Monday, December 29, 2025

पर्व--लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा

 पर्व



मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे. 

व्यासरचित महाभारत वाचायची इच्छा असणाऱ्यांना, परंतु इतका मोठा ग्रंथ आतापर्यंत शक्य नसल्याची जाणीव असते. अशा वेळी 'पर्व' वाचून त्याची छोटी, प्रभावी आणि वास्तववादी वाचण्याची तहान काहीशी शमली जाते. 

आताच्या पिढीतील वाचकांसाठी खास सुंदरता म्हणजे अमानवी संकल्पना ,चमत्कार दूर करून महाभारतातील पात्रांच्या मनोव्यापाराचे वास्तववादी चित्रण करणारी ही कादंबरी आहे.भैरप्पा यांनी कादंबरी लिहिताना अनेक वर्षे संशोधन केले. त्यांनी महाभारतात वर्णन केलेल्या स्थळांना – द्वारका, राजगृह, लोथल, कुरुक्षेत्र इ. ठिकाणांना भेट दिली होती. असं वाचनात आलं की हिमालयातील गढवाल प्रदेशात बहुपतित्व प्रथा आजही आहे, ती द्रौपदीच्या काळापासून चालू असल्याचे संशोधन त्यांना प्रेरणा देऊन गेले. कादंबरीत सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय विश्वसनीय वास्तववादी वाटते.


सुरुवात मद्रदेशातील राजघराण्यांतीळ पात्रांच्या युद्धासंबंधी संवादातून होते.हळूहळू कथा पांडवांच्या जन्माकडे कथा सरकते. इथला भाग पर्यंतचा 'देवसाहाय्याने पांडव जन्म' हे मिथक याचा उलगडा ,त्यांच्या नियोग जन्मरहस्याने होतो. उत्तरेकडील भारतात राहणाऱ्या हिमालयातील तत्कालीन लोकांना 'देव' संबोधले गेले आहे .तसेच राक्षस, नागयांनादेखील कादंबरीत लोकगण म्हणून वर्णन केले आहे. आपल्याला टीव्हीवरच्या महाभारताने खूप काळ भ्रमात ठेवले असं समजते :)

आतापर्यंत द्रौपदी, कर्ण, अर्जुन हे विविध लेखकांनी स्वतंत्रपणे मांडले आहेत. पण 'पर्व' कादंबरीत अनेक नावीन्यपूर्व तत्वचिंतनाने पात्रांची ओळख होते. भीम बलवान नायक तर दिसलाच, पण तो एक संवेदनशील, द्रौपदीसाठी जीव ओवाळणारा, प्रेम आणि कर्तव्य यात अडकलेला, हिडिंबा व घटोत्कचाबद्दल अपराधी भावनेने ग्रासलेला 'माणूस' म्हणून दिसला.

"मी हिडिंबेला वनात सोडून आलो, तिच्या मुलाला युद्धात बलिदान दिले. मी पांडवांचा भाऊ म्हणून जगलो, पण पती आणि वडील म्हणून अपयशी ठरलो."



'पर्व' मधील सर्वात व्यावहारिक आणि राजकीय-बुद्धिमान पात्र मला 'कुंती' वाटली. पण ती दृष्ट्या गांधारीपेक्षा वेगळी. आधी आपल्याला मूल हवं, ज्येष्ठत्व हवं यासाठी ती पांडूच्या नियोगाचा वापर करायचे ठरवते. याआधीच तिने कर्णाचा जन्म, त्याग गुप्त ठेवीत सामाजिक स्थितीचे रक्षण केले असते.

नंतरही पांडवांना नेहमी वास्तवाची जाणीव करून देते आणि त्यांना नैतिक अधःपतनापासून वाचवते. ती पांडवांना कधीही दासींबरोबर संबंधांना नकार द्यायला सांगते. भीम हिडिंबा व मुलात अडकलेला दिसताच ती लवकरच भीमासह ते स्थान सोडते. तिचा द्रौपदीला बहुपतित्व मानायला भाग पाडून भावांभाषांचे एकत्रित करणे? कर्णाकडे आपल्या पाच मुलांना जीवनदान मागते. इतकेच नाही तर शेवटी युद्धात कुरुवंशाचा महाविनाशानंतरही ती पुन्हा वंशासाठी गर्भधारणेचा द्रौपदीला सल्ला देते.

यामधील कायम भव्यदिव्य दिसणाऱ्या राजमहालांचे वातावरण युद्धकाळात चणचण भासणाऱ्या काळ्या सावटाखाली  होते, हे वाचणे अगदी वेगळा अनुभव देते. जसे –

दिवा लावायला तेल नाही म्हणून धृतराष्ट्र दासीला ऋण घेऊन तेल आणण्यास सांगतो.द्रोण दुधावर वा पाण्यात सातूवर भूक भागवतात. 

युद्धात सर्व मनुष्य, प्राणी शक्ती पूर्णपणे वापरली जाते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचे, सेनापतींचे दैनंदिन जीवन, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि युद्धपटांचे  वर्णन इतके तपशीलवार आहे की वाचताना पोटात खळबळ वाटते.

--युद्धात इतकी जीवितहानी होते की सर्वत्र मांस, रक्त यांचा खच पडतो, प क्षी प्राणी प्रेतांवर झुंबड उडवतात. 

--माणसांच्या मलाचा सर्वत्र दुर्गंध पसरतो.

या अशा कारणांमुळे युद्धभूमी-युद्धाचे ठिकाण बदलून ठराविक काळाने वा दररोज पुढे पुढे स्थान सरकवले जात असे.

--युद्धात मेलेल्या घोड्याच्या मांसाचे भक्षण अन्नटंचाईमुळे करावे लागते.

--संजयाला कुरुक्षेत्राकडे मोठमोठाले यानंतर कापत जाई आणि तितक्याच वेगाला पुन्हा परत महाली येऊन सर्व युध्द खबरबात धृतराष्ट्राला सान्गत असे ,दूरदृष्टीचा प्रश्नच मिटला. 

--शेवटी कृष्ण गांधारीला आपल्या डोळ्यावरची पट्टी काढायला सांगतो ,असा अकल्पनीय शेवट मी पाहिल्याचं वाचला . 

महाभारत ---

"कुरुक्षेत्र हे युद्धाचे मैदान नव्हे, ते एक प्रचंड कत्तलखाना होते. मनुष्य, प्राणी, रक्त, मांस आणि हाडांचा ढिगारा. जे जिंकले त्यांनाही काही मिळत नाही.फक्त रिकामे हात आणि रक्ताने माखलेले मन."

--भक्ती 

Friday, December 26, 2025

संस्कृती - इरावती कर्वे(पुस्तक परिचय)

 संस्कृती 

लेखिका- इरावती कर्वे

संस्कृती म्हणजे संचय... वर्तमानकाळात श्रीमंत भूतकाळची कर्तबगारी मागच्या पिढीकडून जे जे मिळाले ते . ५०-७० वर्षापूर्वीचे हे संस्कृती पुस्तकातील समाजमनाचे विश्लेषण करणारे लेख आजही काळातीत आहे.इरावतीबाईंची 'आमची संस्कृती' ,'मराठी लोकांची संस्कृती' ही पुस्तकेदेखील मानववंशशास्त्र हा त्यांचा विषय या दृष्टिकोणातून लिहिला आहे. 'मराठी लोकांची संस्कृती' या पुस्तकाची पीडीएफ आंतरजालावर सहज मिळेल,नक्की वाचा. 



'संस्कृती' पुस्तकातील पहिलया  सात लेख  रामायण महाभारतातील गोष्टी संशोधक वृत्तीने अभ्यासल्या आहेत.  

महाभारत आणि रामायण-१,महाभारत आणि रामायण - २

या दोन्ही लेखांत रामायण व महाभारत या दोघांमधील विस्तृत साम्य व फरक मांडले आहेत. रामायण-काव्य तर महाभारत-इतिहास. महाभारतातील विविध 'पर्व' तर रामायणातील विविध 'कांड' यातील पुरुषांचा संघर्ष सांगताना , एक महाभारतातील संघर्षाची बीजे सुरुवातीलाच रोवली असल्याने कथा  एकसंध वाटते. तर रामायणात संघर्षभावना विविध वेळी येते व नाहीशी होते असल्याने कथा विस्कळीत वाटते. दोघांमधील अहिंसेबद्दलचे उल्लेख निराळे आहेत. दोन्हींमध्ये पितृप्रधान, बहुपत्नीक कुटुंब पद्धतीत जे संघर्ष व द्वेष आहेत त्यानुसार कथा दिसतात.परंतु महाभारतात भावाभावांचा संघर्ष माणसांचा अंत करतो, तर रामायणात गळे कापण्याऐवजी भावाभावांना एकमेकांच्या गळ्यात पडता येते हे सिद्ध होते.

यानंतर 'अयोध्याकांड (राम वनाला जातो)' यामधील दशरथ राजाच्या कृतीचे अनेक पद्धतीने, विविध कथा-अभ्यास करून खोल विवेचन आहे. 'भरत आजोळी असतानाच, दशरथाने राज्याभिषेकाची घाई का करावी?, कौसल्या व कैकयीचे नाते खरेच कसे होते? असे अनेक कधीही विचार न केलेले मुद्दे पाहायला मिळतात.

'अयोध्याकांड - २ (भरत भाव)' यात भरताने आपले राज्य नाकारत भावाकडे वनी धाव घेतली तेव्हा त्याचा प्रवास ,पितृशोक समाचार रामाला सांगणे ,मातासमवेत पुन्हा अयोध्या गमन हे सांगताना ,रामाने १४ वर्ष प्रतिज्ञा पाळण्याचे का ठरवले? हा प्रश्न मनात हा लेख पेरूण  जातो .


'अरण्यकांडात' रामाचा प्रवास नक्की रामायणातील ठिकाणे कोणती हे विविध संदर्भाने अभ्यासले आहे. रामाने आयुष्यात चारदा गंगा ओलांडली.

१. विश्वामित्रांसह यज्ञ रक्षणाला जाताना

२. जनक यज्ञाला उत्तरेकडे गेले तेव्हा

३. वनवासाला जाताना

४. लंकेतून सीतेला घेऊन येताना

हंपी, गोदावरी, सध्याची लंका ह्या मागाहून रामकथेच जोडल्या गेल्या असतील का? कालीदासाच्या वेळेपर्यंतचे बदल झाले.

पुढे 'सीता' व 'सासवा सुना' हे लेख सीतेला सीतेच्या आणि महाभारतातील 'सत्यवती, अंबिका, अंबालिका या स्त्रियांच्या आयुष्यातील घटनाक्रम व त्याचे काम महाभारताच्या कथांवरचे परिणाम मांडले आहेत.

सासवा सुनांमध्ये पराधीन दुर्दैवी या तीन बायकांमुळे/नारीमुळे महाभारत कथेला जन्म मिळाला.

त्यांना व्यंग असणारी मुले व्यासाला त्यांनी दर्शविलेल्या अबोल विरोधामुळे निपजली व महाभारत युद्ध सुरू झाले असेही म्हणता येईल.

पुढचे अध्याय 'धर्म' हा एक अत्यंत समतोल भाषेतला लेख आहे. यामध्ये अगदी आदिमानवापासून आतापर्यंतच्या समाज जीवनात 'धर्म' म्हणजेच आचारसाधनेचा उगम व प्रवास थक्क करणाऱ्या तथ्यांसह वाचायला मिळतो. यामध्ये स्त्रियांचे, पुरुषांचे तंत्र व वागणुकीचे स्वतंत्रपणे विवेचन मिळते. त्यानंतर सामाजिक मूल्यांचे सांप्रदायिक, कायदेविषयक (दोन्ही आचारमय) आणि  नीतीतत्त्वांच्या दृष्टीने (मन: प्रवृत्ती) तत्त्वे कशी काम करतात हे विविध उदाहरणांनी मांडले आहे.समाज रचना  काळ सतत बदलत असतो. ती बदलती सत्ये आकलन करून त्यानुसार वागण्याची ताकद, सत्यशोधन सतत चालू ठेवल्याने मिळू शकते.

शेवटी नरहर कुरुंदकर यांनी एका दीर्घ वैचारिक लेखातून इरावतीबाईच्या थोर चिंतनाचा आढावा 'श्रद्धांजली' यात घेतला आहे. एकाच ठिकाणी गृहिणी,गार्गी आणि मराठी कवयित्री यांचा संगम अनोख्या पद्धतीने 'इरावती कर्वे' या महान व्यक्तिमत्त्वात झाला आहे. -

 भक्ती - २६/१२/२०२५.

Monday, December 22, 2025

Pune Book Festival 2025

 











मागच्या वर्षी पुणे बुक फेस्टिवल खूप भव्य दिव्य आवडले होतं .माझी वाचनाची आवड पाहता सगळ्या मैत्रिणी आश्चर्याने "तू अजून पुणे बुक फेस्टिवलला गेली नाहीस का?"विचारत होत्या.अखेर शेवटच्या दिवशी फर्ग्युसनला पोहचलेच. सगळ्या स्टॉलची लिस्ट आदल्या दिवशी प्रिंट करून आणली होती पण मी ती घरीच विसरले त्यामुळे परत नव्याने प्रदर्शन आणि पुस्तक पाहायला सुरु केले.व्यंकटेश  माडगूळकरांचे पुस्तक हाती घेतलं की ते आपण टाळूच शकत नाही-जंगलांतील दिवस . 

निरंजन घाटे यांचेही एक पुस्तक मी दरवेळी मी घेतेच,मला अनेकदा तथ्यापर्यंत पोहचण्याला त्यांचे पुस्तक मदत करतात -खेळ आणि विघ्यान 

साधनांच्या स्टॉलवर मला खूप गर्दी तीही दर्दी वाचकांची वाटली ,त्यांनी पुढच्यावेळी मोठा स्टॊल घ्यायला हवा. -मन्वंतर,पुढे जाण्यासाठी,बिजापूरची डायरी 

भैरप्पांची पुस्तक आतापर्यंत स्टोरीटेलवर ऐकली पण हार्ड कॉपी पहिल्यांदा घेतली -सार्थ 

विवेकानंदांची खूप दिवसांपासूनची राजयोग,कर्मयोग,प्रेमयोग,घ्यांयोग ,भक्तियोग हि घ्यायची होती तिची घेतली. 

सिग्मोईडची पूस्तक वाचायला सुरुवात करणार आहे.-Psychopathology of Everyday Life

आता माझ्या व इतर अनेकांच्या  पुस्तकपरिचयाच्या लेखनाला कायम कौतुकरूपी प्रोत्साहन देणारे वाचनवेडा या फेसबुक आणि कायप्पाचे आधारस्तंभ विनम्र भाबळ प्रत्यक्षात मला ओळख देत समोर आले "कशा आहात?"नावाप्रमाणेच त्यांचे  बोलणं खूप विनम्र आहे. 

खूप दिवसांपासूनचे पाहिजे होते ते  'महामाया निळावंती ' प्रत्यक्ष लेखकाकडून 'सुमेध' यांच्यकडून स्वाक्षरीसह स्वीकारले.तसेच कॅन्सर फायटर 'ब्युटी ऑफ लाइफ' च्या लेखिका आशा नेगी मॅडम बरोबर पाच सहा मिनिटेच चर्चा करून प्रेरणादायी वाटले. 

अजून खरी पुस्तकाची लयलूट ,आनंद लेकीनेही घेतला-सुधामूर्ति यांचे गोपीचे पुस्तक .कुल्फी ,चिकू पिकू च्या स्टॊलवर ती मनमुराद रमली . ikakey (एक कि)हा  नवीनच उपक्रम म्हणजेच ऑडिओ बुकाचा मुलींसाठी शालेय ऑडिओ बुकाचा या ठिकाणी समजल्याने व तिला आवडल्याने सबस्क्रिब केला. सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे अनेक पुरात्तव वर्ग मो ऑनलाइन केले,त्याचे हरहुन्नरी आयोजक पैजा आणि सुदर्शन भेटल्याने पून्हा झालेल्या शैव,वैष्णव,लेणी वर्गांची उजळणी झाली . तरी महाराष्ट्र संशोधन संस्था,गीता वर्ग हे पाहायचे राहिले. चकटफू  सुंदर बुकमार्कस  आणि आंनदमठ मिळाल्याने मजा वाटली . 


मनातील भावनांच्या लाटा उसळतात आणि शांत होतात पण जे पुस्तक तुम्ही वाचता त्याने तुमच्या मेंदूचे जाळे (synapse)निरोगी होतं राहत 

हे कागदांचे पंख मनाला स्वच्छंदी तर करतातच...

***

आपल्या मेंदूंमध्ये, काही तासांमध्ये नवे सायनॅप्सेस तयार होतात. उदाहरणार्थ, हा एक परिच्छेद वाचल्यामुळेदेखील तुमच्या मेंदूच्या रचनेमध्ये थोडेफार बदल होतात, न्यूरॉन्सना नव्या जोडण्या करण्यासाठी किंवा जुन्या कड्या टाकून देण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही आधीपेक्षा किंचित वेगळे असता. जनुकीय पातळीवरही गोष्टी आश्चर्यकारकरीत्या लवचीक असतात. व्यक्तीचा डीएनए जरी आयुष्यभर सारखाच राहत असला, तरी तीच जनुकं जशी अभिव्यक्त झाली असती, त्यामध्ये एपिजेनेटिक आणि पर्यावरणीय घटकांमुळे भरपूर बदल होऊ शकतो

-नेक्सस(युवाल हरारी)

माझ्या खरेदी केलेल्या पुस्तकांची ओळख 

https://youtube.com/shorts/39pRvSY6fEg?si=A3cG-5EM4m4V_Ykj

मिपा कट्टा २०२५

 रविवारच्या मिपा कट्ट्याची वेळ ४ ते ६ होती पण पुस्तक प्रदर्शनात ३ वाजताच आबा भेटला. आमचा कट्टा एक तासच अगोदर सुरु झाला . मी आबाला कौतुकाने खरेदी केलेल्या पुस्तकांची भरलेली पिशवी दाखवली . तर आमचे हे आणि आबा रखरखीत खान्देश आणि मराठवाड्याचे पाणी ,उद्योगांवर चर्चा करत होते ;)

आबा म्हणाला मी रामचंद्र काकांना शोधून आणतो आणि तो अर्ध्या तासाने परत आला. रामचंद्रकाका आल्यावर आम्ही फर्ग्युसन महाविद्यालय ते वाडेश्वरला गाडीतून वाट काढत निघालो.रस्त्यात ब्रिटिश लायब्ररी (जुनी),टाइम्सचे कार्यालय,रानडे इन्स्टिट्यूट याची इमारत कामकाज सांगितलं ... एक हेरिटेज वॉकच यानिम्मिताने झाला. वाडेश्वरला पोहचल्यावर स्वधर्म मिसळपाव.कॉम चा फलक घेऊन उत्साहाने उभे होते हे छान वाटले. टर्मिनेटर सोडता बाकी सर्व मिपाकर कट्ट्यासाठी हाजीर होते.स्वधर्म,कुमार १ यांचे छायाचित्र आधी पाहिल्याने ते ठाऊक होते पण यापैकी अभ्या आणि चामुंडराय याना प्रथम पाहिले . आता आम्ही टर्मिनेटर यांची वाट पाहत होतो. 

काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एक टेबल मिळाल्यावर मिसळपाव कट्टा रंगायला सुरु झाला. आणि मग थोड्याच वेळात टर्मिनेटर यांचे आगमन झाले...आता जे येणार त्यापैकी सर्वजण आले पण 'येऊ शकतो' यातले 'किल्लेदार' मिपाकर राहिले हे समजले.

सर्वांच्या ओळखी सुरु झाल्या . मला तेव्हा समजले आजचे सर्वच मिपाकर आपल्या व्यावसायिक क्षेत्रातही धुरंधर आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकाचे क्षेत्रातले अनुभव ऐकण्यासारखे होते. मधेच वेटर मिसळपाव. कॉम फलक पाहून मिसळपावचे ऑर्डर देणार का हे गंमातीने म्हणाला आणि एकाच हशा पिकला ... हायला पुण्याचे वेटरही हजरजबाबी आहेत कि अस मला वाटलं :)

पलिकडच्या टेबलाच मला खास ऐकू नव्हतं पण कुमार १ ,चामुंडराय ,स्वधर्म यांच्याशी मी त्यांच्या -माझ्या लेखनाविषयी ,मतांविषयी अल्प बातचीत केली. मग आंतरजालावरच्या इतर चांगल्या गोष्टींची चर्चा झाली ,सर्वात सुंदर ,वापरायला सुंदर संस्थळ मिपाच आहे याबाबत सर्वांना मिपाकर असल्याचा आनंद समाधान आहे हे जाणवलं पण सर्व्हर ,इथली कमी लोकसंख्या अनेकदा रसोभंग करतो याबाबत थोडी नाराजी वाटते हेही एकमत झाले. 

सॅन्डविचवर माझ्या लेकीने चांगला ताव मारला ,स्वधर्म यांचेही सँडविच तिने फस्त केले. चामुंडराय यांनी आणलेलया 'तीर्थ' मिश्रित चॉकलेट बाटल्या भारीच दिसत होत्या. पाच वर्षांपूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याचा सुरु वाईनचा प्रोजेक्ट होता तेव्हा मी आणि मैत्रिणी सॅम्पल टेस्टिंग नावाखाली चढेपर्यंत वाईन प्यायलो होतो.पण आज अहोंसमोरच हे तीर्थ पिताना आता घरी निदान वाईनची बाटली आणायला हरकत नाही असे वाटतंय :)

मी आणलेली पालक शंकरपाळी,तिळगुळ वड्या व माझ्या इतरहि अनेक पाककृतींचे सर्वानी कौतुक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. 

इकडे आमच्या यांना आधीच तंबी दिल्याने त्यांनी श्रोता होण्याचे स्वीकारले :) गिरीजाला मात्र हे काका मला कसे ओळखतात याचे आश्चर्य वाटत राहिले. 

अखेर कट्टा समारोपाकडे वळाला तेव्हा कुमार १ यांनी तेंडुलकरांचे स्त्रीचे आयुष्यातले मोलाचे स्थान अशा आशयाचे खूप सुंदर शब्दांचे सादरीकरण केले ... 

हळू हळू आम्ही डेक्कनच्या गर्दीत कट्ट्याच्या आठवणी घेत विरून गेलो... जय मिपा :)






Tuesday, December 16, 2025

मुळ्याचा चटका

 मुळ्याचा चटका

लिंबू, दही असे घालून चटकदार, हिरव्या मिरच्या घालून झणझणीत, वरून भुरभुरलेली कोथिंबीर, खोबरे आणि मुख्य म्हणजे कच्च्या (रॉ) चवीच्या भाज्या, फळे यांच्या कोशिंबिरी, वाटलेली डाळ, कोसांबरी पहिल्यापासून फार आवडतात.

या सर्व वर्णनात तंतोतंत बसणारी कैरीची डाळ तर जीव की प्राण आहे.इतर हळदी-कुंकू मागे पडले. पण कैरीची डाळ, पन्हे, पानाफुलांनी गंधित चैत्र... यासाठीच चैत्रगौर मी खूप उत्साहाने करते.

आता ऐन थंडीत कोण बरे अशा पाककृतीत परफेक्ट बसणार? गाजर? नाही, तो गोडगोड हलव्यातच बरा... तर तो मुळा! वेगवेगळ्या पदार्थांची नावे घेतली की पंचेंद्रिये सळसळायला हवीत! हलव्याचा गाजरी रंग डोळ्यांना- दोन्ही आरोग्याने आणि दृश्याने सुखावतो. हुरड्याचा गंध अस्सल आहाराचा नाकात भरतो. यात जर मुळा म्हटले की त्याचा उग्र वास, कडवट चव नाकाला नकोशी होते.

मुळ्याचा चटका या पाककृतीत मात्र ती चव बन्यापैकी बॅलन्स होते. कैरीच्या डाळीप्रमाणे यातही भिजवलेली हरभरा डाळ, मिरच्या मुख्य घटक आहेत. पण अजून पौष्टिकता वाढावी व हरभरा डाळ आवडत नसल्यास भिजवलेले हिरवे मूगही वापरले आहेत. वरून चुरचुरीत तेलाची फोडणी म्हणजेच चटका दिला की झाला मुळ्याचा चटका... लय भारी!



साहित्य

१ मोठी वाटी किसलेला मुळा (साधारण २ मुळे)

१/२ वाटी भिजवलेली हरभरा डाळ

१/४ वाटी भिजवलेले हिरवे मूग

४ हिरव्या मिरच्या

१/४ वाटी किसलेले खोबरे (ओले किंवा सुके)

१/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

एका लिंबाचा पूर्ण रस

चवीपुरते साखर व मीठ

फोडणीसाठी: जिरे, मोहरी, लाल सुकी मिरची, हळद, हिंग

कृती

१. भिजवलेली हरभरा डाळ, मूग, मिरच्या, दोन चमचे कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घ्या.

२. वाटलेल्या डाळीला किसलेल्या मुळ्याबरोबर एकत्र करा.

३. या मिश्रणात खोबरे, कोथिंबीर एकत्र करा.

४. लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा.चवीनुसार मीठ व साखर घाला.

५. तेलात जिरे, मोहरी, लाल सुकी मिरच्या, हळद, हिंग यांची फोडणी करून मुळ्याच्या डाळीला चटका द्या.

६. लहान मुले तरीही खात नसल्यास डोश्याच्या पीठात किंवा धिरड्याच्या पीठात हे मिश्रण टाकून डोसे किंवा धिरडे बनवा.

७. कच्च्या मुळ्याची जी चव आहे, ती अनुभवण्यासाठी याला अजिबात वाफवू नका.

ही रेसिपी हिवाळ्यातील पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, ज्यात मुळ्याची कडवट-उग्र चव डाळ,लिंबू आणि फोडणीतून परफेक्ट बॅलन्स होते. तोंडी लावण्यासाठी किंवा सलाडसारखी भाकरी-भाजीबरोबर उत्तम!

Sunday, December 7, 2025

पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग



पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग

लेखिका -#ऐश्वर्या_रेवडकर


स्वतःचे अवकाश शोधणाऱ्या स्वच्छंदी मुली लग्न संस्थेतील कच्चे दुवे ,पुरुषत्वाचा दुराभिमान, पितृसत्ताक वर्चस्व, स्त्री-आदरातील सामाजिक दांभिकता या मुद्द्यांपर्यंत तटस्थपणे नक्कीच पोहोचतात.तेव्हा त्या विचारांना फेमिनिझम म्हणत आपण हेटाळतो .पण फेमिनाईन/ faminine energy सारखी सुंदर गोष्ट ज्यासाठी स्त्री-लैंगिकता व स्वातंत्र्य याबाबत बोलणंही, समजून घेणेही गरजेचे असते,हे भारतीय समाजात कोणाच्याही गावी नसते.याविषयी मतं मांडण हे अनेक सामाजिक संकेत मोडण्यातहजमा आहे. तिथे ही कादंबरी एक अबोल विषयातील  एक सूर्यफुल आहे, स्वच्छ ब्राईट!

कादंबरीची नायिका मुक्ताचे अनेक प्रकारच्या पोरकपण तिला ज्या ज्या वेळी हक्काचं घर, स्पर्श, शांती मिळाल्याचं सुखाने न्हाऊ पाहत,त्यात्यावेळी पुरुषाची फुकाची मर्दानी/पुरूषत्व त्या साऱ्याचा चुराडा करते. कादंबरीत मुक्ताची फरफट वाचत असतांनाच तिचं आपल्या अवघड अशा ‘सर्जरी’ कार्यातील  डॉक्टर म्हणून एकाग्रता थक्क करते. बाई स्वतःच्या पायावर उभी असणं, तिच्या कामाची ती स्वाभिमानी असणं हा तिच्या अवकाशाचा पाया आहे, हे पुन्हा पटतं.

अशा काळ्यागहिऱ्या  आयुष्याच्या लाटांवर शरीराच्या नावेला अनेकदा आत्महत्येचा भोवरा गिळंकृत करू पाहतो. पण दरवेळी उठून उभी राहणारी मुक्ता अजब रसायन आहे.

खूप दिवसांनी आयुष्याचे जसं आहे तसं उघडं-नागडं सत्य सांगणारी, स्वीकारायला लावणारी कादंबरी वाचली. कुठेही जडजड वाक्यांचा मुलामा देत कादंबरी वाढवून मांडलेली नाही.

सारे समाज नियम माणसानेच बनवले आहेत.त्यात अडकून न राहणाऱ्या स्वतः स्वतःच्या नियमांनी जगणाऱ्या मुक्ता  आजूबाजूला नक्कीच आहेत.

-भक्ती

Saturday, November 22, 2025

मातृदेवता

 #आदिमाया 

#लेखक -#अशोक_राणा

#मातृदेवता

आजही जिथे स्त्रीयांववर अमानुषता करणारा समाज अस्तित्वात आहे.तो मातृसत्ताक संस्कृतीची मूळे पूर्ण विसरला आहे. तो समाज सिंधू संस्कृतीतील मातृदेवतांचे उगम  वाचायला,जाणून घ्यायला उत्सुक कसा असणार?

पण ही सरसकटीकरण करणारी वाक्यं न मानता ज्यांना संस्कृती, संस्कृतीची रूपांतरणे जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे.

पुस्तकात आर्येतर पूर्व काळातील मातृगणांची ओळख करून देली आहे. आर्यनंतरच्या काळात सिंधू व इतर मातृगण सत्तेतील देवतांचे रूपांतर कसे झाले?हे यात अनेक ठिकाणी सांगितले आहे.


काही मातृदेवतांना हीन दर्जा देण्यात आला,उदाहरण पूतना, होलिका, दिती, निऋती, अमावस्या, दनू,माया,कद्रू इ. तर काही ज्या समाजमनात खोल छाप सोडून  होत्या, त्यांच्या मनातून दूर होत नव्हत्या अशा मातृदेवतांचे मुळ रूप बदलून त्यांना वैदिक, बौद्ध देवतांत समाविष्ट केले जसे लक्ष्मी, सरस्वती,साती आसरा, सटवी, जीवती-हारिती, आदिती!


या पुस्तकात असंख्य गोष्टी/कथा या मातृदेवतांविषयी सांगितल्या आहेत.

ज्या समजून घ्यायला खूप काळ लागू शकतो. 

तरीही पुस्तक वाचताना अनेक नवीन शिल्पे, मूर्ती यांची रोचक माहिती मिळाली. अशा शिल्पांचा केवळ उल्लेख इथे दिला आहे. 

ज्या मूळच्या सिंधू संस्कृतीतील ,बौद्ध,यक्ष संस्कृतीतील आहेत,हे मत पुस्तकात आहे.


1. शाल भंजिका - बुद्धमाता मायादेवी  



शालभंजिका शिल्पांमध्ये एक स्त्री वृक्षाची फांदी पकडलेली दाखवली जाते, जी बौद्ध कलेत मायादेवीला बुद्धाच्या जन्माच्या वेळी साल वृक्षाची फांदी पकडलेली दर्शवते; ही शिल्पे प्रजननशीलता आणि निसर्गाचे प्रतीक आहेत, ज्यात त्रिभंग मुद्रेत फळांनी भरलेल्या वृक्षासह स्त्री दाखवली जाते. भारतीय कलेत ही थीम प्राचीन काळापासून आढळते, जसे सांची आणि भरहूत येथील स्तूपांवर. गंधार आणि मथुरा शैलीतील शिल्पांमध्ये मायादेवीच्या जन्मदृश्याची निगडित असते, ज्यात ती उभी राहून साल वृक्षांची फांदी पकडलेली दिसते


2. सिंधूसंस्कृतीतील सापडलेल्या मातृदेवता शाकंभरी?



ही हरप्पा (Harappa) येथे सापडलेली एक अत्यंत महत्त्वाची सिंधू-सभ्यतेची मुद्रा (Seal) आहे, जी मातृदेवतेचे सर्वात प्राचीन पुरावे मानली जाते.

ही मुद्रा इसवी सनपूर्व २६००–१९०० च्या काळातील असून, तिच्यावर उलट्या (उलट्या पायांनी) बसलेली एक स्त्री-आकृती आहे, जिच्या योनीतून एक रोपटे (वनस्पती) उगवताना दिसते – ही पृथ्वीमाता किंवा प्रजनन-देवतेचे स्पष्ट प्रतीक आहे.

शाकंभरी ही नंतरची देवता असली तरी तिचे मूळ सिंधूतील मातृदेवतांशी जोडले जाते, ज्यात लज्जा गौरी सारख्या नग्न बसलेल्या मूर्त्या शाकंभरीच्या रूपाशी संबंधित आहेत. वडनगर येथील प्राचीन शिल्पे लज्जा गौरी/शाकंभरी दाखवतात, ज्यात मानवी रूपात फुलांच्या डोक्याची देवी दिसते


3. यक्षी  

यक्षी शिल्पे भारतीय कलेत निसर्ग आत्म्याचे रूप दाखवतात, ज्यात पूर्ण विकसित स्त्री आकृती असते, जसे दीदारगंज यक्षी ही मौर्य काळातील चमकदार दगडी मूर्ती. अमरावती स्तूपातील यक्षी शिल्पे दुसऱ्या शतकातील असून, त्या वृक्षाशी जोडलेल्या दाखवल्या जातात. मथुरा आणि गांधार कलेत यक्षी सहायक आकृत्या म्हणून आढळतात, ज्यात अलंकृत वस्त्रे आणि दागिने असतात. केरळातील यक्षी मूर्त्या लोककलेत भयानक किंवा मोहक रूपात दिसतात, जसे पद्मनाभस्वामी मंदिरातील


4. गजलक्ष्मी - / मायादेवी  



गजलक्ष्मी शिल्पांमध्ये लक्ष्मीला कमळावर बसलेली आणि दोन हत्तींनी अभिषेक करताना दाखवले जाते, जी संपत्ती आणि प्रजननशीलतेचे प्रतीक आहे; ही थीम प्राचीन भारतीय मंदिरे आणि गुहांमध्ये आढळते, जसे वाराह गुहा किंवा कश्मीरमधील ६व्या शतकातील मूर्त्या. बौद्ध कलेत ही मायादेवीशी जोडली जाते, ज्यात जन्मदृश्यात कमळ आणि हत्तींचा समावेश असतो. सातवाहन आणि शुंग काळातील शिल्पे २रे शतक बीसीई ते १ले शतक सीई पर्यंतच्या आहेत. कांस्य आणि दगडी मूर्त्या हिंदू आणि बौद्ध दोन्ही परंपरांमध्ये लोकप्रिय आहेत


5. तेरमधील - २५०० वर्ष २५०० वर्षांपू्वीची पौंपई मूर्ती 



पॉम्पेई लक्ष्मी ही इसवी सन ७९ मधील व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेकात पुरलेल्या इटलीतील पॉम्पेई शहरात सापडलेली हत्तीदान्ताची (ivory) सुंदर भारतीय शैलीची मूर्ती आहे.

ही मूर्ती इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातून (बहुधा मथुरा किंवा दक्षिण भारत) रोमन साम्राज्यात व्यापारी मार्गाने गेली होती, जे भारत-रोम व्यापाराचे ठोस पुरावे आहे.


6. सिंधूसंस्कृतीतील साती आसरा  



 मोहनजो-दारो येथे सापडलेली सिंधू संस्कृतीची प्रसिद्ध मुद्रा आहे. तिच्यावर दाखवलेल्या सात मानवी आकृत्या (खालच्या बाजूला) काही विद्वानांच्या मते सप्तमातृका किंवा साती आसरा (सात जलदेवता किंवा मातृदेवता) यांचे प्राचीन रूप असू शकते, ज्यांचे मूळ सिंधू संस्कृतीत असल्याचे मानले जाते.

7. निऋती  



निरृति देवीची शिल्पे दक्षिण-पश्चिम दिशेची रक्षक म्हणून दाखवली जातात, ज्यात भयानक रूप, चार हात, खड्ग आणि साप असतात; राजस्थान किंवा उत्तर प्रदेशातील ९००-१००० सीई च्या वाळू दगडी मूर्त्या प्रसिद्ध आहेत. ती मृत्यू आणि क्षयाची देवी असून, उंच केस आणि सापांनी गुंफलेली दिसते. मंदिरांच्या आयकॉनोग्राफीत लोकपाल म्हणून समाविष्ट, ज्यात काळे रूप आणि सोनेरी केस असतात. दक्षिण भारतीय मंदिरांत निरृतिची शिल्पे राजरानी मंदिरासारख्या ठिकाणी आढळतात


9. भूमाता की शाकंभरी सिंधू संस्कृतीतील - भूमाता एकच ? जरीमरी  

भूमाता किंवा शाकंभरीची सिंधू संस्कृतीतील शिल्पे मातृदेवतांच्या टेराकोटा मूर्त्यांशी जोडली जातात, ज्यात लज्जा गौरी सारख्या नग्न बसलेल्या आकृत्या प्रजनन आणि पृथ्वी देवी दाखवतात; भूमाता आणि शाकंभरी एकच असू शकतात, ज्यात भाज्या आणि फळांची देवी रूप. जरीमारी ही लोकदेवता रोगनिवारक असून, तिची शिल्पे महाराष्ट्रातील लोककलेत साधी दगडी किंवा टेराकोटा असतात. वडनगर येथील प्राचीन शिल्पे शाकंभरीला मानवी रूपात दाखवतात, सिंधूतील मेहरगढ मूर्त्यांशी समान


10. सटवाई / जिविती । हारिती  

सटवाई किंवा जिविती ही लोकदेवता असून, तिची शिल्पे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात साधी दगडी किंवा टेराकोटा असतात, जी मुलांच्या रक्षणकर्ती दाखवतात. हारिती ही बौद्ध देवता असून, तिची शिल्पे गांधार कलेत धूसर शिस्ट दगडात असतात, ज्यात ती मुलांसह बसलेली किंवा पांचिकासह दिसते; २रे-३रे शतकातील मूर्त्या संपत्ती आणि प्रजनन दाखवतात. हारितीची रूपांतरण कथा शिल्पांत दानवी ते देवी रूपात दिसते, जसे लॉस एंजेलिस म्युझियममधील. भारतीय आणि पाकिस्तानी गांधार शिल्पांत हारिती मुलांसह उभी असते


11. गार्डन्स ऑफ अॅडोनीस- नवरात्री  

गार्डन्स ऑफ अॅडोनीस हे प्राचीन ग्रीक विधी असून, त्यातील कलश आणि बीज रोपणाशी संबंधित कलाकृती टेराकोटा भांडी आणि मूर्त्या आहेत, ज्या प्रजनन रीतिशी जोडल्या जातात. नवरात्रीशी समानता असून, घाटस्थापना कलशातील बीज रोपणाशी, परंतु शिल्पे दुर्गा किंवा देवी मूर्त्यांमध्ये दिसतात, जसे १० डोके आणि १० हात असलेली दुर्गा शिल्पे. प्राचीन भारतीय कलाकृतींमध्ये फलदायी देवी मूर्त्या नवरात्रीशी जोडल्या जातात. ग्रीक कलाकृतींमध्ये अॅडोनीसच्या मूर्त्या आणि बागा दाखवल्या जातात, ज्या मृत्यू आणि पुनरुत्थानाचे प्रतीक.


12.काली आणि छिन्नमाता -छिन्नमस्ता देवीच्या शिल्पांमध्ये ती स्वतःचे शीर कापलेली, रक्ताच्या तीन धारा वाहत असलेली आणि काम-रती जोडप्यावर उभी असलेली दाखवली जाते; ही शिल्पे मुख्यतः तांत्रिक कलेत आढळतात, जसे १९व्या शतकातील राजस्थानी शैलीत किंवा मंदिरांच्या मूर्त्यांमध्येदिसते.

Sunday, November 16, 2025

'लोकधन' (ऐसी अक्षरे -) ते..... 'The folk आख्यान'

 'लोकधन' (ऐसी अक्षरे -) ते..... 'The folk आख्यान'




इथे पुस्तक परिचयासोबतच लोककला हा सामान दुवा असणाऱ्या आणखीन एका कार्यक्रामाचाही थोडक्यात आढावा दिला आहे.  

मला मानवाच्या इतिहासाबद्‌दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात.त्या इतिहासाची केवळ पानेच /लिखित साहित्य  वाचून सध्यातरी  समाधान करून घेतले जाते. तसेच विविध उत्खनन, स्थापत्य, वस्तू, भौगोलिक खुणा त्या इतिहासाजवळ घेऊन जातात . पण अनेक मौखिक परंपरा -लोककला हा वारसा जपत आलया  आहेत. लोकपरंपरा काळानुरूप बदलाचे वादळ पांघरूण वेळोवेळी रुप बद‌लून समाजा समोर येतात. परंतू काळ आता इतका वेगवान होत क्षणोक्षणी बदलत आहे की है 'लोकधन' संपुष्टात येण्याची  भीती आहे.


डॉ. संजय बोरुडे लिखित 'लोकधन' हे पुस्तक मौखिक लोकपरंपरा आणि इतिहास यांचा अनमोल वारसा जपणारे आहे.


मौखिक लोकपरंपरा:यात ओवी, आख्यान, लोककथा, उखाणे, आन्हे (कोडं), कूट, आणि फूट यांसारख्या मौखिक लोककलांचे सोप्या व संक्षिप्त रूपात वर्णन पुस्तकात आहे.


ओवी: हा छंद ६व्या शतकातील ग्रंथांमध्येही आढळतो. 'विवेकसिंधू' (११८८) हा ग्रंथ याच छंदात रचलेला आहे. यात जात्यावरची ओवी, सावित्रीबाई फुलेंच्या ओव्या, वैधव्य ओव्या, धनगरी ओव्या, डाकची/मतिकाची ओवी (उत्तरक्रियेत गायली जाणारी),मोहिनीराजाच्या ओव्या  अशा अनेक रंजक प्रकारांच्या ओव्यांचा समावेश  आहे.


स्त्री गीते: गौरी-गणपती सणातील गौरी गीते, काथवट कणा, आणि मंगळागौरीची गीते यांचाही समावेश आहे.


उखाणे ,आन्हे(कोड ) सवाल-जवाब, कलगी-तुरा सारख्या सवाल-जवाब प्रकारांची गमतीशीर उदाहरणे आहेत.


सण आणि लोकपरंपरा:


कोजागिरी, दिवाळी, नवरात्र यांसारख्या सणांच्या लोकपरंपरांचा आढावा घेतला आहे.ज्यात अनेक लोककथा या सणाभोवती कशा आल्या हे सांगितले 


दिवाळी: वसुबारस (गाय-गौ-धेनू), धनत्रयोदशी (धन्वंतरी), लक्ष्मीपूजन (अलक्ष्मी-करमूणी) यांमधील देवतांची समुद्रमंथनातून आलेली रत्ने या क्रमाने माहिती दिली आहे,समुद्रमंथन रत्ने दिवाळी सण असा विचार माझ्यासाठी नवाचं होता. 


बलिप्रतिपदा: दसऱ्याला  पाताळात धाडलेल्या बळीराजा बलिप्रतिपदेला पुन्हा प्रगटणार अशी वदंता होती.तेव्हा हा सण बळी राजाच्या स्वागतासाठी साजरा करण्याची पद्धत सुरू झाली, तसेच हा कृषीपरंपरेतील दुःखाचा सण असल्याचेही मत काही प्रवाहात नमूद केले आहे.


इतिहास आणि शेतीचा शोध:शेतीचा शोध आदिमानवाच्या काळात स्त्रीने कसा लावला, याचा एक रंजक संदर्भ आहे. पुरुष शिकारीला बाहेर असताना गुहेत असलेल्या स्त्रियांनी(काहि ,बाळंत ,लेकुरवाळ्या असत) फेकलेल्या फळांच्या बियांपासून झाड तयार होते, हे निरीक्षणाने जाणले आणि शेतीकडे वाटचाल सुरू झाली.


इतर लेख:हलगी, वाघबारस, चिन्हसंकेत, मापनाची साधने, कुलचिन्हे  यांसारख्या विविध विषयांवरील लेखांचा समावेश आहे.


लोकपरंपरेतील शब्दांचे अर्थ:


गजी = गजनृत्य


आन्हा = कोडं/आयना


सुंबरान = स्मरण


आख्यान  = ओवीतला गद्य भाग


खेडणे = शेती करणे


जित्राब = जनावरे

हलकारे=सांगावा पुढे जाणे 

हलगीच्या चाली =कावडीची चाल,कुस्तीसाठी मर्दानी चाल,हलगी आंदोलन 

हलगी=कडे,कडेकरी 


 'The Folk आख्यान' 

"लोकधन पुस्तक वाचून लोककला, लोकपरंपरा याविषयी भारावलीच होते.तोच दुपारी ह्यांचा फोन आला, "तिकीटे काढली आहेत, आपल्याला 'The folk -आख्यान' कार्यक्रम पाहायला जायचे आहे. या कार्यक्रमाविषयी मी ऐकलं होत, रील्स पाहिल्या होत्या. म्हटलं चला अजून जाणून घेऊ‌या. तर यूट्युब यातील प्रमुख सूत्रधारांच्या-कलाकारांच्या  मुलाखती ऐकल्या.


ऐकूनच थक्क झाले. कारण पुस्तकात वाचलेल्या जवळपास सर्व लोककला, लोकवाद्य  वापरुन हा भन्नाट कार्यक्रम या २५ वी तल्या कलाकारांनी भव्य-दिव्य असा  तयार केला आहे. विशेष करुन ईश्वर अंधारे' ज्यांनी सर्व कार्यक्रमाचे लेखन केले आहे, त्यांचेही  (MSC. Electronic) मी शिकले त्याच New Arts, commerce & science महाविद्यालयात शिक्षण झाले आहे. याच महाविदयालयाच्या आणखीन एका  विद्यार्थ्याने  आधीच महाराष्ट्र- मराठी  सिनेमाला एक नवी दृष्टी-वाट दिली - ते नागराज मंजुळे.आणि या कार्यक्रमाची  संगीतकार जोडी हर्ष-विजय यातील  हर्ष हे  सासरच्या मूळगावाच्या शेजारच्याच गावचे म्हणजे 'उम्मापूस्चे' (बीड) आहेत. त्यामुळे अजून जवळीक वाटली :) 



तर या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यात लोकपरंपरेतील प्रसि‌द्ध, लोकप्रिय गीते वापरुन कार्यक्रम केला जात नाहीतर ईश्वर अंधारे यांनी स्वतः  नव्याने  रचलेले आणि लोककलेचे विविध प्रकार असलेले गीतप्रकार सादर केले आहेत.. 


सादर केलेले गीतप्रकार:


आवतन, पालखी पलंग, आराधना गीत, अभंग, ओवी, सुंबरान, गवळण, घाटोळी,पोवाडा, कोड-कूट, भारुड, वाघ्या मुरळी गीत, नमन गण,गोंधळ यांसारखे विविध गीतप्रकार सादर केले आहेत.


लोकवाद्यांची जुगलबंदी (तालकचेरी):यात महाराष्ट्रातील लोकपरंपरेतील अनेक  लोकवाद्यायची जुगलबंदी -तालकचेरी ऐकतांना अंगावर रोमांच उभा राहिल्याशिवाय शहत नाही, संबळ, पखवाज, ढोलकी, हलगी, तुणतुणे, घुंगूर, टाळ-चिपळ्या, पायपेटी ,बासरी, झांज, मृदंग, डफली, मादळ, तारपा, ताशा, मंजीरा यांसारख्या अनेक लोकवाद्यांची तालकचेरी (जुगलबंदी) रोमांचक अनुभव देते.


ओवी सादर करताना गायिकांचा आवाज 'काळजाला हात घालतो.'


सद्यस्थितीवरील भाष्य:

कार्यक्रम कीर्तनकार , शाहीर, पोतराज, वासुदेव, बहुरुपी, गोंधळी, लावणी कलाकार यांसारख्या लोककलावंतांच्या सद्यस्थितीवर भाष्य करतो.

महाराष्ट्राची अस्सल 'लोक' कला संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, याबद्दल प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालतो, ज्यामुळे कार्यक्रम भावूक आणि विचार करायला लावणारा ठरतो.


एकूणच, 'लोकधन' पुस्तक आणि 'The Folk आख्यान' कार्यक्रम, दोन्ही महाराष्ट्राच्या मौखिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करतात

-भक्ती

आता पुस्तकातील  काही आन्हे विचारते ,काही शब्द अपशब्द वाटतात पण ती बोलीभाषा आहे ,पण उत्तर अश्लाघ्य नाही. 

१. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. 


२. माड्यावर माड्या छत्तीस माड्या, हात नाही परत तर बोंबल भाड्या.. 


३. कोकणातून आला भट, धर शेंडी, आपट 


४. नेसली सतारा लुगडी, तरी **** उघडी 


५. केशेरावाचा घोडा बोटेरावने नेला, तळी मुक्काम केला, नखरड्याने जीव घेतला. 


६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. 


७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी 


८. चुलीत गेली अन् गर्भार झाली..


९. एवढीशी सकू, तिला काजळ कुंकू 


१०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई 


११. एवढीशी ननूबाई, पदर केवढा घेई 


१२. सुपात लाह्या त्यात रुपाया 


१३. तीन लाकडं आणि अकरा माकडं

Monday, October 27, 2025

द हिडन फिगर!



 महिला दिनानिमित्त मला एक मस्तच चित्रपट सापडला.द हिडन फिगर!

हा सिनेमा सत्य व्यक्तीरेखांवर आधारित आहे.प्रगत मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत १९६१ ला वर्णद्वेष होता.गडद रंगांच्या लोकांना खूप हीन मानले जायचे.अशा वेळी देखील चक्क नासामध्येही हा भेदभाव होता.पण कॅथरीन जॉन्सन, डोरोथी वॉन आणि मेरी जॅक्सन,  या तीन हुशार गडद रंगांच्या संशोधक बायकांनी इतिहास घडवला . गणितज्ञ ,मून मिशन भाग घेणारी कॅथरीन,आयबीएम कम्प्युटर हेड होणारी डोरोथी आणि मेरी नासातली पहिली कृष्ण वर्णीय  इंजिनिअर होती.

त्यांचा लढा खरच खुप प्रेरणादायी सिनेमा आहे.

Sunday, October 26, 2025

तुरीच्या दाण्यांची कचोरी

 "#तुरीच्या_दाण्यांची_कचोरी" ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगांपासून काढलेले हिरवे दाणे वापरून बनवली जाणारी ही कचोरी कुरकुरीत आणि मसालेदार असते. ती चहा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासोबत उत्तम लागते

दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे.एक तोडी केली तेव्हा आज कचोरी केली.पुढच्या तोडीला आमटी करणार आहे.




आवश्यक साहित्य (भरणासाठी):

तुरीचे हिरवे दाणे (सोललेले): १ वाटी +१/२ वाटी मटार

ओले खोबर्‍याचे तुकडे: २ वाट्या (कुटलेले)

हिरव्या मिरच्या,आलं: २-३ (बारीक चिरलेल्या)

धनेपूड-३ टीस्पून

जिरे+बडीशेप पूड : १ टीस्पून

हळद: १/२ टीस्पून

लाल तिखट: १ टीस्पून (चवीनुसार)

मीठ: चवीनुसार

कोथिंबीर+कसूरी मेथी : ३ टीस्पून (बारीक चिरलेली)

तेल: १ टेबलस्पून (भरण परतण्यासाठी)

आवश्यक साहित्य (डोघासाठी):

मैदा: २ वाट्या

तूप किंवा तेल: ४ टेबलस्पून (मळण्यासाठी)

मीठ: १ चिमूट

गरम पाणी: आवश्यकतेनुसार (मळण्यासाठी)


कृती-

: तुरीचे दाणे +मटार दाणे स्वच्छ धुवून घ्या.कुकरमध्ये २ शिट्टींत वाफवून घ्या.वाफवून झाल्यावर मिक्सरमधून मध्यम आकारासाठी फिरवून घ्यायचे. 


एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्या घालून परतवा. नंतर कुटलेले खोबर्‍याचे तुकडे, धने पावडर, हळद, लाल तिखट ,जिरे+बडीशेप पूड आणि मीठ घालून २-३ मिनिटे परतवा. उकडलेले तुरीचे दाणे+मटार दाणे घालून ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजवावे, जेणेकरून दाणे मऊ होतात पण फुटत नाहीत. शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण थंड होऊ द्या. हे सारण तयार आहे.


पारीचे कणीक :

 एका भांड्यात मैदा, मीठ आणि तूप घालून चांगले मळा. हळूहळू गरम पाणी घालत मऊ आणि लवचिक डोघ तयार करा (खस्ता डोघासाठी तूप चांगले मिसळा). डोघाला १० मिनिटे झाकण लावून बाजूला ठेवा.



कचोरी भरून आकार द्या: डोघाची लहान-लहान गोळ्या करा . प्रत्येक गोळी चपट्या करून भरणाचा थोडा भाग भरून बंद करा. हाताने हलकेच चपटे करा किंवा लाटा जेणेकरून भरण बाहेर येऊ नये. मध्यभागी थोडे जाड ठेवा.


या कचोऱ्यांना वरतून तेल लावून #airfryer मध्ये १८०°वर १० मिनिटे ठेवा.नंतर उलटून परत १८०°वर ५ मिनिटे ठेवा.

किंवा

तळा:  कचोर्‍या मंद आचेवर सोनेरी व्हायपर्यंत तळा. 



ही कचोरी चटणीसोबत (लिंबू-मिरची चटणी किंवा कोथिंबीर चटणी) सर्व्ह करा.

ती २-३ दिवस टिकते, म्हणून स्टोअर करून ठेवता येते.


पौष्टिकता: तुरीचे दाणे प्रोटीन आणि फायबरने युक्त असल्याने ही कचोरी आरोग्यदायी आहे.

Monday, September 29, 2025

व्हिन्सेंट व्हान गॉग -अभिवाचन प्रयोग

 व्हिन्सेंट व्हॅन गॉग (१८५३-१८९०

 उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी  घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले. विन्सेंट च्या आयुष्यात प्रेमाची कमतरता कधीच भरून आली नाही.



विन्सेंट व्हॅन गॉग, एक डच चित्रकार, ज्याच्या जीवनाची कथा उत्कटतेने आणि दुखद घटनांनी भरलेली आहे. आयुष्यात जिवंतपणी त्याचे केवळ एकच चित्र विकले गेले. तरीही चित्रांची साथ त्याने शेवटपर्यंत सोडली नाही



सूर्यफूल "आणि "तारांगित रात्र" ह्या चित्रांनी त्याच्या मृत्यूनंतर त्याला अमरत्व दिले. - अशा रंगांच्या जा‌दूगाराची एकाकी कहाणी लेखक-आर्यविंग स्टोन यांनी लिहिली. ज्याचा अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केले. हीच गोष्ट व्हान गाँगच्या चित्रांसह अभिवाचन‌ कलाकृतीद्‌वारे सादर करण्याचा यशस्वी प्रयोग  शेखर नाईक यांनी साकार केला. धनेश, धीरेश, श्रद्धा, अश्विनी यांनी आवाजाच्या अप्रतिम सादरीकरणातून या चित्रकाराची कथा उलगडून सांगितली.



खरे पाहता त्याच्या घरातच कलाक्षेत्रातील कलाकृतींचे विक्रीचे धागेदोरे  होते. पण प्रेमाच्या शोधात विन्सेंट नंतर अजूनच एकाकी झाली पुढे त्यांना धार्मिक श्रद्‌धेची गोडी लागली व पाद्री बनण्याचा प्रयत्नही केला. याबाबतचे ऑफिशल पदवी ना तत्सम अभ्यासक्रम ते पूर्ण करू शकले नाही परंतू बेल्जियमधील बोरिनेज येथील कोळसा खाणी भागात त्यांनी मिशनरी म्हणून काम स्वीकारले.



 तिथल्या गरीब लोकांप्रमाणे राहण्याचे ठरवून त्याने मोठे घर सोडून लहान झोपडीत राहायला सुरु केले. काळाचा घाला पडला एका दुर्घटनेत अनेक खाण कामगारांचा मृत्यू झाला .या दुःखाच्या काळात तो सामान्यांप्रमाणे त्यांच्यासोबत होता पण चर्चला हे प्रतिष्ठेला धक्का वाटल्याने त्यांनी त्यात्या लोक या पदावरून दूर केले.

तरीही पुढे या काळातील कथा सरकतांना खाणीतील कामगारांचे त्यांच्या कुटुंबाचे अशांततामय

कष्टमय जीवनही व्हिन्सेंटने चित्रात रेखाटले, जी चित्रे मी कधीच पाहिली नव्हती.



