Wednesday, November 27, 2024

गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा



 नाथ संप्रदायाचे महत्त्व,हठयोग,उपासना भारतभर अनेक ठिकाणी नित्यनेमाने होत असते.त्यातही महाराष्ट्रात गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) या दरम्यान ही डोंगररांग गर्भगिरी नावाने ओळखली जाते.अधिकतर नाथांची समाधी स्थळं इथे आहेत हे विशेष आहे.नगरमध्ये कानिफनाथ यांची समाधी मढीमध्ये आहे.त्याचबरोबर प्रथम  नाथ मच्छिंद्रनाथ -गोरखनाथ ही गुरू शिष्याची जोडगोळीच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आहे.

डोंगरगण जवळील मांजरसुंभा डोंगरापुढे गोरक्षनाथ गड आहे.

याबाबत कथा अशी -

नवनाथाच्या कथेनुसार भ्रमंती करीत असताना मच्छिंद्रनाथ फिरत फिरत स्त्री राज्यात गेले. तेथेच त्यांनी निवास केला. तेथील राणीने त्यांना आपल्या महलात ठेवून घेतले. मात्र, आपल्या गुरूंना मूळ रूपात आणण्यासाठी गोरक्षनाथ तेथे गेले. त्यांनी गुरूंना आपल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले. तेथून निघताना राणीने त्यांना सोन्याची वीट दिली.


भ्रमंती करीत असताना गुरूंच्या झोळीत गोरक्षनाथांना वीट दिसली. त्यांनी ती वीट फेकून दिली. तो परिसर म्हणजे नगर जिल्ह्यातील इमामपूर घाटाचा भाग होय. हे करीत असताना गोरक्षनाथांनी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला. मात्र, नंतर यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून तो डोंगर पुन्हा जसा होता तसा केला. हा डोंगर म्हणजेच गर्भगिरी डोंगर आहे.


नाथपंथाचे अभ्यासक टी.एन. परदेशी म्हणतात,  ही जातक कथा आहे. परंतु याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर सर्व नाथ हे सिद्ध पुरूष होते. त्यांना रसायनशास्त्राचा अभ्यास होता. त्यांची संपूर्ण ठाणी पाहिली तर ती उष्णोदकाशेजारी आहेत. तेथे गरम पाण्याचे झरे आढळतात. भारतातील पहिला रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन याच परिसरात होऊन गेला. त्याची प्रयोगशाळा शेवगाव तालुक्यात आहे. आजही मच्छिंद्रनाथांच्या गडावर स्थानिक लोक वनौषधी घेऊन बसलेले असतात. त्या कोणत्याही रोगावर उत्तम इलाज करतात. मात्र, त्याचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास झाला पाहिजे. गर्भगिरी डोंगर सोन्याचा झाला, याचा दुसरा अर्थ तेथील विपुल प्रमाणात सापडणाऱ्या वनौषधीमुळे तसा घेतला जातो.(संदर्भ सकाळ वृत्तपत्र अशोक निंबाळकर १ सप्टेंबर २०२०)

तर अशा या आध्यात्मिक क्षेत्रास नगरकर वर्षातून अनेकदा भेटी देतात.उंच डोंगरावर असलेले नाथ मंदिर अतिशय शांत , स्वच्छ, उत्तम प्रकारे बांधलेले आहे.वाहन थेट पर्यंत मंदिरापर्यंत जाते.

पण यंदा नगर ट्रेकेथॉन-३ ने गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा हा उपक्रम घेतला.यासाठी ट्रेक कॅम्प ने अनेक महिने मेहनत घेतली.यासाठी डोंगर खाच खळग्यांतून ,दाट दाटी तून ,अनवट वाटेवर अनेक रिबीन,ध्वज लावून प्रदक्षिणेसाठी वाट सज्ज केली.यासाठी ७५०+ लोकांनी रजिस्ट्रेशन केले.



उत्साहाने १७/११/२०२४ ला पहाटे ६ वाजता गोरक्षनाथ गडावरून पांढऱ्या रंगाचे एकसारखे टी शर्ट घातलेले ट्रेकर यांची शुभ्र लाटच उसळत होती.आधी डोंगर उतरून सपाट माळरानावर पोहचायचे होते.आता हळूहळू तांबडा फुटलं होतं.जसजसे पुढे जात होतो .तसतसा सूर्यही डोंगराहून घरंगळत येतोय असं मोहक दृश्य होते.रस्त्याने बोरीची झाडं लागली.झाडाला गदगदा हालवून बोरी गोळा करण्याचा लहानपणीचा इवलासा आनंद परत मिळाला.आंबट चिंबट बोरांच्या चवीचा आनंद घेत इतरत्र शमीचे झाडं अनेक त्यांच्या अनोख्या चपट्या वाळलेल्या लाल शेंगा पहिल्यांदाच पाहत होतं.कुठतरी अजूनही पाण्याच्या थोड्याशा ओघळाने शेवाळ होते.थोडीफार फुलं होती पण ती पाहताना प्रकर्षाने सह्याद्रीच्या डोंगरांची,भटकंती आठवण येत होती.सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याची तोड कशालाच नाही,हे मात्र खरं आहे.









आता पुन्हा थोडी चढाई परत उतरण लागली.चार किलोमीटर मध्यावर प्रदक्षिणा आली होती.आता शेतं लागली.तुरीच्या शेंगांनी लगडलेली तुरीची पिकं लागली.हिरव्यागार कांद्याची पाती दूरवर पसरली होती.

शेतांना मागे टाकत दाट जंगलासारख्या दाट झाडीतून जातांना अनेकांना मोरपिस सापडले.परत एकदा एनर्जी ड्रिंक,फळांची पुरवणी घेत प्रदक्षिणेच्या शेवटच्या टप्प्यात पोहचलो.यात पूर्वी गडावर चढण्यासाठी पायऱ्या बांधल्या होत्या .आता त्या अधिक वापरात नाही. मधोमध पायऱ्या आणि दोन्ही बाजूला दाट झाडी यातून चालताना सुरुवातीला स्वर्गारोहण करतोय असं वाटतं होतं.मात्र या पायऱ्या चढावर आणि संपतच नव्हत्या आधीच ६ किमीची पायी चालणं झालं होतं.त्यात ही सरळ चढाई दमछाक करणारी ठरली.


आयोजक ट्रेकर  उत्साह वाढवायला,मदतीचा हात पुढे करत उभे होतेच.अखेर विश्रांतीला थांबत चढत असं करत पुन्हा गडाच्या मुख्य पायऱ्यांपाशी पोहचलो.गडावर चढले.मंदिराच्या गाभाऱ्यात गोरखनाथांचे दर्शन घेऊन कृतार्थ वाटले.८ किलोमीटरची गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा ३  तासात जवळपास पूर्ण झाली.

हा उपक्रम पहिल्यांदा राबविण्यात गेला.आम्ही पहिले ट्रेकर आहोत ज्यांनी गोरक्षनाथ प्रदक्षिणा पूर्ण केली आहे.

फिनिशर मेडल मिरवत घरी कूच केलं, आयुष्यात अजून एक सुंदर रविवार सकाळ संपन्न झाली होती






-भक्ती

Monday, November 11, 2024

भोरगिरी ते भीमाशंकर



भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान आहे.अशा नदीच्या उगम स्थानी सतत पाण्याची खळखळ वातावरणात नादमयता ठेवत असते.सह्याद्रीच्या निसर्ग कुशीत भीमाशंकर ट्रेक हा खरं तर पावसाळ्यात करायला पाहिजे.यंदा पावसाळाही चांगला चार महिने होता पण मला तेव्हा जमलच नाही.तरीही जवळपासचा त्यातही सोपा "भोभी" जंगल ट्रेक काल करायचा ठरवला.नाव भोभी :) होय आंतरजालावर हे नाव सापडले.भोरगिरी-भीमाशंकर(भोभी).

खरोखर रस्ते इतके छान झाले आहेत, रहदारी कमी त्यामुळे २.३० तासात भोरगिरी या सुंदर गावात पोहोचलो.या पूर्ण प्रवासात माझी नजर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या कॉसमॉसच्या भगव्या-पिवळ्या फुलांनी वेधले,सर्वत्र हेच पसरले होते.आता बरीचशी फुले ओळखता येत असल्याने त्यातले या इनवेझिक फुलांचा फोटोच काढायला नको वाटतं.सुंदर असतात पण निसर्गाला फायदेशीर नसतात,फोफावलेले सौंदर्य!

जसे वाडा गावापासून भोरगिरीला येत होतो तेव्हा भीमा नदीचे पात्र अखेर पर्यंत साथ देत होती. तर जवळपास प्रत्येक शेतात भात कापणी,मळणी,उफणणीची लगबग दिसत होती.सोनेरी पिवळसर पिकं सोन्याचा घास आपल्या ताटात देणार होते.अनेक ठिकाणी पाखरं गाण्यांसाठी सैरावैरा घिरट्या घालत होती.माकडं, रानडुक्कर यांच्यापासून संरक्षणासाठी पिकांभोवती रंगबेरंगी साड्यांचे कुंपण घातले होते.

भोरगिरी गावात पोहचल्यावर वाटाड्या शोधला.ही वाट सोपी आणि मळलेली वाट पण पहिल्यांदा जात होतो तेव्हा वाटाड्या पाहिजेच.आम्हांला भीमाशंकर महादेवाचेही दर्शन घ्यायचं होतं तेव्हा भोरगिरी किल्ला पाहण्यात वेळ दवडला नाही.तरीही भोरगिरी किल्ला,तसेच गावतलं झंज राजाने जे नगर,पुणे, नाशिक येथील विविध नदीच्या उगमस्थानी सात शिवमंदिर बांधले त्यातीलच हे  काटेश्वर महादेवाश मंदिर आहे.दर्शन नक्की घ्यायला हवे.

तर भोरगिरी पासून सुरू केलेला प्रवासाच्या सुरूवातीलाच थोडी डोंगर चढाई  आहे.अरे बापरे,लगेच दम लागला.खुप दिवसांनी डोंगर चढत होते.पण अर्धा तास चालल्यानंतर  पठार आले.चारी बाजूंनी हिरवे डोंगर ,इतक्या उंचीवरही चरणाऱ्या गाई छान दृश्य होते.

रस्त्याने एक ओढा लागला .त्यात अजूनही पाणी वाहत होते.अतिशय थंडगार  स्वच्छ पाणी प्यायला मिळाले.

आता परत थाट झाडी असलेलं जंगल चढून परत वर आलो आतापर्यंत पाच किलोमीटर अंतर २ तासात पार झालं‌ होते.पुढेच नदीचा खळखळाट ऐकू येऊ लागला.तिथून एका बाजूला उतरून गुप्त भीमाशंकर दिसते.भीमाशंकर इथे जी नदी उगम पावते ती एक दीड किलोमीटर परत गुप्त होऊन या ठिकाणी पुन्हा धो धो प्रवाहित होते.इथे एक पिंडही आहे जिच्यावर सतत वरून धबधब्यासारखे पाणी कोसळत असते.खुप वेळाने आता इथं माणसं दिसली.वर चढून आता परत भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने चालू लागलो.आता मात्र दुतर्फा दगडांची रांग टाकून पक्की पायवाट केली होती.शेकरूचा नुसता आवाज येत होता पण दिसत काही नव्हता.कारवीसारखीच फुलं असणाऱ्या वनस्पती सगळीकडे होत्या.

दोन किलोमीटर दाट जंगलातून गारवा झेलत मंदिराजवळ आलो.

पण आजूबाजूला प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पाहून वाईट वाटत होतं.

दर्शन घ्यायचेच असल्याने रांगेत उभे राहिलो.दोन तासांनंतर भोलेनाथाचे दर्शन मिळाले.भीमाशंकर इथेही चिमाजी आप्पा यांनी वसईतून जिंकून आणलेली पंचधातूची?ती क्रॉस असलेली पाच मण वजनाची घंटा आहे (या पूर्वी अशा घंटा मी सिद्धेश्वर पारनेर आणि मेणवली वाई इथे पाहिल्या होत्या.)

नंतर डिंभे धरण पहायला गेलो.आंबेगावातील घोड नदीवर हे विस्तीर्ण धरण आहे.पलीकडचा नदीचा जलाशय/साठा दूरवर पसरलेला पाहतांना खुपच सुखद वाटत होता.येतांना एके 

ठिकाणी इंद्रायणी तांदूळ घेतला,जो मागच्या वर्षीचाच होता.नवीन तांदूळ अजून मळणी प्रक्रियेत आहे.

डिंभे धरण परिसर

भीमाशंकर मंदिर 


जंगलातील वाट
गुप्त भीमाशंकर 





या ट्रेक नंतर पावसाळ्यात पुन्हा भीमाशंकर जंगलात येण्याचे पक्के केले.


-भक्ती