समथिंग इज मिसिंग असं वाटतं असतांनाच काही मराठी सिनेमे मन गाभाऱ्याशी पुन्हा नाळ जुळवून देतात.नाळ सिनेमाने आई आणि मुल या नात्याची वेगळीच कथा दाखवली होती.चैत्याचा गोड निरागस वावर ,त्याची आईच्या नजरेत भरण्याची हुरहूर सगळं कसं अलगद तरीही मनात वेगाने घडत होतं.
त्याच चैत्याची मोठी झाल्यावर एकाच नाळाने जोडले गेलेले बहिण -भावंड यांची कहाणी "नाळ २" सिनेमात आहे.
इथेही चैत्याची तिच तगमग आहे चिम्मी त्याची बहीण त्याला कधी राखी बांधणार.पण इत्तूशी चिमणी मस्त मिरची सारखीच तिखट, नाही म्हणजे नाही ऐकत.हळूहळू चिम्मी चैतू आणि 'मनीदादा' यांच्या नात्याची वीण बांधली जात राहते.पण हे सगळं या चिमुकल्यांच्या विश्वात घडतांना गावातल्या डोंगराच्या जादूई विहिरीने ऐकलं पाहिजे ना तर ते १००% घडणार.तेव्हा चिमूकले मोठं साहस करायला निघतात.
खरं म्हणजे पहिल्या दृश्यापासूनच सह्याद्री मनात बिंबवला आहे.निसर्गरम्य जुन्नर,जीवधन किल्ला, नाणेघाट,तलाव परिसर निसर्गसौंदर्याची उधळण संपूर्ण चित्रपटात आहे.तसचं गावातली चूल, छोट्या छोट्या गल्ली, सारवलेल्या भिंती, पद्धतशीर त्या खोपट्यात मांडणीत मांडलेली भांडी,पाण्याच्या खळखळाट अगदी एकूण एक फ्रेम अप्रतिम आहे.
गाणी डराव डराव भिंगोरी लहान मुलांसाठी आहे पण संगीत आणि गमतीशीर असल्याने परत परत ऐकावी वाटतात.
चिम्मी चैत्याला धावत धावत राखी बांधते.
जादूई विहिरीत मागितलेल्या इच्छांची भिरभिरणारी फुले एकाच नाळेने जोडलेल्या नात्यांना नवा सुगंध देतात..
-भक्ती

No comments:
Post a Comment