महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे शहर म्हणजे 'राजधानी सातारा'.राजगड,रायगड,जिंजी नंतर महाराष्ट्राची चौथी राजधानी
सातारा जाणून घेण्यासाठी पाहण्याची इच्छा होतीच.साताऱ्यात संध्याकाळी चार वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन अजिंक्यतारा किल्ल्यावर गेलो.
शिलाहार राजा भोज(दुसरा) याने ११९० मध्ये बांधला.पुढे तो यादव-बहामनी-आदिलशाही-मराठा साम्राज्य (१६७३)-मोगल-ताराराणी-मोगल-शाहू-इंग्रज अशा क्रमानुसाऊ विविध राजवटींत समाविष्ट झाला.यातल्या ठळक गोष्टी म्हणजे पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती.
गडावर शेवटी मंगळादेवीचे मंदिर आहे मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे.येथून सातारा शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडते.समोरच हिरवाईने नटलेल्या ढगांचा पदर आणि सूर्य बिंबाची चमचमती टिकली लावलेल्या अनेक डोंगररांगा मोहक भासतात.किल्ल्याच्या पायवाटा,भिंती सोनकी फुलांच्या निसर्ग भाषेत बोलक्या झाल्या आहेत.
रात्रीचे जेवण पितळी थाळीतसह पितळी गडू पाहून मजा वाटली.जेवणही रूचकर होतं, आमच्याकडे हाॅटेलमधलं व्हेज जेवण म्हणजे सगळ्या भाज्यांची ग्रेव्ही सारखी चवही सारखीच लागते.इथे सगळ्या भाज्या वेगळ्या लागत होत्या.यावरून सातऱ्याचे मांसाहारी जेवण का प्रसिद्ध आहे याचा अंदाज आला,काटा किर्रच असणार ;)
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो.पावसाची मस्त भुरभुर सुरु होती.कासचे बुकिंग ११ वाजताचे होते.त्यामुळे आधी ठोसेघर धबधबा पाहायला निघालो.रस्त्याने फुललेली कारवी डोळे भरून पाहिली.धुक्यात हरवलेला डोंगर मध्येच पावसाच्या सरी मधेच कोवळ ऊन अगदी सुंदर वातावरण होतं.ठोसेघरला पण तिकीट काढल्यावर आत निघालो.दूरपर्यंत येणारा धबधब्याच्या प्रवाहाचा आवाज रोमांचित करीत होता.इथे पेबल लावलेली पायवट होतीच.इथेही बऱ्यापैकी कारवीची फुलं होती, यथेच्छ कारवी पाहिली.काही मशरूम ही झाडांवर वाढलेली होती,त्यांचे निरीक्षण केले.ठोसेघर धबधबा ६६० फूट उंचीवरून कोसळतो.ठिकाणी ३ धबधबे आहेत एक मुख्य आणि त्या लगतच एक छोटा ,तिसरा धबधबा या दोघांपेक्षा पासून थोडा लांब वाहतो धबधब्याच्या जवळचे गाव ठोसेघर आहे.
पण भारतातील सर्वात जास्त उंचीचा १८४० फूट वजराई धबधबा जवळच होता तो आम्ही पाहिला नाही ही छोट्या ट्रिपमधली मोठी चूक -१ ;)
ठोसेघरच्या तसेच पुढे गेल्यावर चाळकेवाडी हे गाव आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवनचक्की पासून वीज निर्मिती केली जाते चाळकेवाडीचे पठार सुद्धा पाहण्या सारखे आहे . तिथल्या प्रचंड उंच पवनचक्की पाहिल्या ज्या इतर पवनचक्कीच्या तुलनेत अत्यंत संथ फिरत होत्या?
पुढे सज्जनगडावर पोहचलो.शाळेत असतांना इथे आले होते,तेव्हाचा प्रसंग जशास तसा डोळ्यासमोर उभा राहिला.रामदास स्वामींचे शेजघर ,पाणी भरायच्या मोठमोठ्या हंडे पाहून हरखून गेले होते ते परत आठवले.सज्जनगड आधी परळी किल्ला (गड ) म्हणून होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना हा किल्ला सज्जनगड विस्तारासाठी दिला होता.गडाच्या टोकावर धान्या मारूतीचे मंदिर पाहायला जातांना दूरवरच्या तलावाचे दृश्य पाहायला छान वाटत होते.रामभक्तीचा वसा मला माझ्या आजी आजोबांकडून मिळाला.त्या रामाचे परम भक्त रामदास स्वामी यांच्या कार्याने पवित्र सज्जनगडावर माझं मन भरून येतं होतं.श्रीराम जयराम जय जय राम या सामूहिक नामस्मरणाच्या वेळी रामभक्तीतमुळे माझ्या डोळ्यांना अश्रू अनावर झाले.ते का हे मला ठाऊक आहे पण हे मी शब्दात मांडू शकत नाही,जय जय रघुवीर समर्थ! ही छोट्याशा ट्रिप मधली मोठी बरोबर गोष्ट-१;)
सज्जनगडावर रेंगाळल्यावर २ वाजता मुख्य आकर्षण 'कास पठार" याच्याकडे वळालो.आता मात्र गर्दी , ट्रॅफिक भयानक वाढली होती.आमचा वाहक चांगला असल्याने कमी वेळात तिथून बाहेर पडलो.कास पर्यंत पोहचू पर्यंत ३.३० वाजले.बुकिंग ३ पर्यंत होतं.काय होईल याची काळजी होती,पण गर्दीच इतकी प्रचंड होती की तिकिट असणं हीच बाब महत्त्वाची होती.
आता फुलांच्या त्या जादुई जगात शिरल्यावर हा स्वर्ग आहे का ,असाच भास झाला.कास पठार चार एकापेक्षा अधिक भागात पसरले आहे.
फुलांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे अत्यंत सच्छिद्र लॅटराइट खडक (जांभा) पासून बनलेले उत्तर पश्चिम घाटाच्या शिखरावर एक लॅटरिटिक पठार आहे. आणि मातीचा पातळ थर. माती वर्षभर पाणी टिकवून ठेवू शकत नसल्यामुळे केवळ मुसळधार पावसातच वनस्पती जीवन टिकवून ठेवते. विशेष म्हणजे, कासची वनस्पती या विशिष्ट ठिकाणी मर्यादित आहे कारण पठार हे बेसाल्टचे बनलेले आहे, जे थेट वातावरणाच्या संपर्कात आहे.(माहिती सौजन्य -आंतरजाल)
गेट क्र.१-४ अशा दोन्ही बाजूंनी हे पठार विविधरंगी फुलांच्या उत्सावासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आपल्यासाठी डोलत असते.
गेट क्र.१ मध्ये फुलांभोवती कुंपण टाकून मधोमध चालण्यासाठी चांगला रस्ता केला आहे.इथे टोपली कारवी,आभाळी यांची निळसर फुलं तर जंगली आल यांची मोठी मोठी फुलं दूरवर नजर जाईल इथवर पसरली आहेत.गेट क्र.२ आणि. ३ एकाच पठार भागासाठी दूरवर आहेत इथे वेगळ्याच प्रकारची गुलाबी तगर,दीपकाडी,धनगराचा फेटा,पांड,गेंद,चावर,डालजेलियाना ही मला ओळखता आलेली फुलं पाहिली.इतरही अनेक फुलं आहेत जी ओळखता आली नाहीत.
याबद्दची माहिती देणारा एक अल्बम
आता आम्हांला खुप उशीर झाला होता आणि ट्रॅफिक खूप वाढलं होतं तेव्हा लवकर परत फिरणं गरजेचे होते.त्यामुळे गेट क्र.४ कुमुदिनी तलावाकडे जाऊ शकलो नाही ही मोठी चूक -२ :(
पण पिवळी सोनकी आणि मिकी माऊस नाही दिसली.मी नेटवर खुपदा वाचलं की कास पठार उगाच ओव्हररेटेड ठिकाण आहे.एकदम सफेद झूठ आहे हे अजिबात विश्वास ठेवू नका .कास पठार खरच अद्वितीय आहे !
सकाळी ७ ते रात्री ७ वेळ आहे,१५० रू.तिकिट आहे, ऑनलाईन पण साईटवर जाऊन काढू शकता.सकाळी कास पाहून तपोळा,कास तलाव,वजराई धबधबा पाहुन मग बामणोली, यवतेश्वर वगैरे पाहू शकता.वेळेअभावी आणि नियोजन अभावी आम्ही फक्त कास केला.
धुक्यात हरवलेलं हे पठार कधी जोरदार कधी भुरभुर पाऊस, सर्रकन पडणारे कोवळ ऊन आणि फुलांचे डोळ्याचे पारणे फेडणारे पृथ्वीवरचा स्वर्ग याची डोळा याची देही एकदा-अनेकदा अनुभवावा असाच आहे.
-भक्ती
अजिंक्यतारा
सोनकीफुलांची भाषा बोलणाऱ्या भिंती
ही वाट दूर जाते
सातारा शहर
पितळी गडू
कारवी
ठोसेघर धबधबा
कारवी
जांभळी
चवळेवाडी
सज्जनगड
कास
टोपली कारवी
जंगली आल
गुलाबी तेरडा
दीपकाडी
निसुरडी
सीतेची आसवं
छोटागेंदफूल