#कृष्णाच्यागोष्टी४
*रासलीला
कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात. महाभारतात जेव्हा द्रौपदीला वेणी खेचून सभागृहात दु:शासन आणत होता.तिचा भरसभेत अपमान करत होता. तेव्हा लाचार झालेल्या आपल्या पतींना पाहून त्या पतीव्रतेने मदतीकरता हाक मारली ती कृष्णाला!
"गोपीजन प्रिया कृष्णा धाव रे धाव"
गोपीजन प्रिय हा कृष्ण जीवनावरील कलंक असता तर कठीण प्रसंगी त्याला मदतीला बोलवतांना द्रौपदीला कृष्णाची आठवण झाली नसती. लहान व किशोर वयातील कृष्णावर सर्वच लहान थोर वृद्ध अशा गोपींचे विलक्षण प्रेम होते. तो अतिशय सुंदर व गुटगुटीत मुलगा सर्वांना खूप खूप आवडत असे. महाभारतात वरील द्रौपदीद्वारे केलेला उल्लेख सोडता वज्र गोपीकृष्ण संबंध आढळत नाही. पुढे विष्णुपुराणात गोपी कृष्णाचा प्रेममूल्य प्रतिव्रता दृष्टीने आहे. तर भागवत पुराणात याला शृंगार साज चढतो. ब्रह्मवैवर्तात संपूर्ण विषयिकतेचे स्वरूप प्राप्त होते.
*व्रज गोपी- विष्णुपुराण
पंचम अंशाच्या तेराव्या अध्यायात ५८ श्लोकात असे लिहिले आहे ,
कृष्णं गोपांगना रात्रौ रमयन्ति रतिप्रिया:||
हा रमयन्ति आणि रतिप्रिय यातील 'रम्' धातूचा खरा अर्थ क्रीडा करणे असा आहे .खरे तर रास ही एक प्रकारची क्रीडा आहे,ज्यामध्ये स्त्री पुरुष एकमेकांचे हात धरून गाणी गातात ,गोलाकार नाचत असतात. प्राचीन काळात स्त्रियांच्या वेद अध्ययनावर बंदी तर कर्ममार्ग कष्ट साध्य होते आणि योग साधना देखील अवघडत होती. म्हणून ज्यातून चित्तरंजनही होईल आणि परमेश्वर चरणी मन ,बुद्धि गुंतुन पडेल असा भक्ती मार्ग रास क्रीडेच्याद्वारे कृष्णाने स्त्री वर्गाला दाखवला असे काही विद्वानांचे मत आहे. पाश्चात्य बोलडान्स मात्र आपण मोठ्या उत्सुकतेने पाहतो कारण पाश्चात्य समाजात याला कलंक मानत नाही किंवा नींद्य ही मानत नाही. खरे तर कृष्णाच्या काळात हे यमुना तीरावरच्या गोप गोपिकांचे असे नाच सामाजिक दृष्टीने निंद्य मानले जात नसत. पावसाळा संपल्यानंतर सुगीच्या दिवसात यमुनेच्या तीरी चांदण्यात असे नाच होत असे. याला सुगीचा आनंदोत्सव साजरा करण्याची पद्धत असे म्हटले जाते .
*व्रज गोपी- हरिवंश
यमुना तीरावरच्या चालणाऱ्या या नृत्यांना हरिवंशात रास ही संज्ञा नाही त्यांना इथे नाव आहे 'हल्लीस' आणि विष्णू पर्वाच्या त्या ७० व्या अध्यायाचे नाव आहे हल्लीसक्रीडा.हल्लीस म्हणजेच स्त्री-पुरुषांनी हातात हात घालून गोलाकार नाचत गाणी म्हणण्याचा प्रकार ,मंडल करून नृत्य करणे.
विष्णुपुराणातील गोपींचा कृष्णभक्ती योग हरीवंशकर्त्याला समजलाच नाही. हरिवंशात अनेक ठिकाणी विलासप्रियतेचे चित्रण आले आहे.
*व्रज गोपी भागवत
हरिवंशापेक्षा गोपींचा अधिक विलासी भाव येथे वर्णिला आहे .पण त्या साऱ्याला भागवतकारांनी एक आध्यात्मिक डूब दिली आहे.
