कृष्ण बलरामांचे वृंदावनातील अनेक पराक्रम मथुराधीश कंसाच्या कानी गेले. प्रलंबवधानंतर कंस थोडा घाबरलेला होता. त्यातच मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत आणि यादवांच्या कुलगुरूंच्या म्हणजेच गर्ग ऋषींच्या भविष्याप्रमाणे वसुदेवाचा कृष्ण हा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे.
कंस वसुदेवावर भयंकर चिडला याबाबतीत काय करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी यादव,वृष्णी आणि भोज या कुलातील मांडलिक गणप्रमुखांची एक गुप्त सभा एका मध्यरात्री त्याने बोलवली. वसुदेव, कंक, सत्यक दारुक विप्रभू, अक्रूर, कृतवर्मा भूरिश्रवा, अंधक हे सारे हजर झाले. कंसाने तुरुंगात डांबलेल्या उग्रसेनालाही सभास्थानी आणले. तो म्हणाला मथुरे जवळच्या वृंदावनात नंद गोपाचा पुत्र म्हणून वाढत असलेला कृष्ण नामक एक गोपी तुम्हाला माहित आहे का ?तो तथाकथित नंद गोपाचा मुलगा नसून माझ्या मृत्यूचा कारण होणारा असा वसुदेवाचा आठवा पुत्र आहे हे तुम्हाला माहित आहे का? धार्मिक सोज्वळ, मोठा शहाणा, गरीब दिसणारा हा वसुदेव आपल्या राजाचे अहित चिंतणारा एक राष्ट्रद्रोही आहे. माझी नजर चुकवून त्याने मुलाला मथुरेतून हलवून नंदगोपाचा मुलगा म्हणून त्याला तेथे वाढवावे ? खरोखरी वसुदेवासारखा दृष्ट व कृतघ्न असा कोणी नाही. कंसाने त्याच्या दोन्ही मुलांना लवकरच ठार करण्याची धमकी दिली.
परंतु अनेक वर्ष कंसाच्या जुलूम जबरदस्तीला व अत्याचारांना कंटाळलेली ही सारी मांडलिक मंडळी मनातून त्याचा विलक्षण द्वेष करत होती. ही त्याची जुलमी सत्ता कशी संपवावी असाही त्यांच्या मनात अनेकदा विचार येत होता. जर वसुदेव एका देवकीचा आठवा पुत्र जिवंत असेल आणि लहानपणापासून अनेक संकटातून लोकांना, गोकुळ वासियांना भयमुक्त केले असेल तर असे हे नेतृत्व आपल्याकडे यायलाच पाहिजे असं सर्वांना मनातून वाटत होते. पण सभेत कोणी बोलत नव्हतं पण अंधक नामक वृद्ध गणप्रमुखांनी कंसाला चांगलेच सुनावले "तू वसुदेवाला उगाच दोष देतोयस .तू एकामागून एक अशा त्याच्या सहा अर्भकांची निर्घृणपणे हत्या केली तेव्हा एखाद्या बापाने आपल्या शेवटच्या दोन मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर यात गुन्हा काय घडला?आज तू वसुदेवाचा भर सभेत अपमान करत आहेस कदाचित उद्या आमचाही करशील. तुझा नाश अगदी जवळ येऊन ठेपल्याचाच हा पुरावा आहे. मी यादव नाही अशी तू वारंवार घोषणा करतोस आणि आमचीही आता तुला यादव म्हणण्याची इच्छा नाही." कै. बाळशास्त्री हरदासांनी म्हटल्याप्रमाणे उत्क्रांतीच्या वाट्या बंद झाल्यावर त्या मोकळ्या होण्यासाठी क्रांतीची आवश्यकता असते ती अनिवार्यपणे समाज जीवनात यावी लागते .
