Monday, November 11, 2024

भोरगिरी ते भीमाशंकर



भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान आहे.अशा नदीच्या उगम स्थानी सतत पाण्याची खळखळ वातावरणात नादमयता ठेवत असते.सह्याद्रीच्या निसर्ग कुशीत भीमाशंकर ट्रेक हा खरं तर पावसाळ्यात करायला पाहिजे.यंदा पावसाळाही चांगला चार महिने होता पण मला तेव्हा जमलच नाही.तरीही जवळपासचा त्यातही सोपा "भोभी" जंगल ट्रेक काल करायचा ठरवला.नाव भोभी :) होय आंतरजालावर हे नाव सापडले.भोरगिरी-भीमाशंकर(भोभी).

खरोखर रस्ते इतके छान झाले आहेत, रहदारी कमी त्यामुळे २.३० तासात भोरगिरी या सुंदर गावात पोहोचलो.या पूर्ण प्रवासात माझी नजर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या कॉसमॉसच्या भगव्या-पिवळ्या फुलांनी वेधले,सर्वत्र हेच पसरले होते.आता बरीचशी फुले ओळखता येत असल्याने त्यातले या इनवेझिक फुलांचा फोटोच काढायला नको वाटतं.सुंदर असतात पण निसर्गाला फायदेशीर नसतात,फोफावलेले सौंदर्य!

जसे वाडा गावापासून भोरगिरीला येत होतो तेव्हा भीमा नदीचे पात्र अखेर पर्यंत साथ देत होती. तर जवळपास प्रत्येक शेतात भात कापणी,मळणी,उफणणीची लगबग दिसत होती.सोनेरी पिवळसर पिकं सोन्याचा घास आपल्या ताटात देणार होते.अनेक ठिकाणी पाखरं गाण्यांसाठी सैरावैरा घिरट्या घालत होती.माकडं, रानडुक्कर यांच्यापासून संरक्षणासाठी पिकांभोवती रंगबेरंगी साड्यांचे कुंपण घातले होते.

भोरगिरी गावात पोहचल्यावर वाटाड्या शोधला.ही वाट सोपी आणि मळलेली वाट पण पहिल्यांदा जात होतो तेव्हा वाटाड्या पाहिजेच.आम्हांला भीमाशंकर महादेवाचेही दर्शन घ्यायचं होतं तेव्हा भोरगिरी किल्ला पाहण्यात वेळ दवडला नाही.तरीही भोरगिरी किल्ला,तसेच गावतलं झंज राजाने जे नगर,पुणे, नाशिक येथील विविध नदीच्या उगमस्थानी सात शिवमंदिर बांधले त्यातीलच हे  काटेश्वर महादेवाश मंदिर आहे.दर्शन नक्की घ्यायला हवे.

तर भोरगिरी पासून सुरू केलेला प्रवासाच्या सुरूवातीलाच थोडी डोंगर चढाई  आहे.अरे बापरे,लगेच दम लागला.खुप दिवसांनी डोंगर चढत होते.पण अर्धा तास चालल्यानंतर  पठार आले.चारी बाजूंनी हिरवे डोंगर ,इतक्या उंचीवरही चरणाऱ्या गाई छान दृश्य होते.

रस्त्याने एक ओढा लागला .त्यात अजूनही पाणी वाहत होते.अतिशय थंडगार  स्वच्छ पाणी प्यायला मिळाले.

आता परत थाट झाडी असलेलं जंगल चढून परत वर आलो आतापर्यंत पाच किलोमीटर अंतर २ तासात पार झालं‌ होते.पुढेच नदीचा खळखळाट ऐकू येऊ लागला.तिथून एका बाजूला उतरून गुप्त भीमाशंकर दिसते.भीमाशंकर इथे जी नदी उगम पावते ती एक दीड किलोमीटर परत गुप्त होऊन या ठिकाणी पुन्हा धो धो प्रवाहित होते.इथे एक पिंडही आहे जिच्यावर सतत वरून धबधब्यासारखे पाणी कोसळत असते.खुप वेळाने आता इथं माणसं दिसली.वर चढून आता परत भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने चालू लागलो.आता मात्र दुतर्फा दगडांची रांग टाकून पक्की पायवाट केली होती.शेकरूचा नुसता आवाज येत होता पण दिसत काही नव्हता.कारवीसारखीच फुलं असणाऱ्या वनस्पती सगळीकडे होत्या.

दोन किलोमीटर दाट जंगलातून गारवा झेलत मंदिराजवळ आलो.

पण आजूबाजूला प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पाहून वाईट वाटत होतं.

दर्शन घ्यायचेच असल्याने रांगेत उभे राहिलो.दोन तासांनंतर भोलेनाथाचे दर्शन मिळाले.भीमाशंकर इथेही चिमाजी आप्पा यांनी वसईतून जिंकून आणलेली पंचधातूची?ती क्रॉस असलेली पाच मण वजनाची घंटा आहे (या पूर्वी अशा घंटा मी सिद्धेश्वर पारनेर आणि मेणवली वाई इथे पाहिल्या होत्या.)

नंतर डिंभे धरण पहायला गेलो.आंबेगावातील घोड नदीवर हे विस्तीर्ण धरण आहे.पलीकडचा नदीचा जलाशय/साठा दूरवर पसरलेला पाहतांना खुपच सुखद वाटत होता.येतांना एके 

ठिकाणी इंद्रायणी तांदूळ घेतला,जो मागच्या वर्षीचाच होता.नवीन तांदूळ अजून मळणी प्रक्रियेत आहे.

डिंभे धरण परिसर

भीमाशंकर मंदिर 


जंगलातील वाट
गुप्त भीमाशंकर 





या ट्रेक नंतर पावसाळ्यात पुन्हा भीमाशंकर जंगलात येण्याचे पक्के केले.


-भक्ती

No comments: