Sunday, December 29, 2024

आवळ्याचा छुंदा

 


लोणचं वगैरे करणं हा माझ्या आईचा खास प्रांत आहे.त्यात आवळ्याचे लोणचे तुम्ही करत असाल ,पण आईनं खुप सुंदर आवळ्याचा छुंदा केला.

अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ लागतो.यानुसार आवळ्याच्या छुंद्याला आवळे:गुळ १:१ असे प्रमाण असावे.

आवळे इडली पात्रात वाफवून घ्यायचे.वाफवल्यानंतर बिया काढून टाकायच्या.आता फोडी गार करून मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या, तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकता किंवा किसून घेऊ शकता.गुळ आणि  बारीक आवळा एकत्र करायचा.कढईत मंद गॅसवर परतायला सुरू करायचे.त्यात मसाले - बारीक केलेली चिमूटभर मिरी, धनेपूड ३ चमचे,लाल तिखट आवडीनुसार,काळं मीठ,वेलची पूड टाकायचा.हे मिश्रण छान परतल्यावर ,जरासे घट्ट व्हायला लागल्यावर गॅस बंद करा.नंतर एक लिंबांचा रस त्यात पिळून घ्यायचा.छुंदा गार करून काचेच्या बरणीत भरायचा.

बरोबरीने कोवळ्या तुरीचे उकडून परतलेले दाणे,मेथीचे पराठे होते.मग तुम्ही कधी करता हा थंडीचा बेत 😊

Friday, December 27, 2024

एका तेलियाने -पुस्तक परिचय

 एका तेलियाने

लेखक - गिरीश कुबेर



या पुस्तकाच्या २००९ पासून २०२३ पर्यंत, सतरा आवृत्ती निघाल्या आहेत. गाथा इराणी' या पुस्तकानंतर आखाती देशांबद्‌दल एक. झालेच आहे. त्यात ज्याप्रमाणे कुतूहल ऐतिहासिक काळात वसाहतवादाचे रूप अनेक निसर्गनिर्मित साधना साठी होते तसेच तेलासाठीही बलाढ्य राष्ट्रांची आखाती देशांवर हुकूमत असणारच, ती कशी होती हा प्रश्न होताच. यासर्व कुतुहलाचे उत्तर 'एका तेलियाने..एका श्रीमंत शापित वाळवंट' या पुस्तकात मिळाले. 

वीस प्रकरणांचे छोटेखानी पुस्तक तेलाच्या व्यापाराची,तेल उत्पादक देश,तेल विक्री करणाऱ्या कंपन्या यांतील अनेक गुंतागुंतीची ओळख उत्तम पद्‌धतीने करुन देते.

सुरुवातीलाच 'एका तेलियाने पहिला तेलिया मोसादेघ- इराणचा कडवा राष्ट्रवादी यांनी ब्रिटीश कंपनीचे राष्ट्रीयीकरण आणि या विरोधातला CIA, MI-5 यांनी तयार केलेला बागुलबुवा हे प्रकरण कसे घडले, नंतर कसे उजेडात आले हे रंजकपणे सांगितले आहे.

यापुढच्या प्रकरणात सौदी अरेबियाची जन्मकथा, तिथे तेलाचा शोध, इजिप्त- इस्त्रायल युद्ध, सुवेझ कालवा प्रकरणाषयी अनेक मोठमोठ्या घटनांचा वेध घेतला आहे.

 सौदीचे पहिले संस्थापक सौद आणि अमेरिका कंपनी अराम्को

 १९३७ साली सोन्याची काळ्या केलेली शोधमोहिम, तेल व्यापाराचा  करार करते. यात सौदी देश सर्वात महत्त्वाचा होता कारण जगातील सर्वात अधिक तेल उत्पादन् तिथेच होणार होते.


आता प्रवेश होतो शेख अहमद झाकी यामानीचा! या आंग्लविद्याविभूषित, मुत्सद्‌दी सौदी तेल मंत्री यांची उत्कंठावर्धक कहाणीचा म्हणजेच एका तेलियाची कहाणी.

अर्थ विभागात काम करणाऱ्या यामानींची हुशारी पाहून राजे फैजल यांचा कायदेशीर सल्लागार नेमणूक करतात.जेव्हा फैजल यांच्याकडे नाट्यमय स्थितीत राजा होण्याची वेळ येते तेव्हा अर्थात तेलमंत्री  होतात यामिनी.सौदीत तेलाच्या अर्थकारणात नेत्रदीपक कार्य केले.

 १९६० साली तेलकंपन्याच्या सततच्या नफेखोरीत वाटा मिळवण्यासाठी OPEC ची स्थापना झालीच होती. यात तेव्हा तेलउत्पादक देश होते सौदी अरेबिया, इराक, इराण, कुवेत,व्हेनेझुला.


ओपेकला पूर्वी तेलकंपन्या गिनतीतही घेत नसे तेव्हा यामिनी यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले.ज्यामुळे हळूहळू तेल कंपन्यांना ओपेकची दखल घ्यायला भाग पाडले. तरीही ओपेकमध्ये भाववाढीवरून सत्‌त तेल उत्पादक देशांमध्ये मतभेद असत. त्यात लिबिया, इराण यांना सतत चढा भाव पाहिजे असत. तर सौदीचा भाव त्याहून कमी असत. तसेच त्यांच्या तेल शुद्धीकरणाचा दरही कमी होता , त्यामुळे सौदीच्या तेलाला सर्व कंपन्यांची पसंती असे.तेव्हा याबाबत सर्वांना भाव योग्य मिळावा म्हणून 'तेल कोटा ठरवून द्यायचा या बाबत यामिनी ओपेकद्वारे आग्रही होते . ठरवलेल्या भावालाच ज्या त्या देशाने तेल विकायचे. जास्त हाव नसावी. सगळ्यांनी मिळून भाव ,कोटा ठरवला, तरच तेल विकत घेणाऱ्या देशाची दादागिरी मोडता येईल हे त्यांचे धोरण होते.

पण हे अनेक हुकुमशाही' सत्ता असलेल्या आखाती देशांना पचनी पडतच नसे, त्यांचा एकच बाणा अधिकाधिक सर्व नफा मिळवण्याकडेच, टोळी मानसिकतेतून हे देश अजूनही बाहेर आले नव्हते. तसेच 'अरब 'बिगर अरब' हाही वाद सुप्तपणे होताच त्यातून 'ओआपेक' अरब देशांनी उभी केली.

अनेक तेल कंपन्या एक्झॉन, मोबील, ऑक्सी इ. यांचा या तेलउत्पादक देशांशी भावावरुन सततचा संघर्ष पुस्तकात मांडला आहे.

त्यातच यासिर अराफत, सिरीया, रशिया ,इस्रायल, जॉर्डन मोसाद , इत्यादींच्या युद्धाच्याअनेक पार्श्वभूमी यात संक्षिप्त वाचायला मिळतात.

कार्लोस द जॅकल या कुख्यात डाव्या गटाच्या पुरस्कारकर्त्याने यामिनी व इतर तेल व्यापारासंबधित  मिटींगमध्ये जमलेल्या उच्च पदस्थ लोकांना ओलीस ठेवून केलेल्या घटनेचा थरारक प्रकरण पुस्तकात आहे.

तसेच जेव्हा तेलाचे भाव वाढले तेव्हा अमेरिकेत, सौदीत बोकाळलेला भ्रष्ट्राचार आणि त्यात अनेकांनी या वाहत्या गंगेत हात धुतले व कोट्याधीश झाले. याच्याही रोचक गोष्टी,भानगडी यात आहेत. 

तेलाचा भाव वाढला की अमेरिका वाढत्या "पैशांमुळे इराण, सौदी इ.यांना कसे शस्त्रास्त्रे विकत घ्यायला भाग पाडत असे .भाव कमी झाला तर फायदाच अमेरिकेचा व्हायचा.'छापा पडला तर अमेरिका जिंकणार, काटा पडला असला तरी अमेरिका जिंकणार पश्चिम आशिया हरणार' दोन्ही बाजूंनी फायदा अमेरिकेचाच!

या तेलवाढीला 'यामानीच 'जबाबदार आहेत, ही टुम अमेरिकन जनतेत पसरली. त्या दबावाखाली अमेरिकेला या तेल कारभाराची चौकशीसाठी एक समिती तयार करावी लागली. यात अगद‌ी सुरुवातीपासूनचे लागेबंध अभ्यासले गेले. ते आताच्या काळापर्यंत येत होतेच. पण सौदी सारख्या अविकसित, राज्यकर्ते अशिक्षित अशांच्या माथी हे पाप मारण्याचा अधिकार अमेरिकेला कोणी दिला? अमेरिकेने त्यांच्या  तेलकंपन्यांना शिक्षा द्यावी.पण  आमच्याकडे ढवळाढवळ करू नये अशी भूमिका यामीनींची होती.

शेवटी बदललेल्या  अमेरिकन सरकारने एवढ्या जुन्या घटनांत कशाला उतारा शोधून काय फायदा म्हणत थातूरमातूर अहवाल देत समिती गुंडाळली, खर म्हणजे सौदीशी वैर त्यांना झेपणार नव्हतं.

फैसल राजांनंतर आलेल्या फाहद यांच्याशी काही  काळ यामिनींचे जुळले. यामिनींची समतोल धोरणे कधीच हावरट पाहायला आवडली नाही. हळूहळू तेल मंत्री म्हणून  यामिनींनी कारभार समाप्तीकडे नेण्याची तयारी सुरूच केली होती. पुढे १९८६ ला त्यांना तेल मंत्री पदावरून दूर करण्यात आले ‌

इराक - सौदी लढाईच निमित्ताने 'लष्कराचा उंट' सौदीत रुजलाच. पण 'अल कायदा ' या दहशतवादी संघटनेच्या जन्माचे सुत्रही अमेरिकेनी हलवली होती .धार्मिक विरोधही अमेरिकेविरुद्ध वाढले.शेवटच्या प्रकरणात ओपेक+ चा जन्म,रशियाचा यात प्रवेश,एबीसचं रक्तरंजित राजकारण यांचा थोडक्यात आढावा आहे.एक वेगळा सौदी घडू लागला होता.

 २३ फेब्रुवारी २०२१ रोजी लंडनला यामिनी जग सोडून गेले. "खनिज तेलाच्या ऊर्जेवर जळणारं जग पुन्हा ज्वालाग्रही होत होते, ती आग,धग कमी करणारा तेलिया मात्र आता उरला नव्हता.



-भक्ती

Sunday, December 22, 2024

पुणे बुक फेस्टिवल २०२४

 पुणे बुक फेस्टिवल २०२४






















१४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस  यांचे आउटलेट  छायाचित्रं काढण्यासाठी होते.

आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं.

पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने   ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला👍🏻एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो😊


#वाचालतरआनंदीहोणार 


सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर.
पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला.
नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले😂 
लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते.
कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते.
तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो.
तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर  यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन.

मी घेतलेली अनवट पुस्तके-
१.येई परतुनी ज्ञानेश्वरा' 
आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर
डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो.
२.निसर्गायण
दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी .
पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक.
३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे.

मनाची नित्य नाव
पुस्तकाच्या पानांनी 
वल्हवली जातात 
मग आयुष्याचा भवसिंधु 
सहज तरुन जातो
ज्ञान सागराची ओढ 
अजुनच सहज पूर्ण होते...
-भक्ती

Tuesday, December 3, 2024

गाथा इराणी -पुस्तक परिचय

 गाथा इराणी

लेखिका - मीना प्रभू


इराणचा नकाशा 


'इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता. भारताचा एका हरवलेला भाऊच म्हणजे इराण!

संस्कृत भाषा, अवेस्ता-वेदांचे साम्य, अग्निपूजा- यज्ञ साम्य, झोराष्ट्रीय देवता - वैदिक देवता साम्य, इराणी-फार्सी भाषा- मराठी असे अनेक दुवे मला वरवरच माहिती होते.

