नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे.
उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते.
या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग? सर्वांनाच ठाऊक आहे "विष" या हत्याराचा साप मोठा स्वामी आहे, ज्यामुळेच आपण याला खुप घाबरतो.
या विष ग्रंथी सापाला जनुकीय बदलांमुळे मिळाल्या.मानवाच्या तोंडांत लाळ अन्न पचवण्यासाठी लाळ स्त्रवते, पण सापाच्या तोंडांत विष स्त्रवणारी ग्रंथी जनुकीय उत्क्रांतीची,Gene duplication ची भेट ठरवली.
जर आपल्याकडे एकाच युनिफॉर्मचे दोन जोड असेल तर आपण बिनधास्त राहतो.तसेच सापाकडे एकाच जनुकाचे चक्क दोन जोड(set) जीन डुप्लीकेशनने तयार होतात.आता या जास्तीच्या जीन सेटपासून मग अमृत बनवावे ना,तर नाही साप भावाने विष बनवलं 😀 जितकं जहाल विष तो या उत्क्रांतीच्या काळात बनवत गेला तितकं जास्त त्याचा वंश या survival of the fittest या घमासानात पुढे जायची शक्यता वाढली.
तर होत काय ..
जिथे सुरुवातीला इतर शारीरिक कार्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रथिनांना विषाच्या घटकांमध्ये रूपांतरित केले गेले. यामध्ये लाळ, स्वादुपिंड आणि अगदी रोगप्रतिकारक प्रथिने यासारख्या विविध स्त्रोतांमधून जनुकांची भरती समाविष्ट होती. या भरती केलेल्या जनुकांमध्ये नंतर उत्परिवर्तन झाले आणि ते विष ग्रंथींमध्ये व्यक्त झाले, शिकारवर विशिष्ट परिणाम करणारे विविध विषांमध्ये विकसित झाले.
बरंय माणसात Gene duplication नाही,नाहीतर सगळीकडे विषकन्या,विषकुमार दिसले असते😀तर मग उंदिर,ससा तर मोठा प्राणी खात साप मस्त जगत होता.
मग माणसाची उत्क्रांतीही होत होती ना..
माणसाला या सर्पदंशाचे परिणाम समजले. शक्तीशाली जीवाला पूजण्याचे,श्रद्धास्थान करण्याचे मानवाची विचारशक्ती पोहचली होती.अनेक जुन्या संस्कृतीपासून सिंधू संस्कृती पर्यंत सर्प चिन्ह सापडल्याची नोंद आहे.मिनोअन संस्कृती ईसापूर्वची दोन्ही हातात साप पकडलेली मूर्ती सापडली आहे.
या हजारोंवर्षांपुर्वीच्या संस्कृतीत प्रजनन हे मुख्य सूत्र मानले जाई.त्यानुसार श्रद्धा विकसित होत.
सापाच्या शरीररचनेमुळे तो पुरुष प्रजनानचे रूप मानले गेले.भूमीवरील सापाचे वारूळ हे योनीरूप मानले गेले.वारूळ-स्थ नाग हा पुरुषत्तत्त्वाचा म्हणजे क्षेत्रपाळाचा प्रतिनिधी मानला गेला वारूळ हे भूमीच्या योनीचे प्रतीक आहे,हे संशोधन रा.चिं.ढेरे यांनी नोंदविले आहे.
पुढे अमूर्त श्रद्धांनी मूर्त घेतल्यावर याची मूर्ती रूपात पुजा होत गेली.लज्जा गौरी हे अनावृत्त शिल्प स्त्री प्रजनन शक्ती रूप दाखविताना तिच्या हातात पुरुषतत्व सर्प अंकन दिसते.
वैदिक काळात नागाचे स्तुती श्लोक आहेत.
पुराणात तर समुद्रमंथन,शेषनाग असा बलाढ्य नाग दाखवला गेला.
पुढे शेती संस्कृती बहरत गेली.उंदिरांना खाणाऱ्या सापाचा माणूस कृतज्ञ तर होताच पण शेतात काम करताना दंश नको म्हणून सापाला,वारूळाला पूजा होत राहिली.
पण त्यात लाह्या दुधाची अंधश्रद्धा कधी आली कोणास ठाऊक?
बरं मग आज पंचमीला ते पुरणाचे उकडलेले दिंड करायचं असतात हे माझ्या सारख्या सुगरणींना काम असतें.
-भक्ती









