपल्या गरीब भक्ताकडे, विदुराकडे, त्याच्या. घरच्या 'कण्या खायला' गेले, अशी विकृत वर्णने करीत असतात. यातला कीर्तनकारी भाबडेपणा सरळ आहे, एकतर विदुर गरीब नव्हता. तो कौरवांचा महामंत्री होता. सद्वर्तनी होता. धर्मनिष्ठ होता. म्हणून कृष्ण त्याच्याकडे उतरला. आणि दुसरे म्हणजे कौरवांसारख्या दुष्ट मंडळींकडून आदरसत्काराच्या निमित्ताने होणारा धोकाहि त्याला टाळायचा होता.
**आतिथ्याला नकार
कृष्णाने कुंतीची भेट घेऊन तिला तिच्या पुत्रांचे कुशल सांगितले. संघी नच झाल्यास ते युद्धालाहि तयार असल्याचे तिला सांगून, तिला वंदन, करून युवराज दुर्योधनाच्या खाजगी भेटीसाठी कृष्ण गेला. आपल्या मित्रमंडळीसमवेत भोजनाला थांबण्याचीहि त्याने विनंती केली. पण कृष्णाने नम्रपणे ते निमंत्रण नाकारले. यावर दुर्योधन म्हणाला. 'कृष्णा पांडवांचा आणि आमचा तू सारखाच सहाय्यक आणि नातेवाईक आहेस. दोघांच्या हिताची तुला काळजी आहे. म्हणूनच तुझ्या वाटेवर तुझ्यासाठी सुखसोयी निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. इथेहि दुःशासनाच्या मंदिरात तुझ्या उतरण्याची सोय केली. पण तू त्यांचा अव्हेर केलास. कृष्णा तुला धर्मार्थाने चांगले ज्ञान आहे. तरीहि तू असे करावेस याचे आश्चर्य वाटते.' इथे दुर्योधनाला असे सुचवायचे होते की, कृष्ण ज्या कार्यासाठी तिथे आला होता त्याच्या फलद्वफ्तेसाठी कौरवांना प्रसन्न राखणे राजनीतीच्या दृष्टीने आवश्यक होते.
यावर कृष्ण म्हणाला, 'मी दूत म्हणून इथे आलो आहे. दूत आपल्या कार्यात सफल झाले तरच सत्कार घेतात. मी ज्या कार्यासाठी इथे आलो आहे ते सफल झाले तर तू हवा तितका माझा सत्कार कर. तो मी घेईन,' त्यावर दुर्योधन म्हणाला, 'तुझे कार्य सफल होवो अगर न होवो, त्याचा आणि तुझा आम्ही करीत असलेल्या या सत्काराचा काही संबंध नाही. तू आमचा संबंधी आहेस. तुझ्यात आणि आमच्यात काही संघर्ष नाही. आमच्या बरोबर भोजनहि न करावे बाला काही कारण आहे का?
यावर कृष्ण प्रसन्नपणे हसून म्हणाला, 'दुर्योधना, दोन कारणासाठी लोक एकमेकांकडे भोजन करतात. एकमेकांवर प्रेम असेल तर माणसे एकमेकांकडे भोजन करतात. किंवा एखाद्याची अन्नान्न दशा झाली असली, तर माणूस कुठलेही अन्न पत्करतो. दुर्योधना, तुझ्या माझ्यात प्रेम नाही. आणि माझी अन्नान्न दशा झालेली नाही. तेव्हा मी तुझ्याकडे जेवणार नाही. तू तुझ्या माझ्यात कोणते वैर आहे विचारतोस? एक सांग, धर्मनिष्ठ पांडवांशी पूर्णपणे एकरूप झालेल्या माझे, पांडवांचा द्वेष आणि त्यांचा अनन्वित छळ करून तू काही अप्रिय केले नाहीस, असे वाटते तुला? तुमच्या त्या साऱ्या पापांचा पाढा वाचायला हवा? दुर्योधना, तूच काय, पण तुमच्या येथील कुणाचेहि अन्न मी खाण्याच्या योग्यतेचे नाही. ते दुष्टांचे अन्न आहे. ते पापाने डागळले आहे. तुझ्या राज्यात मी ज्याच्याकडे जेवावे असा योग्यतेचा फक्त एकटा विदुर आहे. (म. भा. उ. प. अ. ९१
दुर्योधनाघरचे भोजनाचे निमंत्रण नाकारताना, भीष्म, द्रोण, कृप, बाल्हीक यांच्या घरचे अन्नही पापाचे आहे, म्हणून स्वतःला ग्रहण करण्यास अयोग्य आहे, असे सर्वासमक्ष बजावण्यात, कृष्णाने भेदनीतीचा उच्चांक गाठला.
कौरव सभेत दुसऱ्या दिवशी कृष्णाची आन्हिके चालू असताना, युवराज दुर्योधन आणि गांधारराज शकुनी त्याला कुरुसमेत घेऊन जाण्यासाठी हजर झाले. कृष्णाने आन्हिके आटोपली. स्वसंरक्षणाची सर्व सिद्धता आहे ना? याची खात्री करून घेतली. आणि तो रथारूढ झाला. महाभारतकारांनी कृष्णाच्या कुरुसभेतील प्रवेशाचे, सर्वाशी सस्नेह पण सावध रीतीने वागण्याचे उत्कृष्ट वर्णन उद्योगपर्वाच्या ९४ व्या अध्यायात केले आहे.
सर्वत्र शांतता पसरली. कृष्णाचे भाषण ऐकावयास सर्व आतूर होते.
कृष्ण जगातील एक उत्कृष्ट वक्ता गणला जातो. उपन्यास, विविध मुद्यांचा विस्तार, ते करीत असताना स्वरांचा चढ उतार, धीरगंभीर आवाज, विशिष्ट शब्दांवरील आघातांनी विशिष्ट परिणाम साधण्याची क्रिया, या दृष्टीने ते वक्तृत्व अमोघ होते. आपलया भाषणांत धृतराष्ट्राला उद्देशून आपल्या येण्याचे प्रयोजन प्रथम त्याने स्पष्ट केले.
म्हणाला, 'राजा धृतराष्ट्रा, क्षत्रिय वीरांचा विनाश न होता कौरव व पांडव यांच्यात शांतता नांदावी व संधी व्हावा म्हणून मी येथे आलो आहे.' त्यानंतर कुरुकुलाची स्तुती करून, कुरुप्रमुख म्हणून त्याच्या उत्तरदायित्त्वाचा उच्चार करून, त्याचे दुर्योधनप्रमुख पुत्र, धर्म व राजकीय नीतिमत्ता यांच्याकडे पाठ करून नृशंसाप्रमाणे वर्तत असल्याचे सांगून, सभ्यपणाची मर्यादा सोडून त्यांनी आपल्या बंधूंची आणि बंधुस्त्रीची केलेली विटंबना, आणि त्यामुळे निर्माण झालेली जगाचा विनाश करणारी परिस्थिती, यांचा आढावा घेऊन कृष्ण म्हणाला. 'राजा, आज शांतता केवळ दोन व्यक्तींच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्या दोन व्यक्ती म्हणजे एक तू आणि दुसरा मी. तू आपल्या पुत्रांना आवर. मी पांडवांना आवरतो. त्यांतच तुझ्या पुत्रांचे आणि पांडवांचे हित आहे. कौरवपांडव एक झाले, पांडवांचे समर्थ बल तुझ्यापाठी उभे राहिले, तर देवेंद्रालाहि तू अजिंक्य होशील, जगाचा तू एकछत्री सम्राट बनशील. संधी घडवून आण. त्यासाठी तुझ्या दुष्ट मुलांना ताळ्याबर आण. युद्धासाठी निमंत्रिलेल्या या हजारो राजांना त्यांचा सत्कार करून परत पाठव. राजा, उभय पक्षांनी एकमेकांचा नाश करण्यात काय हंशील आहे? कोणता धर्म आहे? तुला काय सुख आहे? पांडवाना न्यायानुसार त्यांचे राज्य परत करण्यास तुझ्या पुत्रांच्या कोणत्या अधिकाराचा अपहार आहे? पांडवांवर तुझ्या पुत्रांनी कोणकोणते अत्याचार केले, सम्राज्ञी द्रौपदीची कशी कशी विटंबना केली या गोष्टींचा पाढा वाचून इथे पुन्हा कडवटपणा निर्माण करण्याकरिता मी आलो नाही. तुझ्या पुत्रांना तू आवर, एवढेच मला तुला स्पष्टपणे सांगायचे आहे. तुझी इच्छा असली तर पांडव तुझी सेवा करायला तयार आहेत. तुझी तशीच इच्छा असली तर ते युद्ध करायलाही सिद्ध आहेत. युद्ध की शांतता याची निवड तू करायची आहेस. शांततेच्या यशाचा वाटेकरी व्हायचे की विनाशाच्या अपकीर्तीचा वाटेकरी व्हायचे हे तुझे तूच ठरवायचे आहेस.'
कृष्णाने युक्तीने येऊ घातलेल्या युद्धापत्तीचे उत्तरदायित्त्व धृतराष्ट्राच्या माथी ठेवल्यामुळे, एरवी ढोंगीपणाने मोठेपणा घेऊन स्वार्थ पदरात पाडून घेणारा, दुष्ट कृती करवून नामानिराळा राहणारा धृतराष्ट्र, कृष्णाच्या या पवित्र्याने गोंधळून गेला. सहस्त्रावधी राजांच्या समक्ष, घडलेल्या अनेक अनैतिक, आणि अधार्मिक प्रसंगांचे दायित्व दुर्योधनावर ढकलून धृतराष्ट्र मोकळा झाला. आपला मूर्ख, दुष्ट मुलगा आपले मुळीच ऐकत नाही. गांधारी, विदुर, भीष्म यांच्याहि म्हणण्याला भीक घालीत नाही. तो महान् पापबुद्धी, क्रूर व प्रष्टचित्त आहे. त्या दुरात्म्याला आपण काही सांगू शकत नाही. कृष्णा तूच त्याला वळवू शकलास तर जगत्कल्याणाचे एक मोठे कार्य तुझ्या हातून घडेल. असे त्याने कृष्णाला सांगितले.
कौरव पक्ष अन्यायी आहे, याची स्वतः धृतराष्ट्राकडून प्रकट उद्घोषणा करवून कृष्णाने एक बाजी मारली. (उ. प. अ. १२४, ८ ते ६२) दुर्बलांकडून संरक्षण अपेक्षू नये. दुःशासन, शकुनी किंवा कर्ण है त्याला हवे असलेले ऐश्वर्य मिळवून देण्यास असमर्थ आहेत, हे त्याने जाणावे, त्याच्याकडे असलेले भीष्म, द्रोण, कर्ण, भूरिश्रवा, अश्वत्थामा, जयद्रथ ही मंडळी प्रतियोद्धे म्हणून भीमार्जुनांपुढे उभे राहू शकत नाहीत, याचे सम्यगुज्ञान मनी धरून, लाखो लोकांची हत्या व्हायला त्याने कारणीभूत ठरू नये. असे कृष्णाने दुर्योधनाला बजावले.
'सर्वनाश होऊ नये म्हणून पांडवांशी संधी कर. तुझ्या राज्याच्या विभागात पांडव धृतराष्ट्राला राजा आणि तुला युवराज म्हणून नियुक्त करतील. वैभवाला लाथाडून बिनाश करून घेऊ नको. मित्रांना आनंद दे. सर्वाचा दुवा घे.' कृष्या अगदी तळमळीने बोलला होता. त्यातून पांडवांचा पक्ष अल्पसंख्यांकांचा आहे या गोष्टीवरून सर्वांचे लक्ष उडवून, बहुसंख्य मंडळी असलेला कौरवांचा पक्ष अन्यायी असल्याचे कृष्णाने दुर्योधनाला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले. केवळ एका व्यक्तीच्या हटवादासाठी अधार्मिक कौरव, नाश ओढवून घेत आहेत हे त्यांच्या सहाय्यकांनाहि कृष्णाने पटविले. कुरुवृद्ध तर भर सभेत दुर्योधनालाच उपदेशू लागले. त्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे दुर्योधन संतापला. मोडेन पण वाकणार नाही या आपल्या वृत्तीचे त्याने प्रदर्शन केले. 'समरांगणातील मृत्यूला क्षत्रिय घाबरत नाहीत', असे सांगून सुईच्या अग्राने उकरली जाईल एवढीदेखील भूमी, हक्क म्हणून पांडवांना न देण्याचा आपला कृतनिश्चय त्याने घोषित केला
कृष्णाच्या या जोरदार भाषणामुळे दुर्योधनाची चांडाळ चौकडी चिडली, संतापली. भयचकित झाली. आणि उद्दामपणे सभात्याग करून सभेतून निघून गेली.प्रत्यक्ष अपराध करणारा म्हणून दुर्योधन जितका दोषाला पात्र आहे, तितकेच त्याच्या अपराधाकडे प्रेक्षकाच्या भूमिकेवरून पाहणारे, स्वतःच्या सामर्थ्याचा उपयोग न करणारे, म्हणून तुम्हीहि तितकेच दोषी आहात, असे त्याने कुरूवृद्धांना बजावले. त्यांनी सर्वांनी आपला सामर्थ्याचा उपयोग करून दुर्योधन, शकुनी, कर्ण व दुःशासन यांना बंदी करून पांडवांच्या स्वाधीन करावे, कारण ग्रामाच्या संरक्षणासाठी कुळाचा परित्याग करावा, देशाच्या संरक्षणासाठी ग्रामाचा परित्याग करावा व आत्मकल्याणासाठी पृथ्वीचा परित्याग करावा असे नीतिशास्त्र सांगते. कुरुकुल वाचावे म्हणून हे करणे आवश्यक आहे. तुमच्या शांततेच्या आणि सुजनतेच्या घोषणा प्रामाणिकपणाच्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी हे आवश्यक आहे असेहि कृष्ण त्यांना म्हणाला.
कृष्णाच्या या सरळ सूचनेने कुरुवृद्धांचा पुराच दंभस्फोट होऊन ते अगदीच उघडे पडले. गोंधळलेल्या धृतराष्ट्राने विदुराकडून गांधारीला बोलावून, तिच्याकडून दुर्योधनाला उपदेश करण्याचे नाटकहि घडवून आणले, पग दुर्योधनावर त्याचा काही परिणाम झाला नाही. कृष्णाच्या अमोघ वक्तृत्वाचा दुर्योधना सहाय्यक असलेल्या पित्यावर एवढा परिणाम झालेला पाहून कृष्ण आणखी थोडावेळ बोलत राहिला तर आपला पिता आपणा सर्वांना बांधून त्याच्या स्वाधीन केल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा त्या आधी आपणच कृष्णाला बंदी करावे आणि हे प्रकरण संपवावे असा विचार दुर्योधन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला.
त्यांचे हे विचार केवळ त्यांच्या चेहऱ्यावरील भावावरून ओळखून कृष्णाचा परक्रमी सेनानी सात्यकी याने कृष्णाच्या संरक्षणाची तात्काळ सिद्धता केली. (उ. प. अ. १३० श्लोक ८ ते १७) कृतवर्याला सूचना दिली. त्याने आपल्या यादव सैन्यासह राजभवनाला वेढा देऊन राजसभेचे दार रोखून तो उभा राहिला, त्यानंतर सात्यकीने सभेत येऊन, दुर्योधनाचा कृष्णाला बंदी करण्याचा मानस आणि त्याने तशा दृष्टीने केलेली सिद्धता, याचा जाहीर उच्चार केला. 'कृष्णाला बंदी करणारे हातच नव्हे, त्यांची शरीरेसुद्धा दग्ध केल्यावाचून यादव राहणार नाहीत' असेहि त्याने जाहीर केले. त्याचे हे भयंकर उद्गार ऐकताच, कुरुसमेत एकच गोंधळ माजला. कृष्ण मात्र शांत होता. म्हणाला, 'राजा तुझे पुत्र मला बंदी करतात की मीच त्यांना बंदी करतो हे तू पहाच.
घाबरलेल्या धृतराष्ट्राने दुर्योधनाला त्याच्या सहकाऱ्यासह सभेत बोलावून विदुराकरवी त्याला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. पण ते पालथ्या घड्यावर पाणी होते. दुर्योधन काही ऐकायलाच तयार नव्हता. तेव्हा कृष्ण फक्त मोठ्याने हसला आणि सात्यकी आणि कृतवर्मा यांचा हात धरून त्या सर्वांसमक्ष सभेतून बाहेर पडला.
**विश्वरूपदर्शन
या ठिकाणी कृष्णाचे दैवीकरण करणाऱ्या मंडळींनी महाभारतात, कृष्णाच्या 'विश्वरूप दर्शनाचा' प्रसंग प्रक्षिप्त केला आहे. कृष्णाला बंदी करायला निघालेल्या चांडाळ चौकडीकडे पाहून कृष्ण तुच्छतेने मोठ्याने हसला. ही गोष्ट या तथाकथित विश्वरूपदर्शनाचा पाया आहे. असाच विश्वरूपदर्शनाचा प्रकार कृष्णाने अर्जुनाला दाखविल्याचा प्रसंग भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात आला आहे. गीतेतील तत्वज्ञानाच्या दृष्टीने तिथला तो 'विश्वरूपं दर्शनाचा प्रसंग, उचित ठिकाणी आहे असे फार तर म्हणता येईल. पण भीष्मपर्वातील श्रीमत्भगवद्गीतापर्वाध्याय हाच प्रक्षिप्त असल्याने कै. बंकिमचंद्रादी विद्वांनाचे मत असल्याचे तो प्रसंगहि अनैसर्गिक, अलौकिक म्हणून प्रक्षिप्त ठरेल.कृष्ण माणूस होता. माणसासारखाच वागत होता. मानवी शक्तीनेच कार्य करीत होता. दैवी शक्तीने त्याला काही करता येत असते तर सारे महाभारतच घडले नसते. कृष्णाला केवळ पकडण्याची आपण सिद्धता करण्यापूर्वीच यादव सैन्याचा राजप्रासादाला पडलेला वेढा, राजसभेच्या द्वारी हाती खङ्ग घेऊन उभा राहिलेला कृतवर्मा आणि जाहीर पणे कौरवांना आव्हान देत कुरुसभेत उभा राहिलेला सात्यकी ही सारी कृष्णाची सिद्धता पाहूनच तर दुर्योधनाची चांडाळ चौकडी स्तिमित झाली होती, अवाक् झाली होती. त्यांच्या दृष्टीने राजनैतिक मुत्सद्दीपणाचे हेच 'विश्वरूपदर्शन' होते.
**कर्णाचा तेजोवध
कुरूसभेतून बाहेर पडून कृष्ण तडक विदुराधरी, कुंतीचा निरोप घेण्यास गेला. जाता जाता त्याने मोठ्या प्रेमाने खांद्यावर हात टाकून अंगराज कर्णाला आपल्या रथात घेतले. उपप्लाव्याच्या वाटेवर कृष्ण आणि कर्ण यांची ही भेट, हा कृष्णाच्या भेदनीतीचा उच्चांक म्हणता येईल. त्याच्या असामान्य बुद्धीचा आणि मुत्सद्दीपणाचा प्रत्यय इथे येतो. हस्तिनापुराची वेस ओलांडून रथ बराच लांब आल्यानंतर कृष्ण कर्णाला म्हणाला, 'राधेया तुला एक विशेष गोष्ट सांगतो. कुरूंच्या या महान् राज्याचा वारस दुर्योधन अथवा युधिष्ठिर नसून तू आहेस. तू स्वतःला राधेय समजतोस. पण तू राधेय नसून कौतय आहेस (महाभारत उ. प. अ. १४० श्लोक ६ ते २९) कुंतीचा तू कौमार्यावस्थेत झालेला पुत्र असून धर्मशास्त्रानुसार महाराज पंडू हा तुझा पिता आहे. तू पहिला आणि ज्येष्ठ पांडव आहेस. राज्याचा घनी आहेस. तू दुर्योधनाचा पक्ष सोडून पांडवांकडे ये, आणि तुझा अधिकार हाती घे. कर्णा, पितृपक्षात पांडव तर मातृपक्षात सर्वश्रेष्ठ पराक्रमी यादव असणारा तू भाग्यवान आहेस. माझ्या बरोबर तू आत्ता पांडवांकडे चलावेस अशी माझी इच्छा आह. पांडव तुझे आनंदाने स्वागत करतील.
तुमचे कृष्णाने 'द्रौपदीही पहिला पांडव म्हणून, आपला सहावा पती म्हणून, तुझा स्वीकार करील,' अशीहि लालूच कृष्णाने कर्णाला दाखविली. मात्र मुशाभारतातील उल्लेख लक्षात घेऊन काही लोक कृष्णाला दूषण देतात. पण एक तर स्त्रियांसंबंधी महाभारतकालीन परिस्थिती लक्षात घेता, हे विधान फारसे अनुचित वाटत नाही.
बायकांना मन असते, ही गोष्ट त्यावेळचे कोणतेच पुरूष, भीष्म, वसुदेव, पांडव, कृष्ण कोणीच मानीत नसत. जे इतर क्षत्रिय करत असत तेच या बाबतीत कृष्णानेहि केले.
कृष्णाच्या शब्दांनी कर्णाच्या अंतःकरणावर विलक्षण परिणाम केला. त्यांनी त्याच्या अंतःकरणाची सारी धारणाच बदलून टाकली. आपण कितीहि प्रलोभने दाखविली, अगदी साम्राज्य देऊ केले, तरी तो वसुषेण कर्ण, पांडव पक्षाला येऊन मिळणे केवळ अशक्य आहे, याची कृष्णाला पूर्णपणे जाणीव होती. कर्ण अशा परिस्थितीत होता व कौरव पांडवांचे वैर अशा पातळीवर येऊन ठेपले होते की, त्या अवस्थेत कौरव पक्ष सोडून पांडवांना येऊन मिळणे, राधेयाला केवळ दुरापास्त होते. हे माहीत असता, भेदनीतीचा हा प्रयोग कृष्णाने केला.
शेक्टचा टोला तर अप्रतिम मुत्सद्यीपणाचे द्योतक होता. त्यामुळे पांडव-विद्वेषाची कर्णाच्या मनातील धार बोथट झाली. पांडवांना छळण्यामध्ये आपण घेतलेल्या पुढाकारामुळे, कर्णाला स्वतःची लाज बाटली. प्रत्यक्ष आपल्या धाकट्या बंधूंच्या स्त्रीचे सर्वस्व हिरावून घेण्याची आज्ञा आपण केली, त्याची विलक्षण टोंचणी त्याच्या मनाला लागून कर्णाचे अंतःकरण जळू लागले. या घोर अपराधांना आपल्या मरणाशिवाय दुसरे प्रायःश्चित नाही, याची कर्णाला खात्री पटली. आपण एकाहून एक भयंकर अशी पातके केली, त्यात आणखी मित्रद्रोह व विश्वासघात यांची भर पडायला नको, म्हणून कौरवांचा पक्ष न सोडण्याचा आपला निश्चय त्याने कृष्णाला बोलून दाखविला
कृष्णाने केलेल्या या प्रयोगाने कर्णाच्या मनावर इतका परिणाम झाला, अन्यायाच्या जाणिवेने त्याच्या मनाला एवढी टोचणी लागली की, त्याने पुढे कुंतीला कोणत्याहि परिस्थितीत आपल्या चार बंधूंना न मारण्याचे व पूर्णपणे 'वांचविण्याचे वचन, तिने न मागता दिले, आणि युद्धातहि ते पाळले.
कर्णा तू परत जा. भीष्म, द्रोणांना जाऊन सांग, सध्या कार्तिक महिना आहे. युद्धाला हे दिवस फार चांगले आहेत. आज पासून सातव्या दिवशी अमावस्या आहे. त्या दिवशी तुम्हा सर्वांची युद्धात मरणाची इच्छा पूर्ण करणारे युद्ध सुरू होईल (म. भा. उ. प. अ. १४२ श्लोक २ ते २०) कृष्णाचे बोलणे ऐकून कर्ण म्हणाला, 'हे सगळे मला स्पष्ट दिसत आहे. वासुदेवा, माझ्यासह सर्व राजमंडळ या युद्धाच्या वणव्यात आहे, याची मला कल्पना आहे. तीच नियती आहे.'
उपप्लाव्य नगरीला परतून कृष्णाने हस्तिनापुरात घडलेली सर्व हकीकत पांडवांना सांगून, आता युद्धाशिवाय पर्याय नाही हे युधिष्ठिराला पटवले, आणि युधिष्ठिराच्या सैन्याने कुरूक्षेत्राकडे प्रयाण केले.
कै. बाळशास्त्री हरदासांनी, कृष्ण-शिष्टाईचे फलित आपल्या 'भगवान् श्रीकृष्ण या ग्रंथाच्या ४२३ व्या पानावर दिले आहे. ते असे :
१) लोकापवाद टळला.
२) युद्धाला युधिष्ठिराची संमती मिळाली.
३) कौरवांच्या भीष्मादी योद्धधात न्यूनगंड निर्माण झाला.
४) कौरवांचे सर्व सामर्थ्य ज्या एका महान् व्यक्तीत केंद्रित झाले होते, त्या कर्णाचा उत्साह संपवून कृष्णाने त्याचा इतका तेजोवध केला की, कर्ण जवळ जवळ संपला. कर्ण संपला तिथेच कौरवांचा पराजय निश्चित झाला.
५) कौरव योद्ध्यांची विसंवादिता स्पष्ट झाली.
६) आपल्या दृष्टीने वध्य, ते जगाच्याहि किंबहुना कौरवपक्षीय प्रमुख सेनापतींच्या दृष्टीनेहि वध्य ठरविले.
पांडवांच्या विजयाच्या दृष्टीने, कृष्णाचे हस्तिनापुरातील 'तथाकथित संधी' प्रयत्न अत्यंत यशस्वी झाले, असेच म्हणायला हवे. प्रत्यक्ष युद्ध उभे राहिले, तेव्हा कौरव पक्षातील सेनापतीहि पांडवांच्या जयाची इच्छा करू लागले होते. इतकेच नव्हे तर आपला पक्ष अन्यायी आहे, आणि पांडवांचा पक्षच न्याय्य आहे, हे त्यांना पटले होते.
**पांडवांच्या जयाचे इंगित
आपल्या उद्दिष्टांच्या न्याय्यतेबद्दल पांडव पक्षीयांची पूर्ण श्रद्धा तर होतीच, पण न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी, धर्मराज्याच्या संस्थापनेसाठी, आपण लढत आहोत, ही त्यांची धारणा होती. शत्रूविषयी त्यांच्या अंतःकरणांत विलक्षण चीड आणि तिरस्कार होता. शत्रूच्या विनाशासाठी ती मंडळी उत्सुकहि होती. सर्वानुमते त्यांनी धृष्टद्युम्न्याला सरसेनापती म्हणून मान्य केले होते. तो द्रौपदीचा भाऊ होता, आणि खरे तर ते महायुद्ध द्रौपदीच्या शीलासाठी लढले जात असल्यामुळे, कौरवांविषयी अत्यंत द्वेष असलेला सरसेनापती पांडवांनी निवडला होता. द्रुपद, विराट, सात्यकी, धृष्टकेतू, शिखंडी, जरासंधपुत्र सहदेव, अशी ज्येष्ठ मंडळी धृष्टद्युम्न्याच्या नेतृत्वाखाली, सेनापती म्हणून आनंदाने काम करायला तयार झाली होती. इथेच पांडवांचा विजय होता.
या उलट, कौरव पक्षाकडील भीष्म आणि कर्ण या दोन महत्वाच्या सेनापतींमधील वितुष्ट तर पराकोटीला पोहोचलेले होते. इतके की भीष्माने महारथी कर्णाला जाहीरपणे अर्धरथी म्हणावे, आणि 'भीष्म जिवंत असेपर्यंत अगर रणांत लढत असे पर्यंत आपण युद्धात सहभागी होणार नाहीं असे कर्णाने जाहीर करावे! सैन्यातील शिस्तीच्या दृष्टीने ही गोष्ट किती अयोग्य होती? हे सहज ध्यानात येते. भीष्म बरोबर असले किंवा कर्ण बरोबर असला तरीहि अनेक अनुचर योद्ध्यांपुढे त्यांनी हे कुठले उदाहरण घालून दिले? कर्ण, अश्वस्थामा यांची तोंडातोंडी, कर्ण आणि कृप यांच्या झटापटी आणि कर्ण सेनापती असताना, महारथी शल्य त्याचा सारथी असताना, त्याने कर्णाचा केलेला तेजोभंग, या साऱ्या गोष्टी कौरवांचा पक्ष आतून किती विघटित होता, हेच दाखवितात.
कृष्णाने आपल्या मंत्रयुद्धाने, दिढीने असलेल्या कौरव सैन्याचा निःपात करण्याची व पांडवांच्या विजयाची जय्यत तयारी केली असली, तरीहि तो विजय प्रत्यक्ष पदरात पडणे रणांगणावरील कौशल्यावर अवलंबून होते. भारताचार्य चिंतामणराव वैद्यांनी एक अक्षौहिणी सैन्याचा हिशोब अडीच लाखांचा मांडला आहे. म्हणजे कौरव पांडवांकडील एकूण सैन्य अठरा अक्षौहिणी म्हणजे चाळीस लाखाच्या घरात जाते! एवढ्या लोकांचा, फक्त अठरा दिवस चाललेल्या महायुद्धात प्रचंड संहार झाला. ही जागतिक पातळीवरची महान् घटनाच म्हणायला हवी. कारण आज वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती एवढ्यामोठ्या प्रमाणावर झाली असूनहि, इतक्या थोड्या दिवसांत, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा संहार झाल्याचे इतिहासात नमूद नाही. पांडवांना हाताशी धरून स्थापन केलेले धर्मसाम्राज्य एकदा उधळले गेले असता, ते पुन्हा निर्माण करण्याचा कृष्णाचा हा महान् प्रयत्न. पण त्याने हाताशी धरलेली साधने श्रीरामचंद्राप्रमाणे (लक्ष्मण, हनुमंतासारखी) स्वयंपूर्ण नसल्याने, हाती असलेल्या अपूर्ण साधनांच्या आधारे, जगातील आसुरी शक्तींवर अवघ्या अठरा दिवसात मात करणे, हे खरे तर कृष्णापुढे आव्हानच होते. अशा परिस्थितीत कृष्णाने विजय खेचून आणला, हे त्याच्या विलक्षण विभूतिमत्वाचे लक्षण आहे. युद्धाच्या प्रारंभीच अर्जुनासारखा नरोत्तम शत्रुपक्षतील नातलगांना पाहताच प्रेम, वत्सलता, ममता या भावनांनी विवश झाला. महायुद्धाच्या भयंकर परिणामांनी समाजाचे केवढे अधःपतन होईल याची कल्पना मनात येऊन खचला. त्याच्या अंगाला कंप सुटला. त्याचे गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले. कौरवांनी आपल्याला ठार मारले तरी चालेल, पण आपण त्यांच्यावर हात उचलणार नाही. इहलोकीचे राज्यच काय, पण त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी, स्वजनांना मारून आणि गुरुहत्या करून ते मिळणार असेल, तर मला ते नको, असे म्हणून तो रथात स्वस्थ बसला.
