Thursday, June 29, 2023

पंढरीची वारी

 



महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. एकादशीची लगबग ,पहाटे उठून सगळ्यांनी दूरदर्शनवर विठ्ठल महापूजा भक्तीभावाने पाहणे.अशा अनेक आठवणी मांडता येतील.जाणतेपणा आल्यावर आषाढी वारी कुतुहलाने,अभ्यासाने,शिस्तबद्धता जाणण्यासाठी अनुभवण्याची आस लागतेच.संत साहित्याचा अभ्यास करणारे डॉ.सदानंद मोरे यांनी या विषयी अनेक प्रकारे जागरुकता सामान्यापुढे सोप्या भाषेत मांडला आहे आणि ते कायम यावर काम करत आहेत.अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात.

रुक्मिणीच्या शोधात आलेले श्रीकृष्ण पंढरपुरात पुंडलिकाच्या आईवडिलांच्या सेवेतील तल्लीनता पाहून तिथेच थबकले.पुंडलीकाने थोडा काळ ह्या विटेवर उभा राहा असे सांगितले.तो आजपर्यंत श्रीकृष्णाचा स्वयंभू अवतार पांडुरंग पंढरपुरी या विटेवर अजूनही उभा आहे.शंकराचार्यांच्या लिखाणातही आठव्या शतकात पांडूरंगाष्टम रचलेले आहे.पुढे शैव वैष्णव या पंथात वैष्णव पंथाचे दास पंढरपूरी नित्यनेमाने उपासना करण्यास वारीने जात.ही एक सामुहिक उपासना आहे.ज्ञानेश्वर महाराज ,नामदेव यांनीही ही परंपरा सुरु ठेवली.

माझे जिवींची आवडी ।
पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥
पांडुरंगी मन रंगले ।
गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे ।
पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥
बापरखुमादेविवर सगुण निर्गुण ।
रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥
ज्ञानेश्वर महाराज

ज्ञानेश्वरांनी वारी उपासनेला १३ व्या शतकात ज्ञानेश्वरी हा प्रमाण ग्रंथ दिला.पुढे अनेक परकीय आक्रमणानंतरही १६ व्या शतकापर्यंतही यात खंड पडला नाही ही मोठी जमेची बाजू आहे.याची प्रेरणा केवळ एकाच तो सावळा पांडुरंग!
पुढे १६व्या शतकात तुकाराम महाराज देहूहून १४०० वारकऱ्यांसह पंढपुरी वारीस जात.तुकाराम महाराजानंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा वारी काढत होते.नंतर तुकारामांचे वंशज नारायण महाराज यांनी ‘पालखी’ प्रथा साधारण १६८० मध्ये सुरु केली.आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका देहूत आणल्या जात.तिथून तुकारामांच्या पादुका अशा दोन्ही पालख्या एकत्र निघत असत. नारायण महाराजांच्या अनेक मराठा सरदारांशी हितगुज असत .त्यामुळे घोडे अनेक तामजाम येथे वाढला गेला.भजना गायनाची एक शिस्त लावली गेली.नारायण महाराजांचे योगदान वारीमध्ये खूप मोठे आहे.

सकळा वैष्णव वाटे जीव, प्राण
तो हा नारायण देहूकर
-संत निळोबा

त्यानंतर पेशवाईत हैबतबाबा आरफळकर जे स्वत: शूर सरदार होते.माऊलीचे निस्सीम भक्त होते.याच काळात ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या एकत्रित न निघता वेगवेगळ्या निघू लागल्या.
त्यांनी सैन्याचे घोडदळ यात जोडले.ज्यामुळे वारीत एक प्रचंड शिस्त आली.गोल रिंगण ही प्रथा सैन्यांच्या घोडदळाने काही घोड्स्वारीचे खेळ सादर करण्यासाठी सुरु केले.हळू हळू सैन्य यातून बाहेर पडले परंतु गोल रिंगन आणि अश्व फेरी सुरु राहिली.सैन्यामुळेच तळ ठोकून व्यवस्थित छावणी ,नियोजन ,कूच ,कर्णा,चोपदार ह्या पद्धती सुरु झाल्या.
वारीमध्ये सर्वसमावेशकता सुरुवातीपासून अबाधित आहे.एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही रचनाच वारीची आहे.

यारे यारे लहान थोर।याती भलते नारी नर।
करावा विचार।न लगे चिंता कोणासी।
सकळासी अधिकार||
-संत तुकाराम

मी उणीपुरी चार किलोमीटरच वारीसोबत चालले .पण अनुभव मात्र अनमोलच मिळाला.रविवारी ४० किलोमीटर श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ,त्र्यंबकेश्वर- पंढरपूर सर्वात लांबचा टप्पा पूर्ण करण्यासाठी पालखी २ जूनलाच निघाली होती.रविवारी २० जूनला ती मांदळी,नगर येथे दुपारी विसावणार होती.रविवारी तिथे पोहचलो.विसाव्याची सर्व व्यवस्था पाहायला मिळाली.काही वारकर्यांशी गप्प्पा मारता आल्या.जवळपास ४३ छोट्या दिंड्या या वारीत /फडात समाविष्ट होत्या.या दिंड्यांना क्रमांक होते.त्यानुसारच त्या चालायच्या.छोट्या छोट्या दिंडी मिळून तयार होतो वारीचा मोठा फड.दिंडीचा अर्थ वीणा आहे.वीणाधारक वारीचा प्रमुख असतो.
वारीच्या पुढे झेंडेकरी,टाळकरी असतात.,पालखीसोबत चांदीचा दंड घेतलेले चोपदार असतात.त्या पाठोपाठ तुळशी वृंदावन घेतलेल्या स्त्रिया असतात.त्यानंतर पखवाजधारक ,मृदंगधारक होते.पालखीसाठी खास खिलारी बैल जोडलेले असतात.
याशिवाय पैठण,देहू,आळंदी,मुक्ताईनगर ,शेगाव,पिंपळनेर,श्रीगोंदा येथून निघणाऱ्या पालख्या मोठ्या फडाच्या आहेत.
वारकर्यांसोबत शिधाची ट्रक असते.विसाव्याच्या ठिकाणी ते आपले अन्न स्वत: बनवतात.रोज साधारण १५- २० किलोमीटर चालतात.आता विसाव्यापासून वारी पुढे मार्गस्थ झाली.मी पालखी मागेच होती.अहाहा काय ती रसाळ कधीही न ऐकलेली भजन,अभंग भारुड व्मृदंग गात होते.पावले सहज पुढे पुढे चालत होते.खरोखरच तोच श्रीहरी चालविता आहे.अशी मी तल्लीन झाले होते .आमचे हे म्हणाले “अग आता पंढरपूरला जाते का आता?बस झालं” बरोबरीच्या माऊली म्हणाल्या “नेतो की हिला,चल ग” जीवावर आल होत थांबायचं,पण काय थांबले.त्या वारकरी म्हणाल्याच म्हणाल्या होत्या की पालखी बरोबर चालणे सोप्प आहे.परतीला एकट्याने जाणं खूप कठीणच आहे.तसच येतांना तेच अंतर पण काळ मोठा झाला होता.


No comments: