Sunday, December 22, 2024

पुणे बुक फेस्टिवल २०२४

 पुणे बुक फेस्टिवल २०२४






















१४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस  यांचे आउटलेट  छायाचित्रं काढण्यासाठी होते.

आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं.

पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने   ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला👍🏻एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो😊


#वाचालतरआनंदीहोणार 


सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर.
पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला.
नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले😂 
लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते.
कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते.
तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो.
तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर  यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन.

मी घेतलेली अनवट पुस्तके-
१.येई परतुनी ज्ञानेश्वरा' 
आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर
डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो.
२.निसर्गायण
दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी .
पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक.
३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे.

मनाची नित्य नाव
पुस्तकाच्या पानांनी 
वल्हवली जातात 
मग आयुष्याचा भवसिंधु 
सहज तरुन जातो
ज्ञान सागराची ओढ 
अजुनच सहज पूर्ण होते...
-भक्ती

No comments: