Sunday, July 17, 2022

सुंदर ते ध्यान

 ध्यास सावळ्या विठूचा मनी

वाट पंढरीची चालावी चालावी...

समस्त संतांना ज्या रूपाने भक्तीची दीक्षा दिली,त्याच विठूच्या रूपाचा ध्यास घेत आजही भक्तीमय वारकरी पंढरीकडे मार्गस्थ करीत राहतो. विठूचे ते कमरेवारचे दोन हात अत्ठ्ठावीस युगांपासून ठेवलेले आहेत.पण आताच लेकराला आवडत्या कामाला लावून एखादी माउली दोन क्षण कमरेवर हात ठेऊन निश्चिंत उभी आहे असा भास होतो.सार्या जगाचा कारभार हाकणारे हात क्षणभर विठूने कमरेवर ठेवले आहेत.
त्या विटेची ती काय समाधी अवस्था घट्ट रोवलेल्या संकल्पांची ध्योताकच आहे.

गळ्यात विराजमान तुळशी हार विठूला सदैव सुगंधित करतात.इकडे वारकर्याच्या डोयीवरच्या तुळसहीचा श्वास आसमंत दरवळत राहतो.विठुच्या गळ्यात रुळनार्या तुळशीच्या श्वासाशी एकरूप होत या माथ्यावरच्या तुळशी मार्ग काहीसा सुसाह्य करीत राहतात.

विठूचे रूप सावळे ! आषाढातले मेघही सावळे !हे धावणारे सावळे मेघ ,मेघातल्या सरी ,विठूच्या भक्तीरसात वारकऱ्यांनाही विठूचे सावळे रुपडं देतात.
विठूच्या कपाळीचा टिळा,केशर सुवास वाटेतल्या नदीच्या स्नानात सुगंधित करीत राहतात.

मजल दरमजल नामघोषात ,मनाचे कोष तोडीत चंद्रभागेच्या काठाशी भाव दान समर्पित करतात.कळसाच्या त्या दर्शनाने मनातील पुढच्या अनेक हेतूंना उंची देतात.तर विटेवर उभ्या त्या विठूच्या पावलांशी दोन क्षण नतमस्तक भक्ती केंद्रित मना ,त्या मन गाभाऱ्याचा विस्तार अनंत करतो.
पुन्हा पुढच्या वर्षी तेच सुंदर रूप,तोच ध्यास ,तोच श्वास ,पंढरीची वाट!

-भक्ती

No comments: