Sunday, December 7, 2025

पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग



पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग

लेखिका -#ऐश्वर्या_रेवडकर


स्वतःचे अवकाश शोधणाऱ्या स्वच्छंदी मुली लग्न संस्थेतील कच्चे दुवे ,पुरुषत्वाचा दुराभिमान, पितृसत्ताक वर्चस्व, स्त्री-आदरातील सामाजिक दांभिकता या मुद्द्यांपर्यंत तटस्थपणे नक्कीच पोहोचतात.तेव्हा त्या विचारांना फेमिनिझम म्हणत आपण हेटाळतो .पण फेमिनाईन/ faminine energy सारखी सुंदर गोष्ट ज्यासाठी स्त्री-लैंगिकता व स्वातंत्र्य याबाबत बोलणंही, समजून घेणेही गरजेचे असते,हे भारतीय समाजात कोणाच्याही गावी नसते.याविषयी मतं मांडण हे अनेक सामाजिक संकेत मोडण्यातहजमा आहे. तिथे ही कादंबरी एक अबोल विषयातील  एक सूर्यफुल आहे, स्वच्छ ब्राईट!

कादंबरीची नायिका मुक्ताचे अनेक प्रकारच्या पोरकपण तिला ज्या ज्या वेळी हक्काचं घर, स्पर्श, शांती मिळाल्याचं सुखाने न्हाऊ पाहत,त्यात्यावेळी पुरुषाची फुकाची मर्दानी/पुरूषत्व त्या साऱ्याचा चुराडा करते. कादंबरीत मुक्ताची फरफट वाचत असतांनाच तिचं आपल्या अवघड अशा ‘सर्जरी’ कार्यातील  डॉक्टर म्हणून एकाग्रता थक्क करते. बाई स्वतःच्या पायावर उभी असणं, तिच्या कामाची ती स्वाभिमानी असणं हा तिच्या अवकाशाचा पाया आहे, हे पुन्हा पटतं.

अशा काळ्यागहिऱ्या  आयुष्याच्या लाटांवर शरीराच्या नावेला अनेकदा आत्महत्येचा भोवरा गिळंकृत करू पाहतो. पण दरवेळी उठून उभी राहणारी मुक्ता अजब रसायन आहे.

खूप दिवसांनी आयुष्याचे जसं आहे तसं उघडं-नागडं सत्य सांगणारी, स्वीकारायला लावणारी कादंबरी वाचली. कुठेही जडजड वाक्यांचा मुलामा देत कादंबरी वाढवून मांडलेली नाही.

सारे समाज नियम माणसानेच बनवले आहेत.त्यात अडकून न राहणाऱ्या स्वतः स्वतःच्या नियमांनी जगणाऱ्या मुक्ता  आजूबाजूला नक्कीच आहेत.

-भक्ती