*गोपीवस्त्रहरण
भागवतातील रास नृत्याचा विचार करण्याआधी दशांस्कंदाच्या बाराव्या अध्यायातील गोपी वस्त्रहरण प्रसंगाचे विवेचन करणे योग्य ठरेल. ही कथा महाभारत विष्णुपुराण किंवा हरिवंशात नाही. गोपींच्या कृष्णावरील अतिप्रेमामुळे त्यांना कृष्णाला पती रूपात प्राप्त व्हावे असे वाटले आणि त्यासाठी त्यांनी 'कात्यायनी' नावाचे व्रत एका महिन्यात केले. नदीत स्नान करायचे .तीरावर वस्त्र उतरून ठेवायचे आणि डुबकी घ्यायची. याप्रकारे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ज्या दिवशी व्रत पूर्ण होणार होते त्या दिवशी त्या यमुनेत स्नान करत होत्या. तेव्हा कृष्ण तेथे आला त्यांनी सर्व गोपींची वस्त्रे उचलली आणि जवळच्या कदंब वृक्षावर जाऊन तो चढून बसला. त्या त्याला वस्त्रे परत देण्याची याचना करू लागल्या.भागवतकरांच्या म्हणण्याप्रमाणे गोपींना त्यांचे कर्मफल देण्याकरता तेथे आलेल्या कृष्णाने त्यांची वस्त्रे परत करण्याचे नाकारले.म्हणाला, बाहेर या आणि तुमचे हात जोडून मला विनंती करा मग मी वस्त्रे परत देईन. ईश्वराला कोणीही भक्तीने सर्वस्व अर्पण केल्यापासून त्याची प्राप्ती होत नाही.गोपींनीही कृष्णाला प्राप्त करण्यासाठी त्याला सर्वस्व अर्पण केले. स्त्रीला धन कर्म धर्म भाग्य या सगळ्यांपेक्षा लज्जेचा त्याग करता येत नाही. कृष्णाने गोपींना तो लज्जात्याग करायला लावला .गोपींचे सर्व समर्पण कामवासनाजन्य नसून ते भक्तीजन्य होते, हा भागवतकरांचा दावा आहे.
परंतु वस्त्रहरणाच्या प्रसंगात कृष्णावर परस्त्री गमनाचा कलंक येतो आणि तो कुठलाही आध्यात्मिक रूपकाने पुसता येत नाही याचा भागवतकरांना विसर पडलेला दिसतो. पण कृष्णाला जितेंद्रिय म्हणून दोष देता येत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व प्रकरण बघता कृष्णचरित्रावर हा डाग मानला जाऊ नये असे दिसते. कारण वृंदावन सोडून मथुरेत आल्यानंतर कृष्ण कधीही परत गोकुळात आला नाही. गोपींच्या प्रेमात तो तसा अडकलेला असता.तर हे घडले नसते. कृष्णाचे दैविकरण झाल्यानंतर कृष्ण जीवनात हे प्रसंग प्रक्षिप्त झाले असावेत. कारण देवाच्या बाबतीत काही होत नाही ,पाप पुण्याच्या संकल्पना आपल्या सामान्यांसाठी!
*व्रजगोपी ब्रह्मवैवर्त पुराण -"राधा"
ब्रह्मवैवर्त पुराण आणि कवी जयदेवाचे प्रख्यात दीर्घ काव्य 'गीतगोविंद' याशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्राचीन ग्रंथात राधेचा उल्लेख सापडत नाही. रासपंचाध्यायातच काय संपूर्ण भागवतात ही राधा नाही, विष्णुपुराणात ,हरीवंशात किंवा महाभारतात ही कुठे राधा नाही. पण नव्या ब्रह्मवैवर्त पुराणात कृष्णाची एक नवी प्रतिमा उभी केली गेली आहे. या पुराणात कृष्ण हा विष्णूचा अवतार नाही. तर कृष्ण हेच मुलतत्व आहे. विष्णू वैकुंठात राहत असला पण कृष्ण गोलोक त्यापेक्षा कितीतरी उंचावर आहे आणि त्याच्या रास मंडळामध्ये कृष्ण राहतो असे सांगितले आहे.या गोलकाची अधिष्ठाती देवता कृष्ण विलासधरिणी आहे .रास मंडळाला धारण करणारी ती राधा आहे. वृंदावनातील बाळकृष्ण आणि राधा एक विवाहित तरुणी आहे. परंतु पौराणिक कथेनुसार राधा कोणा एका श्रीदामाच्या शापामुळे पृथ्वीवर मानवी रूपात राहिली.गोपी पत्नी आणि तरीही कृष्णप्रिया म्हणून कलंकिनी ठरली.तसा तिला शापच होता राधे मागून कृष्ण पृथ्वीवर जन्मला म्हणून वृंदावनात तो बाल रुपात होता तरीही राधेचा प्रियकर होता कारण तो देव होता. ब्रह्मवैवर्त पुराणातील राधाकृष्ण संबंधावर नवा वैष्णव धर्म आधारलेला आहे. विष्णुपुराण, भागवत पुराण कुठल्याही इतर पुराणात या वैष्णव धर्माचे नाव सुद्धा सापडत नाही. वैष्णवधर्माचे राधा हे केंद्र आहे आणि त्याच्या आधारे जय देवाने आपल्या गीत गोविंद नामक दीर्घ काव्याची रचना केली आहे. आणि त्याचाच आधार घेत अनेक ठिकाणी कृष्ण संगीताची इमारत उभी झाली आहे.
* प्राथमिक वैष्णव धर्माचा आधार वेदांतील ईश्वरवाद आहे. वेदांता द्वैतवाद आणि अद्वैतवाद यांची चर्चा आहे. प्राचीन काळी अद्वैतवादात अशी भिन्नता नव्हती. ईश्वर जगातील संपूर्ण चेतन आणि अचेतन सृष्टीत भरला आहे पण तो सर्वात भरूनही उरला आहे ही वैष्णवी धर्माची धारणा आहे. तांत्रिक धर्मातील वैशिष्ट्ये वैष्णव धर्मात संलग्न करून वैष्णव धर्माचे नव्याने रचना करण्याचे कार्य ब्रह्मवैवर्तकाराने केले आहे. यातील राधा ही सांख्यांची मूळ प्रकृती आहे आणि कृष्ण म्हणजे वेदांत त्यांचा परमात्मा! ब्रह्मवैवर्तातील श्रीकृष्ण जन्मखंडात कृष्ण पुन्हा पुन्हा राधेला तू मूल प्रकृती आहेस असे सांगतो. परंतु या अभिनव वैष्णव सांप्रदायातील मूल प्रकृती राधा सांख्यातील जशीच्या तशी प्रकृती नाही. सांख्यांची प्रकृती तांत्रिक शक्ती असते.प्रकृती वाद व शक्तिवाद यामध्ये अंतर आहे. प्रकृती पुरुषापासून संपूर्ण तया भिन्न असते. परंतु परमात्मा शक्तीचा आधार आहे .त्यामुळे आत्मा आणि शक्ती भिन्न असू शकत नाही. हा शक्तीवाद फक्त तंत्रापुरता मर्यादित राहिला नाही वैष्णवांनी सांख्यांच्या प्रकृतीला वैष्णव शक्तीचे रूप दिले आहे.ते लिहितात कृष्ण राधेला म्हणतो "राधे तुझ्याशिवाय मी फक्त कृष्ण आहे पण तुझ्याबरोबर राहिल्याने मी' श्री 'कृष्ण झालेला आहे." विष्णुपुराणाच्या प्रथम अध्यायाच्या आठव्या अंशमत 'श्री' चा महिमा वर्णिला आहे. आणि तिच्याविषयी जे जे सांगितले आहे ते ते ब्रह्मवैवर्तकरांनी राधेच्या बाबतीत सांगून राधा हीच 'श्री' आहे आणि ईश्वराची शक्ती आहे दोघांचा विधी पूर्वक परिणय म्हणजेच शक्तिमानाच्या शक्तीचा स्फुरण आहे शक्तीचा विकास म्हणजे दोघांचा विहार आहे असे सांगितले आहे. पण भागवताच्या दशांश भागतील तिसऱ्या अध्यायातील २८ व्या श्लोकात 'अनयाराधीतो नूनम' असा संदर्भ आला आहे म्हणजे यात अनयचा आणि राधेचा उल्लेख केला आहे .पण यात राधा धातू चा अर्थ आहे आराधना किंवा पूजा करणारी कृष्णाची आराधिका राधा .तर अमरकोश मध्ये कृतिका नक्षत्रापासून राधा विशाखा नक्षत्र १४ वे .पूर्वी गणना कृतिका नक्षत्रापासून होत असे कृतिका नक्षत्रापासून राशी गणना सुरू केली तर विशाखा नक्षत्र वर्षा मध्यावर येते म्हणून राधा रास मंडळात मध्यवर्ती असो नसो राशी मंडळात ती मध्यवर्तीच होती. गोपीकृष्ण राधाकृष्ण संबंध हरिवंशकारांनी आणि भागवत ब्रह्मवैवर्ततादी पुराणांनी किती विलासी पद्धतीने रंगवले असले ,सकृत दर्शनी वैश्विक दाखवले असले तरी कृष्ण एक महापुरुष या दृष्टीने त्याच्या या किशोरावस्थातील चरित्राकडे चारित्र्य राखण्याच्या दृष्टीने या प्रसंगाकडे बोट दाखवणे मुळीच रास्त नाही.
धर्म संरक्षणार्थ अवतरण झालेल्या कृष्णाच्या जीवनातील रास क्रीडेला चंद्रावरच्या काळाप्रमाणे कलंक असे कसे म्हणता येईल ?
गुरु सांदिपनींने व्यभिचारिक कृष्णाला आपला शिष्य म्हणून मान्यता दिली असती का ? कंसवधानंतर वृंदावनात जाऊन परतलेल्या बलरामाजवळ कृष्ण वृंदावनातील एखाद्या गोपी मध्ये अडकलेला असता तर तिची खास चौकशी त्याने केली नसती का? कृष्णाच्या पराक्रमावर भाळून रुक्मिणीने कृष्णावर प्रेम केले होते कृष्णाच्या वृंदावनातील अवैध्य प्रेमाच्या भानगडी तिच्या कानावर गेल्याशिवाय राहिल्या असत्या का? गेली हजारो वर्ष भारतवर्ष या महापुरुषावर विलक्षण प्रेम करत आला आहे का बरे ?या साऱ्यांच्या प्रश्नांची नकारार्थात उत्तरच सारे गवसते असे म्हणायला हवी.
संदर्भ -शोध कृष्णाचा -प्रवसी पूर्णत्वाचा
लेखक- प्रा.डॉ.राम बिवलकर




No comments:
Post a Comment