अशाच उतरत्या काळातही -कुपोषणाच्या अवस्थेत ते गेले.पण भावाच्या थिओ यांच्या सांगण्यावरून पुन्हा मन लावून चित्रे काढू लागला. भावाने दिलेल्या आर्थिक मदतीने चित्र काढत होता. घरालाही पिव‌ळा रंग दिला, yellow house तो त्याचा स्टुडिओ होता. पुढे एका वेश्येशी त्याची ओळख झाली तेथील वेश्यालयाचेही अनेक चित्र  त्याने रेखाट‌ले. चित्रकार गॉगीनने त्याला आठवणीतून चित्र काढण्याची सूचना केली, त्यानुसार त्याने अनेक गर्द रंगांची चित्रे रेखाटली. पण चित्रकाराला पोटाची भूक अनेकदा मिटवता येत नसे .अशा अनेक ताणतणावात गोगीन- व्हेन गॉगची मैत्री तर तुटली पण कानही तुटला..... अशाच एका भ्रमाच्या वेळी व्हिन्सेंटने स्वतःचा कान कापला होता, तो कान त्याने वेश्यालयातील गॅबीला दिला...?





व्हॅन गॉगला वेडा समजून त्याची रवानगी लोकांच्या तक्रारीमुळे  मनोरुग्ण दवाखान्यात करावी लागली. तिथल्या डॉक्टर रे' यांच्या सहा‌नुभूती वागणूकीने त्याला हायसे वाटले असेल.तिथे क्लिनिक,बागा,प्रिझनर राऊंड, स्टाररी नाईट चक्रव्यूहाचे चित्र अशी अनेक चित्रं रेखाटली.

'स्टारसी नाईट' हे चक्रव्यूहासारखे चित्र याच काळात काढले.



परंतू १९९० नंतर गंभीर आजारात असतानाच गव्हाच्या शेतात स्वता:वर गोळी झाडली. तो आधीच अशक्त झाला होता, त्यात जखमेचा संसर्ग वाढून तीन दिवसातच व्हॅन गॉग मरण पावला. अंतिम काळातही भावाने 'थिओने धाव घेतली पण "दुःख कायमचे राहीले" गॉग मृत्यू पावला.


पोट्रेट, निसर्गचित्र, फुलं, ऑलिव्ह, फळबागा, शेतं, समुद्र होड्या अशी अनेक हिन्सेंट व्हॅन गॉग यांची चित्रे आज सर्वात अधिक मूल्य मिळवणाऱ्या चित्रांपैकी आहेत.पण विन्सेंट व्हॅन गॉग यांचे आयुष्य कायम दुःखमय राहिले.



त्याच्या आयुष्याच्या अनेक घटना अजून आहेत पण  अभिवाचनाच्या  वेळेमर्यादेमुळे थोडक्यात खुप कल्पकपणे व्हेन गॉग #ऊर्जा_रंगभवन येथे सादर झाला.

-भक्ती

Wednesday, September 24, 2025

नवरात्री निमित्ताने

 नवरात्री निमित्ताने 


परवा एक आंतरजालीय व्याख्यान ऐकत होते त्यामध्ये हडप्पा काळापासून ते आताच्या काळापर्यंत 'घट' (मडके) याचे बद‌लले स्वरूप, त्या निगडीत प्रथा सांगितल्या गेल्या. व्याख्यान जरी घाईत ऐकले तरी काही मुद्दे लक्षवेधक, नवीन होते.


'घट' हा मृत्तिकेपासून बनवलेला विविध हेतू‌साठी धार्मिक विधी, साठवणूक, सामाजिक प्रथांसाठी वापरला जात असे.



सिंधू संस्कृतीत व त्या नंतरच्या काळातही द‌फनविधी साठी घटाचा वापर होत असे.जे जन्म ,मृत्यू, पुनर्जन्म  यांचे प्रतिक आहे.घट हा माती, पाणी यांनी तयार होतो. आणि हीच तत्त्वे नव्याने धान्य म्हणजेच सृजनासाठी आवश्यक आहेत. तसेच मानवी जन्म स्त्रीच्या उदरातून होतो तेव्हा स्त्रीचे उदर घटाप्रमाणेच गोलाकार दिसते. 'स्त्री ही सृजनकर्ता, घटरूपी सृजन मानली गेली. मृत्यूनंतर पुन्हा जन्म मिळावा यासाठी मग दफनविधीसाठी घटांचा वापर होत गेला. घटरूपी आकारातून सृजन होते. अशावेळी कुंभाराकडून मृत्य व्यक्तीसाठी शरीर आकारानुसार घटरचना होत. लहान मुलांसाठी मध्यम आकाराचे मडके पुरेसे असत. तर मोठ्या माणसांसाठी मोठ्या आकाराचे चार-पाच मडके एकावर एक अशी आतून पोकळ बनवली जात. त्यात देह ठेवतांनाही त्याचे हात पाय छाती-पोटाजवळ ठेवले जात जे गर्भात असतानाही असेच असतात. अशाप्रकारे दफन केल्यामुळे  ज्यातून सृजन होणार कशा गर्भासारख्या घटातून मृत्यूनंतर जीवनात योग्य जागी मृत व्यक्तीचे सृजन सहज व्हावे

ही श्रद्‌धा! अशाप्रकारचा दफनविधी कमी झाल्यानंतर पुनर्जन्माचे प्रतिक म्हणून केवळ एखादेच मडके शवाजवळ दफन करतांना ठेवले जाऊ लागले.



हळूहळू या 'स्त्री शक्तीची सश्रद्‌ध आराधना घटस्थापना या रीतीरिवाजात झाली. घट ज्या आत पाण्यातून, मृत्तिकेच्या संपर्कातून बीजारोपण होऊन सृजन धान्यरूपातून उगवते. हा सर्व जागरही नऊ रात्री- गर्भारपणाच्या नऊ महिन्यांचे प्रतिक दर्शवितो.

पुढे या घटाभोवती आनंदोत्सव गरबा गोलाकार आकारात खेळला जाऊ लागला. नंतर अनेक विधींमध्ये धातूचा  कलश पाणी नारळ पाने  सृजनाचे प्रतिक /देवीरूप म्हणून मांडले गेले. तत्कालीन जीवनातील जन्म- नश्वरतेचा विचार प्रत्येक कामात होत असे. मग तो सुतार लोहार, कुंभार कोणीही असे. सृजन आणि नाश‌ चक्र प्रत्येक ठिकाणी असतेच.घट घडवणाऱ्या कुंभारांनीही या सृजनाचा जागर समाज घडीत रचला.


तुकारामांनी थेट विठ्‌ठलालाच 'वेडा कुंभार' म्हटले आहे तर माणसाच्या जीवनाला मडक्याची उपमा दिली आहे.


माती पाणी उजेड वारा। तूच मिसळशी सर्व पसारा

आभाळचि मग ये आकारा। तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे

अंत ना पार||


पहिल्या ओळीचा अर्थ सरळ आहे माती , पाणी, उजेड, वारा या चार तत्त्वांचा उल्लेख पंचमहाभूतांशी पृथ्वी, जल, तेज, वायू यांच्याशी जोडता येतो. मानवी शरीरही याच पंचमहाभूतांनी बनले ही धारणा आहे. वि‌ठ्ठल हे सर्व एकत्र करतो अक्षरशः या पसाऱ्याशी खेळतो. माती पाणी सृजनासाठी तर उजेड, वारा जीवनाला गती देतो, हीच गोष्ट कुंभार मडकी-घट बनवताना करतो. आभाळ आकाराला येते- आकाश विश्व जे विशाल आहे ते साकारले सजीवांसह जाते.तुझ्या घटांच्या 'उतरंडी म्हणजे माणसांच्या, सजीवांच्या लहान मोठ्या प्रजाती उद‌याला येतात. कुंभारही लहान ते मोठ्या आकाराची मडक्यांची उतरंडच  बनवत असतो. अशा या मडकं बनवण्याच्या, सृष्टीच्या जीवांच्या जन्म मृत्यूच्या चक्राला, सीमेला कोणतीच सीमा नाही.


घटाघटाचे रूप आगळे । प्रत्येकाचे देव वेगळे । तुझ्याविना ते कोणा न कळे। मुखी कुणाच्या पडले लोणी कुणामुखी अंगार||


आता घट म्हणजे मानव ठरले! 

या घटामध्ये  मानवामध्ये किती ते दिसण्यात,व्यक्तिमत्वात,विचारात वैविध्य आहे. तर प्रत्येक 'घट'  इतरांपासून निराळा आहे. प्रत्येकाचे व्यक्तीमत्त्व निराळे आहे.अशा प्रत्येक मनुष्याचे कर्म व दैव यांचा समतोल कसा  साधता येतो की नाही हे ईश्वरालाच ठाऊक असते.त्यामुळे समतोल साधला  असेल तर लोणी(आनंद) नाहीतर जीवनभर अंगार (दु:ख)!

-भक्ती

Wednesday, September 10, 2025

Kpopdemonhunter

 


खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.

के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.

के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आचच्या पिढीला BTS,Blackpink,Blackswan  यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.

खरंच #kpopdemonhunters  हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.

रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.

या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.

Wednesday, September 3, 2025

कल्पद्रुमाचिये_तळी-पुस्तक परिचय

 #कल्पद्रुमाचिये_तळी

#रा_चि_ढेरे

#ज्ञानदेव 



कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे

दिसते सुनीळ तेज गे 

मज पाहता वेणु वेदध्वनि नाद । 

उमटताली सहज गे बाईजे ।।


ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही. आपल्या संस्कृतीच्या अनेक रुढी परंपरांचे सौंदर्यपूर्ण सादरीकरण त्यांच्या लिखाणाच्या यशाचे गमक वाटते.


'कल्पद्रुमाचिये तळी' या पुस्तकात १९६० नंतरच्या काळात ढेरे यांनी ज्ञानदेव ज्ञानेश्वरी संदर्भात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लिहिलेले अनेक लेख संग्रहित केले आहेत.चार भागात- श्रीज्ञानदेन, श्रीज्ञानदेवी, परीक्षण निरीक्षण,सौंदर्यवेध यात हे  लेख विभागले आहेत.


पहिल्या भागातील लेखात ज्ञानदेवांची बोधभूमी म्हणजेच नाथ संप्रदाय व तत्कालिन इतर संप्रदायाचा ज्ञानदेवांशी असलेला संबंध अभ्यासला गेला आहे.ज्ञानदेवांची कुलस्वामिनी सप्तश्रृंगी असावी की 'म्हाळसा  असावी याचा उहापोह आहे. तसेच या भागात त्र्यंबकेश्वर या स्थलाचे पुरातन महत्व शैव,शाक्त,नाथ परंपरेशी जोडले गेले आहे हे वाचून आश्चर्यचकित झाले.


दुसऱ्या ज्ञानदेवी' भागात ज्ञानेश्वरीत आलेल्या अनेक शब्दांग सुरसपणे धांडोळा वाचायला मिळतो. कीर्ती प्रासाद, कीर्तन या सर्वांचा उल्लेख 'मंदिर' म्हणूनच आहे. मग धर्मकीर्तन म्हणजे 'धर्मार्थ बांधलेले मंदिर या अर्थाने ही संज्ञा हे उमगली.


ज्ञानदेवांचा "गीतारलप्रासाद हे रूपक साक्षात कैलास लेणं या प्रासादावर आधारित आहे .


तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो ।

तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां ॥ २९ ॥

जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा ।

सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊं जो ॥ ३० ॥

लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे ।

आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥ ३१ ॥

तैसेंचि एथही आहे । जे एकेचि येणें अध्यायें ।

आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥ ३२ ॥

मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें ।

उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ॥ ३३ ॥

नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं ।

तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ॥ ३४ ॥

व्यासु सहजें सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं ।

उपनिषदार्थाची माळी\- । माजीं खांडिली ॥ ३५ ॥

तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु ।

तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ॥ ३६ ॥

माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट ।

घडिलें पार्थवैकुंठ\- । संवाद कुसरी ॥ ३७ ॥


 भूतपिशाच गटातले गोंदली कसे 'गोंधळी' होत अनेक देवगण परंपरेत समाविष्ट झाले.


का साधुने गोंदळी। संचरोनि सूये मेळि । 

नाना सुदिनांचा आभाळि। दुर्दिनु कीजे ॥


 लीळा ग्रंथातील कटक शब्द देवगिरी किल्ल्यासाठी आहे यासाठी"अनेक संशोधकांनी असंख्य ग्रंथ चाळले आहेत.ज्ञानेश्वरीतही देवगिरीसाठी हाच कटक शब्द योजिला आहे.


महानुभाव व लिंगायत या समाजाचाही ज्ञानेश्वरीवर बराचसा प्रभाव अनेक ओव्यांत आहे . ज्ञानेश्वरीतील षट्स्थल,षट्चक्रे याच प्रमाणे लिंगांगसामरस्य या संज्ञेसाठी उल्लेख केला आहे.


तिसऱ्या भागात ज्ञानेश्वरांचे चरित्र कोणी कोणी, कोणत्या वेगवेगळ्या काळात लिहिण्याचा प्रयत्न केले हे सांगितले आहे.नामदेव व इतरांचे संशोधन आहे.


 यातील पसायदानाची संहिता या छोट्याशा लेखात  पसायदानात अनेक शब्दांची शुद्वता मांडली आहे.


एणे वाग्यज्ञे तोषखवे । तौखौनि माज द्यावे" एकाच ओवीत दोन भिन्न रूपे का?


भजिजो आदिपुरुषी ऐवजी आदिपुरूखी हेच असावे. 'तापहीन हा शब्द 'तप' तपश्चर्येशी निगडीनत असताना  ताप -उष्णता अर्थाने 'तप' आला नाही.


ग्रंथोपजीविय हे अनेक वचन हवे, ग्रंथोपजीव नाही.


शेवटच्या सौंदर्यवेध हा भाग खरोखर बौद शब्द‌सौंदर्याची रत्नखाणच आहे.ज्ञानेश्वरांच्या अनेक विरहणींचा रसास्वाद आहे. तसेच सगुण ज्ञानदेवांचा सहवास अमृतासम कसा असेल यावर अलौकिक शब्द‌माला गुंफल्या आहेत.


लेखकाप्र‌माणे मलाही वाटले माऊली आताच्या लेकरांनाही तुझे सबाह्य नाही तर तुझी असण्याची प्रचिती अंतरात्म्याला लाभू दे!!"आमच्यासाठीही...


'ताटी उघडा ज्ञानेश्वरा'

-भक्ती

Friday, August 29, 2025

नभीची चंद्रकोर उतरली



 आठवणींची गर्दी दाटली

मेंदीच्या रेषेत तुझी चाहूल 


नभीची चंद्रकोर उतरली

कमळ सौंदर्याची पडली भूल


नाजूक स्वप्नांची नक्षी रंगली

सख्याची साथ निरंतर अनमोल


नयनी तुझ्या चंद्रकोर न्हाली

काळोखातही स्वप्नांना आधारवेल


शीतल राती कळी उमलली

स्मित तुझे ,उमलले कमलदल


प्रेमाची सावली मिठीत गंधाळली 

बहरले ते नाजूक रानफूल


-भक्ती




Saturday, August 23, 2025

बेसरबिंदी - 'ग्रेस' एक स्मरण

 बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण






कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व  उमलून सांगतात. आणि ग्रेस यांच्याच सुरेल गीताचे स्वर कानी पडतात...


प्रकाश गळतो हळूहळू 

चंद्र जसा उगवे 

पाण्यावरती उमटत जाती 

अंधूक अंधूक दिवे ...


दूर सनातन वृक्षांनाही

हिरवट गंध मूका

दुःख सुरांचा क्षितिजापाशी

मेघ दिसे परका...


बस... एका अनवट प्रकाशातून ग्रेसांचे स्मरण सुरु होते. बेसरबिंदीतील सादर झालेल्या कवितांचे,ललितबंधांचे,गीतांचे विषेशत्व  जाणवले की, ग्रेस यांच्या नेहमीच्याच  प्रसिद्‌ध कवितांपेक्षा वेगळ्या कवितांचा,लेखांचा यात मागोवा आहे.


कार्यक्रमाच्या संहितेमध्ये ग्रेस यांच्या कवितेच्या सृजनाचे अनेक पैलू स्पर्शित केले गेले. ग्रेसांना प्रिय असलेली भगवी संध्या, आईची गुढ माया, पावसाची  निरव रिमझिम, दुःखाची कातरवेळ आणि अजून बरेच काही..


ग्रेसांनी लिहिलेले अनेक ललितलेखन कार्यक्र‌मात सुंदररीत्या गुंफले आहेत. सुरुवातीलाच 'तोडाचा डोह'' काळजाला पिळवटून टाकतो. सादरकर्त्याच्या आव‌ा‌जाची धीर-गंभीरता त्या डोहाच्या वातावरणाचा आभास तंतोतंत उभा करतो.


तांदूळ मोजणाऱ्या मुलींची कथा व्यथा खोल शिरते. एलिझाबेथच्या शेवंतीच्या रोपांनी कशी मानवातील अहंकाराच्या मूळापाशी कधी नेले कळलेच नाही... प्रश्न शेवतींचा नाही एलिझाचा आहे.


नको मोजू माझ्या 

मुक्तीच्या अंतरे 

ब्रम्हांडाची दारे 

बंद झाली ..


माझ्या आसवांना 

फूटे हिमगंध 

मागे-पुढे बंध 

पापण्यांचे..


ग्रेसांची  दग्ध मुलींचे संध्यागीत यात संध्याकाळचे हिरवट दुःखाचे तरंग उमटत राहतात.


पक्षी पक्षी व्याकूळ व्याकूळ रुतवून काटा उर अभंग दग्धमुलींचे विरक्त हसणे संध्येपाशी एक तरंग

..

...

....

मी स्मरणाने गंध अचंबित संध्यामायेचा कल्लोळ|


ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर  ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे.


मी महाकवी दुःखाचा 

प्राचीन नदीपरी खोल 

दगडाचे माझ्या हाती 

वेगाने होते फूल - 

ग्रेस


अशा या प्रिय ग्रेस यांच्या स्मरणाची संध्या मी अनुभवली ABAA(आबा) 'अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट असोशिअसन यांच्या अभूतपूर्व सुंदर बेसरबिंदी यां कार्यक्र‌मामधून!


विविध क्षेत्रात स्थिरावलेल्या पण २०-२२ वर्ष कलेच्या अनेक रंगी तंतूने जोडलेल्या या गुणी प्रतिभावंत कलाकारांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. बेसरबिंदीचा  पहिला कार्यक्रम एफ.टी.आय(FTII) ओल्ड मेन थिअटर ,पुणे येथे सादर झाला. यातील सादरीकरण केवळ गीत, लेख यानेच  सजलेले नाही तर  प्रकाश योजना, नेप्यथ्य याच्या परीपूर्ण साथीने चमकले आहे.


प्राचीताईच्या आंतरजालावरच्या मैत्रीने मी या कार्यक्रमाच्या संगतीत आले. काल प्राचीताई आणि सर्व कलाकारांच्या या 'बेसरबिंदीने' ग्रेस यांच्या स्मरणाचे चांदणं मनभरून स्पर्शून आले.


हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका.नक्की पहा!



-भक्ती