अर्जुनाची ही अवस्था पाहून कृष्ण थक्क झाला. त्याचा तो सारा मोह नष्ट करण्यासाठी कृष्णाने त्याला 'श्रीमत् भगवद्गीता' रूपी विश्वोद्धारक तत्वज्ञानाचा उपदेश केला. अलौकिक कथेप्रमाणे त्याला 'विश्वरूप दर्शन' करून, त्याच्या बुद्धीवरील मोहाचे पटल फाडून टाकले आणि त्याला युद्धाला तयार केले. 'श्रीमद्भगवद्गीता' म्हणजे कृष्णाने जगाला दिलेले, मानवी जीवनाची विकसन परंपरा ज्यामुळे टिकून राहील अशा शाश्वत जीवनमूल्यांचा आणि तत्वज्ञानाचा महान् आविष्कार आहे.
युद्धकाळात कृष्णाने धर्मयुद्धापेक्षा 'युद्धधर्म प्रमाण मानून निरनिराळ्या प्रसंगी पांडवांना योग्य त्या सूचना, अगर त्यांच्या संभ्रमित अवस्थेत योग्य ते निर्णय दिले आहेत. साधनशुचितेचा नसता बाऊ न करता, ज्यांचा अंतिम परिणाम जनविरोधी मूल्यांच्या स्थापनेत होतो, त्या गोष्टी कितीहि शुद्ध असल्या तरी त्या पापमय आहेत, आणि ज्यांचा अंतिम परिणाम समाजापुढे आदर्श मूल्ये प्रस्थापनात होतो, त्या गोष्टी दिसायला पापमय वाटल्या तरी त्या पुण्यमयच असतात, या नीतीचा कृष्णाने अवलंब केला. कौरवांचा काय किंवा पांडवांचा काय, युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोण स्वार्थी होता. पांडव न्याय्य हक्काकरिता झगडत असल्यामुळे, त्यांचा स्वार्थ फारतर उदात्त स्वार्थ म्हणता येईल. पण नीच वा उदात्त स्वार्थाचा ज्याच्या अंतःकरणाला तिळमात्र स्पर्श झाला नव्हता आणि निःस्वार्थपणे या देशात धर्मराज्याची घडी बसवणे हेच ज्याचे ध्येय होते, म्हणजे नीतिमूल्यांचे रक्षण आणि विश्वकल्याण हेच ज्याचे उद्दिष्ट होते, असा त्या कुरुक्षेत्रावर हजर असलेला एकमेव महापुरूष म्हणजे कृष्ण होता. कृष्ण नसता तर पांडवांचा पक्ष, धार्मिक, सत्यनिष्ठ, उच्चमूल्यावर आधारित असूनहि त्या पक्षाचा विजय झाला नसता. देशात दृढमूल झालेली अधार्मिक सत्ता संपूर्णतया नष्ट करण्यासाठी, उपप्लाव्य नगरीतील उत्तरा-अभिमन्यु विवाह प्रसंगापासून कृष्णाने पावले टाकायला सुरवात केली, हे आपण पाहिले आहेच. कुरुक्षेत्रावरील अठरा दिवसांच्या युद्धाचा विचार केला तरी, पांडवपक्षीयांच्या शौयपिक्षा कृष्णामुळेच विजयाचे पारडे पांडवांच्या बाजूला झुकले असे ध्यानात येते.
संदर्भ -शोध कृष्णाचा प्रवासी पूर्णत्वाचा
लेखक प्रा डॉ राम बिवलकर