कंसाच्या अत्याचारी कृत्यापासून लोकांची सुटका होण्यासाठीच कृष्ण रुपाने निर्माण झालेली ही स्थिती राज्यक्रांतीला अनुकूल होती. चिडलेला कंस म्हणाला की आपण मथुरेत लवकरच एक धनुर्याग घडवून आणू.त्यात दरबारी कुस्त्यांचे फड ठेवून गोपनेते कृष्ण आणि बलराम यांना त्यासाठी मथुरेत बोलावून घेऊ. चाणूर आणि मुष्टीक हे आणि इतर दरबारी मल्ल त्यांच्याशी कुस्ती करतील.
*केशी वध
कंसाने आपला भाऊ केशी याला गुप्तपणे बोलून आपल्या मनातील हेतू त्याच्याजवळ व्यक्त केला. केशी हा कंसाच्या विश्वासातील होता आणि दानवाकडून त्याने मायाविद्या देखील शिकलेली होती. कंसाने मथुरा परिसरातील गोकुळ वृंदावनातील गौळ वाड्यावरील देखरेख करण्यासाठी आणि जानपदातील महसूल वसूल करण्यासाठी सुभेदार म्हणून केशीची नेमणूक केली. तो गोपींचा असह्य छळ करी त्यांच्या गाई जप्त करी कधी त्या मारुनी टाकी.परिसरात केशीने मांडलेला हा उच्छादसत्र कृष्णाला कळाला. एक दिवस केशी अश्वरूपात वृंदावनात चालून आला. बेफाम झालेल्या घोड्याने वृंदावनातील गौळ वाड्यामध्ये थैमान घातले. तेव्हा तो कृष्णासमोर बेधडकपणे जाऊन उभा राहिला घोडा अंगावर चालून येताच कृष्णाने आपल्या हातातील दंड सरळ त्या घोड्याच्या जबड्यात घुसवला आणि दोन हातांनी त्या घोड्याचा जबडा पकडून कृष्णाने त्याची मान पिरगळली आणि जबडा फाडून टाकला आणि अश्वाचा- केशीवध झाला. गोकुळावर आनंद गगनावेरी झाला.
केशी वधाचा वृत्तांत हरिवंशात आणि विष्णुपुराणात ही सापडतो महाभारतातील सभापर्वत कृष्णाच्या अग्रपूजा प्रसंगी चेदिराज शिशुपाल कृत कृष्ण नींदे मध्येही या प्रसंगाचा उल्लेख करतात. अथर्ववेदात केशी वृत्तांत आहे. कृष्ण केशी म्हणजे काळा केसांचा! ऋग्वेदी संहितामध्ये केशी सूक्त आहे यानुसार केशी देवता आहे जगाला प्रकाशमान करणारी जी ज्योती आहे. तिचे नाव केशी आहे आणि जगाला अंधकारांमध्ये लपेटणारी जी शक्ती आहे तिचे नाव कृष्णकेशी आहे. कृष्ण या अंधकार आणणाऱ्या केशीचा संहारक आहे. कंस बंधू केशीसी या रूपकाचा संबंध असो वा नसो हे रूपक सुंदर आहे.
*धनुर्याग
कंसाच्या आज्ञेप्रमाणे अक्रूराने धनुर्यागासाठी यज्ञ मंडप उभारून दरबारी कुस्तींच्या दंगलीसाठी आखाडाही बांधून घेतला. आखाड्याची रचना नियोजन पूर्वक ठरवली होती कुस्त्यांच्या दंगलीमध्ये मोठा हौद होता आणि त्याच्या सभोवती पंच व इतर अधिकारी बसवण्यासाठी आसने होती .वृंदावनात प्रत्यक्ष जाऊन रामकृष्णाला दरबारी कुस्त्यांचे निमंत्रण देऊन आपल्याबरोबर घेऊन येण्याची आज्ञा कंसाने अक्रूरला केली. अक्रूर जरी कंस प्रेषित होता तरीही त्यालाही मथुरेत राज्यक्रांती व्हवी असे वाटत होते. त्यामुळेच अक्रूराने बलरामांना मथुरेत येण्याचे निमंत्रण देताना कंसाच्या दुष्ट हेतूची उभयांतांना कल्पना द्यावी असे ठरवले.
*कृष्णाने गोकुळ सोडले
अक्रूर रामकृष्णाला मथुरेला नेतांना.(फोटो-गुगलविकीपेडिया)
नंद गोपाच्या वाड्याशी अक्रूर रथातून उतरला. नंदाने या राजप्रेषिताचे मोठ्या आनंदाने स्वागत केले मी अक्रूर आहे अशी अक्रूराने ओळख करून देताच मथुरेतील प्रख्यात वृष्णी प्रमुख अशी ओळख पटताच नंदाची गडबड उडाली.अक्रूर म्हणाला आपला राजा परवा मथुरेत धनुर्याग करत आहे. त्यानिमित्त दरबारी कुस्त्यांची दंगल भरवण्याचे ही राजाने ठरवले आहे. तुमचा कान्हा कृष्ण संकर्षण राम आणि त्यांचे कितीतरी गोप मित्र उत्कृष्ट पैलवान आहेत कुस्तीगीर आहेत असे राजाच्या कानी आले आहे.तेव्हा त्यांना निमंत्रण देण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष येथे आलेलो आहोत. सर्वांनी यासाठी मथुरेला यायचे आहे. तसेच रामकृष्णाला आपल्या खऱ्या आईबापांना वसुदेव देवकीला भेटता येईल. ती दोघेही रामकृष्णांच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेत. म्हणून रामकृष्णांना मी पुढे नेणार आहे तुम्ही सर्व मागाहून आला तरी चालेल. राजाला नजर करण्यासाठी त्यांनी पुष्ट गाई बैल, दूध, दही ,लोणी तयार ठेवून राजाज्ञाप्रमाणे दुसऱ्या दिवशी मथुरेला जाण्याची तयारी करण्याचे ही आज्ञा दिली. रात्री अक्रुर बराच वेळ रामकृष्णाशी मथुरा भेटीबाबत चर्चा करत बसला होता. कान्हा आपला मुलगा नाही हे कळल्यावर रात्रभर रडत असलेल्या यशोदेचे सांत्वन करीत नंद ही जागाच होता. आपल्या जन्माचे रहस्य भेद समजलेल्या कृष्णाने यशोदा जवळ जाण्यासाठी आशीर्वाद मागितला. यशोदा स्वतःला सावरून म्हणाली, "कृष्णा आयुष्यात यश आणि किर्ती तुला नेहमीच मिळतील देवकीचे दुर्भाग्य माझ्यापेक्षाही ही मोठे आहे तिला भेटायला निघालेल्या तुला मी कधीच अडवणार नाही". रामकृष्णांनी नंद रोहिणी गोप गोपिकांना नमस्कार केला. शेकडो गोप गोपी अश्रू पूर्ण नयनांनी त्यांना निरोप द्यायला नंद घरी जमले होते. अक्रुराच्या पाठोपाठ नंदप्रमुख गोप इतर कुस्तीगीर यांनी आपल्या बैलगाड्या हाकारल्या.
चित्र -(hare krishna movement)
*रामकृष्ण मथुरेत
राम कृष्णाने अक्रुराचे आपल्या वाड्यावर उतरायला येण्याचे निमंत्रण नाकारले. ते नगराबाहेर बागेतच थांबले. अक्रुरा कडून रामकृष्ण यांना मथुरेतील सर्व राजकीय परिस्थिती समजली होती.राज्यक्रांतीला सर्व नगरी आसुसली होती. पण थोडेसे यादव भोज वृष्णी मनातून धास्तावले देखील होते. राम कृष्णाच्या नेतृत्वाकडे सर्वजण डोळे लावून बसले होते. ते दोघेही बिनधास्तपणे राज्यामध्ये रस्त्यावरून फिरत होते.एका भेटलेल्या धोब्याने राजदुकले रामकृष्ण यांना देण्याचे नाकारल्यावर कृष्णाने एका फटक्यात त्याला मारून टाकले व हवी ती वस्त्र घेतले. पण आजूबाजूच्या कोणीही भर रस्त्यात घडलेल्या या हत्येची सोयरसुतक देखील केली नाही .यावरूनच नगरातील सुरक्षा व्यवस्थेची परिस्थिती किती खालावली होती याची कल्पना येऊ शकते.
आणि याच कृष्णाच्या कृत्यामुळेच पुष्प बाजारातील गुणक नामक व्यापाऱ्यांनी कृष्णाला हवी तेवढी फुले दिली.
चित्र -(hare krishna movement)
तर राजप्रासादामध्ये चंदन व इतर सुगंधी द्रव्य घेऊन जाणाऱ्या कुब्जेनेही आपणाहून ती सारी सुवासिक द्रव्ये या दोन बलदंड देखण्या तरुणांना दिली. हे सारे कुब्जा चित्रण अनाकलनीय आहेत व अनैसर्गिक म्हणून त्याज्य म्हटले आहे.
त्यातच धनुर्यागानिमित्ताने ठेवलेल्या एका मोठ्या धनुष्याला पाहण्यासाठी गेलेल्या कृष्णाने सहज त्याची प्रत्यांच्या लावण्याचा प्रयत्न केला व ते मोडून टाकले.
*कंस वध
मथुरेतील प्रजाजनांनी कृष्णाचे मथुरेत केलेले अबोल स्वागत कंसाला बोचत होते. अलीकडच्या काळातील हिटलर, स्टैलिन, मुसोलिनी या हुकूमशहांच्या मरणाच्या वेळेची मनस्थितीची मिळती जुळती वाटावी अशी कंसाची मनस्थिती रात्रभर होती. दुसऱ्या दिवशी मल्लांप्रमाणेच कुवलयापीड नामक एका मदमस्त हत्तीच्या हातून कंसाला रामकृष्णांचा वध करायचा होता .
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे खरोखरच महामात्र नामक एका माहूताने कुवलयापीड नावाचा तो हत्ती कृष्ण येताच मंडप द्वारी त्याच्या अंगावर घातला. पण न घाबरता कृष्णा ने अंगावर चालून आलेल्या या हत्तीच्या सोंडेवर चढून जाऊन प्रथम माहूताला मारले व नंतर हत्तीला बुके मारून जेरीस आणले आणि आणि मग त्याने त्याचे दात उपटून त्याला ठार केले.
आपल्याला ठार मारण्याच्या दृष्टीने या मल्लांचे हल्ले चालले आहेत हे गोष्टी युद्ध सुरू होताच कृष्णाच्या लक्षात आली. तेव्हा कृष्णा ने चाणुराला आणि बलरामाने मुष्टिकाला सर्वांसमक्ष रगडून काढले. कंसाने संतापून कूट शल कौशल आदी दरबारी मल्ल्यांनाही कृष्ण बलरामावर हल्ला करण्यासाठी चढवले पण त्या दोघांनी एकेका ठोकरी सरशीच या साऱ्या मल्लांना यम सदनास पाठवले.
ते पाहून कंस भयंकर संतापला आणि म्हणाला "या गवळ्याच्या पोरांना मारून टाका. नंद गोपाच्या हाती बेड्या घाला. वसुदेव व माझा बाप उग्रसेन यांना ठार करून टाका." कंसाचे हे असे बोलणे ऐकून कृष्णाने मनाशी काही निश्चय केला आणि सिंहासनाच्या पायऱ्या तू झरझर चढून गेला. कंसाचे केस धरून त्याने त्याला खाली खेचले आणि अरेराव पण मनाने खचलेला कंस कृष्णाने केस धरून खेचतात संपला होता. कृष्णाने तो मृतदेह फराफर ओढून आखाडाच्या प्रवेशद्वारा जवळ आणून टाकला. कृष्णाच्या अंगावर धावून आलेल्या कंसाच्या सुनामीदी आठ भावांना बलरामने एका लोखंडाच्या कांबेने ठार केले. मांडलिक समक्ष मथुरेच्या गणराज्य वरील एक सत्ता कार्यरत संपली. तरी कोणीही त्याच्या विरुद्ध बोट उचलले नाही.प्रगतीचे अडवलेले दार पुन:गतिमान होण्याची वाट मोकळी झाली होती.
*मथुरेचे राज्य नाकारले
कंसाला कृष्णाने संपवला .खरे तर त्या काळातील नियमानुसार राज्य हे विजेत्याचेच !परंतु कंसाच्या आणि त्याच्या बंधूंच्या वधानंतर त्यांच्या प्रेतांच्या अंतिम संस्काराचा एक प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा कृष्णाच्या आज्ञेने कैदेतून विमुक्त झालेल्या उग्रसेनने वसुदेवाच्या वाड्यावर असलेल्या कृष्णाला भेटायचे ठरवले.उग्रसेनाने रामकृष्णाने वधलेल्या आपल्या कंस आदि आठ पुत्रांचा यथाविधी अंत्यसंस्कार करण्याची कृष्णाकडे अनुज्ञा मागितली हे अंत्यसंस्कार आटपून मी माझ्या सुनांसह आरण्यवासात जाणार आहे असे तो म्हणाला .परंतु कृष्णाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला. उग्रसेनाला उच्च स्थानावर बसून कृष्ण म्हणाला, "राजा मथुराचे राज्य हवे होते म्हणून मी कंसाला मारले नाही. कंस जुलमी होता हुकुमशहा होता,विध्वंसक होता आणि बापाला ही बाप न मानणारा होता. कुलद्रोही होता म्हणून मी त्याचा वध केला. कंसाच्या हातून सोडविलेल्या या राज्याचा तू स्वीकार कर भोज वृष्णी आणि यादव कुळातील गणप्रमुखांच्या सल्ल्याने तू हे राज्य करावे. मी आणि बलराम तुझे नातू म्हणून तुझी आज्ञा शिरसावंद मानू." एवढे म्हणून त्याने त्वरित कंसाचा मुकुट मागवला आणि उग्रसेनचा मथुराधीश म्हणून अभिषेक केला.
चित्र-भारतकोश
कंस आणि त्याच्या बंधूंच्या अंत्यसंस्कारात रामकृष्ण नुसते सहभागी झाले नाही तर त्यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला. कंस आणि त्याच्या बंधूंची कलेवरे सुशोभित पालख्या करून यमुनेच्या उत्तर तीरावर नेण्यात आली. अंत्ययात्रेला सारी मथुरा लोटली होती. चंदनाच्या चितांवर वेद घोषामध्ये त्या दुरात्म्यांच्या कलेवरांना अग्नी देण्यात आले.
*इराकती कर्वे यांनी 'युगांत'या ग्रंथात यादवांत पक्षापक्ष खूपच असल्यामुळे आणि कृष्णाच्या बाजूला काही लोक असले तरी विरूद्ध बाजूला पुष्कळ लोक असल्याने कुळातल्या कुळात भांडणे नको म्हणून कृष्णाने मथुरेचे अगर नंतर द्वारकेचे राजे पण स्वीकारले नाही असे म्हटले आहे. ते योग्य होणार नाही कारण कृष्ण जीवनातील जरासंधवध, नरकासूरवध अशा अनेक प्रसंगात ही कृष्णाने धर्मराज्य संस्थापनेचे आपले जीवन ध्येय डोळ्यापुढे ठेवून निस्वार्थपणे जित राजाच्या मुलाला राज्याभिषेक केल्याची उदाहरणे सापडतात .कंस वधाबाबत ही त्याने त्याची उपरोल्लेखित भूमिका साक्ष देते.
संदर्भ -शोध कृष्णाचा- प्रवासी पूर्णत्वाचा
लेखक-प्रा. डॉ.राम बिवलकर