तेव्हा इराण विषयक अवघड अभ्यासू पुस्तक वाचण्यापूर्वी हे हलके-फुलके पर्यटनपुरक पुस्तक घेतले. त्यातही  पुस्तकाच्या लेखिका मीना प्रभु 

यांनी या पूर्वीही अनेक इस्लामिक देश देशांना भेटी दिल्या आहेत परंतू तिथे कोठेही हिजाब /चादोरची सक्ती पर्यटकांवर नव्हती. परंतू इराणमध्ये त्यांना सतत हिजाब / चादोर घालावी लागली. याचा सतत विरोध त्यांनी पुस्तकात तर केलाच आहे, पण इराणी स्त्रियांवरच्या या अनेक अन्यायांची चीड वेळोवळी मांडली आहे.लेखिका समग्र इराण तीन महिन्यांत फिरल्या आहेत. यासाठी त्यांनी 'नौरूज (२१ मार्च आसपासचा काळ)'सणाचा काळही जाणीवपूर्वक निवडला हे विशेष आहे.

इराणची राजधानी तेहरान पासून हा रोमांचकारी प्रवास सुक होतो. या प्रवासात असंख्य वाटाडे, सहृदयी इराणी नागरिक यांची लेखिकाला मदत मिळते. प्रत्येक इराणींयांकडून राहण्याची, खाण्यापिण्याची ,सुकामेवा फळांची बडदास्त ,पाहुणचार ,चांगली वागणूक या विषयी इराणीय एकामेद्वितीय आहेत हे जागोजागी दिसते.

तेहरान शहर



पहिले काही इराणीय स्थळे शिराझ, पर्सेपोलिस याझ्द, चकचक हे पर्शियन साम्राज्याची शान होते. पर्सेपोलिस याविषयीची भव्यता अनोखी आहे. सायरस, दारियुस यांनी भारतापर्यंत राज्य पसरवले होते. त्यांनी इराणचे नाव पार्सी - पर्शियन लोकांचे नगर ठेवले. अगदी रोमही जिंकला. पण इ.स ३३० मध्य अलेक्झांडरने इराण जिंकले आणि पर्सेपोलीसची राख रांगोळी केली. ७ व्या शतकात अरबी इस्लामने इराण जिंकला.

झोराष्ट्रीयन (पारशी) लोकांची काशी म्हणजेच चॅकचॅक हे धर्मपीठाची माहितीही रोचक मांडली आहे. झरुताष्ट्र, फर्वहार देवता, अवेस्ता धर्मग्रंथ, अनोखा अंतिम संस्कार विधी यांची रोचक माहिती स्थळ भेटीतून सांगितली आहे. ज्यात नगराबाहेर बांधलेल्या मोठ्या गोलाकार खोलीत मृतदेह ठेवला जात. गिधाडे-पक्षी त्यान्चे मांस खात असे. अशाप्रकारे तेव्हा अग्नी वा दफन हा प्रकार होत नसे, निसर्गाचा-हास नको म्हणून  ही पद्धत होती.


चॅकचॅक
पर्सेपोलिस 



जरी इराण इस्लाम राष्ट्र आहे तरीही त्यात एक पारंपरिक पर्शियाही वसते.जे लोक आजही फार्सी बोलतात,फार्सी कवींनी त्यांच्या काव्याला जपतात.पारसी नौरुज मोठ्या उत्साहाने तेरा दिवस साजरा करतात.नौरूजची खुप अनोखी माहिती यानिमित्ताने समजली..


नौरोझच्या आगमनापूर्वी, कुटुंबातील सदस्य हॅफ्ट-सिन टेबलाभोवती जमतात आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मार्च विषुववृत्ताच्या अचूक क्षणाची प्रतीक्षा करतात. झेंड-अवेस्तामध्ये नमूद केल्याप्रमाणे क्रमांक ७ आणि अक्षर S हे सात अमेषसेपंतांशी संबंधित आहेत. ते अग्नि, पृथ्वी, वायू, पाणी या चार घटकांशी आणि मानव, प्राणी आणि वनस्पती या तीन जीवन प्रकारांशी संबंधित आहेत. आधुनिक काळात, स्पष्टीकरण सोप्या करण्यात आले की हफ्ट-सिन ( फारसी : هفتسین , sin (س) अक्षराने सुरू होणाऱ्या सात गोष्टी आहेत:

सब्जे ( पर्शियन : سبزه ) - गहू , बार्ली , मूग , किंवा मसूर स्प्राउट्स एका ताटात उगवले जातात.

समनु ( पर्शियन : سمنو ) - गव्हाच्या जंतूपासून बनवलेली गोड खीर

पर्शियन ऑलिव्ह ( फारसी : سنجد , रोमनीकृत :  senjed )

व्हिनेगर ( पर्शियन : سرکه , रोमनीकृत :  सेर्क )

सफरचंद ( पर्शियन : سیب , रोमनीकृत :  sib )

लसूण ( पर्शियन : سر ​​, रोमनीकृत :  सर )

सुमाक ( फारसी : سماق , रोमनीकृत :  somāq )

Haft-sin टेबलमध्ये आरसा, मेणबत्त्या, पेंट केलेली अंडी , पाण्याची वाटी, सोनेरी मासे , नाणी, हायसिंथ आणि पारंपारिक मिठाई यांचा समावेश असू शकतो. कुराण , बायबल , अवेस्ता , फेरदौसीचा शाहनाम , किंवा हाफेजचा दिवाण यासारखे "शहाणपणाचे पुस्तक" देखील समाविष्ट केले जाऊ शकते. Haft-sin चे मूळ स्पष्ट नाही. गेल्या 100 वर्षांपासून ही प्रथा लोकप्रिय झाल्याचे मानले जाते.

इराण हे वास्तुशास्त्र विषयावर जगात सर्वोच्च होते.इथे पाण्याचे दुर्भिक्ष तरीही जिथे पाणी असेल तिथे जमिनीखाली बांधलेले कॅनॉल,धबधबे,बागा ,बर्फाचे फ्रीज, नैसर्गिक वातानुकूलित यंत्रणा यांची माहिती, वर्णन थक्क करते.

पुढच्या काही शहरांत लेखिका इस्फहान, राश्त, झाशाद इ. शहरात येथे मोठमोठ्या मशीदींना भेट देते. यातील मशिदीमध्ये जांभळट, मोरचूदी रंगांचे मोझाईक टाईल्स /फरशी वापरून केलेले भव्य बांधकाम, काचांची भित्तीनक्षी यांचे वर्णन शानदार आहे.

इराणमधील काही भव्य सुंदर मशीदी


इस्फान


इराणमधील सर्वात मोठा नैसर्गिक वरद‌हस्त  म्हणजे तेलाची खाण।

यासाठी शूश, अहवाज या ठिकाणची बीपी- ब्रिटिश पेट्रोलियम या ब्रिटीश कंपनीची माहिती, त्यांचा तत्कालीन कार्यकालही दिला आहे. कशाप्रकारे २६ मे १९०८ ला तेलाच्या शोधाने या देशाचे नशिब बदलले व ते आता कसे कड़वे धोरणाने काळोखले जात आहे, याचा परत पुनरुच्चार आला.ताब्रिझचे गरम  पाण्याचे झरे,केरमानचे धरण, शुशटार सिल्क रुट, इमादानची सर्वांत लांब भूयारी नदी, तेहरानचे सर्वात मोठे हिरे-जवाहरांचे संग्रहालय, कारवान वाळवंटातही बांधलेली उद्‌याने अशी अनेक उत्तम उत्तम जागतिक स्थळे इराणमधली पाहिलीच पाहिजेत अशी इच्छा जागी होते.

ब्रिटिश पेट्रोलियम कंपनी



हे सर्व लिहितांनाच इथल्या सुसंस्कृत पुढारलेले शहा यांच्याकाळातील इराण ते कडवे इस्लामिक खोमेनी खोमनेई यांचे इराण याविषयी त्या सतत  नागरिकांशी चर्चा करत राहतात, जे खूपच धाडसाचे वाटते.

चादोरधारी महिला 

एकंदरीत मीना प्रभू यांच्या एकाच पर्यटनविषयक पुस्तक  वाचनाने मी त्यांची चाहती झाली आहे.

-भक्ती