हरीश्चंद्रगड-पाचनई मार्गे
तारामती शिखरवरून सूर्योदय
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
पुष्पवैभव
कोकणकडा
गडावरील मंदिरशिल्प

३१ डिसेंबरला हरिश्चंद्रगडला जायचं होत पण त्यादिवशी त्यावर मनाई
सरकारकडून झाली.परत ट्रेक कैम्प कडून १४
जानेवारीला हा ट्रेक होणार होता ,मग जायचं ठरलच.ट्रेकला
डॉक्टर,अधिकारी,बँकर,पत्रकार पासून विद्यार्थी सर्व वयोगटातले मंडळी होती.सागर आणि
प्रियांका ट्रेक लीड करणार होते.
या आधी सोपे सिंहगड ,शिवनेरी,रायरेश्वर ,केंजळगड केले होते.पण
हरिश्चंद्रगड ‘भटक्यांची पंढरी’ का मनाला जातो ते या ट्रकने उमगले.रात्री ११ ला
नगरहून निघालो ,रात्रीचा प्रवास झोप लागलीच कोतुळच्या अलीकडे जाग आली कुट्ट अंधार
आणि खिडकीतून पाहिलं तर आकाशातला सप्तर्षी बरोबर येत होता(किंवा कदाचित सप्तर्षीच
ओळखता येत असल्याने खच्च भरलेल्या चांदण्यांच्या आकाशातून तो म्होरका माझ्यासाठी
झाला.
रात्रीच पाचनई गावात चारच्या सुमारास पोहचलो.अंधारात टोर्चच्या
मदतीने गडाकडे निघालो.हवेत गारवा होता आकाशात ताऱ्यांची पखरण उधळली होती .इतके
तारे खूप म्हणजे खूपच दिवसांनी डोळे भरून पाहिले होते.गड चढायला सुरुवात केली.जसे
जसे पुढे जात होतो तस तसे अंधारात एक वेगळच धाडस वाटू लागले.पुढे एका सपाट जागी
आलो तर तारे पाहून प्रचंड आनंद वाटत होता.हा ध्रुव का तो शुक्र म्हणत शुक्रतारा मंद
वारा ओळी गुणगुणल्या गेल्या.शिडी चढून
गेल्यावर भव्य कपारीला अनुभवत पुढे निघालो .अजून किती महंत म्हणत एक दीड तास झाले
होते.तीन चार दुसरे ग्रुपही चालत होते.माझी घाई सुर्योदयापूर्वी तारामती शिखर
पर्यंत जायला पाहिजे ही होती.काही ठराविक वेळाने पाणी आणि विश्रांतीसाठी पाच
मिनिटे थांबत असू.चांगली दोन अडीच तास पायांची दौड केल्यावर गडावरच्या मंदिराचे
मोहक दर्शन झाल्यावर शांततेचा स्पर्श मनाला झाला.
आता मागचे लोक अजून गडावर पोहचायचे होते गडावर वाट रेंगाळले कारण तारामती पर्यंतची वाट माहित
नव्हती .सूर्योदय चुकतोय ही रुखरुख मनाला होती,किती वेळ झाली तरी मागची मंडळी
येईना पुढे जाता येईना ,मला बाई रडूच यायला लागल होत.पण मंडळी आली.काहीच जण वर
चढण्यासाठी निघाले आणि प्रियांकाने लीड केलं.मी झपझप पुढे निघाले.तारामती वेळेत
गाठणे शक्यच नव्हते.एका पठारावर आलो ,समोर पहुडलेले डोंगर ,उजनीचे पाणी,क्षितिजापाशी लाल केशरी
रंगाची उधळण झाली होती.मी सर्वात पुढे होते.सर्वाना या जागी बोलवायला परत मागे
गेले आणि तिथे घेऊन गेले.समोरच दृश्य पाहून मुली म्हणाल्या ‘वाह ,काकू ब्रो मानल
तुम्हाला तुमच्या मुळे हा नजारा दिसतोय’ .आणि तत्क्षणी सुर्यनारायण बिंदूरूपातून
हळू हळू क्षितीजातून उगवत होता.तुझ्याचसाठी थांबलो होतो अस सूर्य म्हणत होता जणू.दुर्गभ्रमंतीचे
खूप लेख आणि फोटो पाहत असल्याने समोरचा ‘नेढ’ मला अचानक ओळखता आला सर्वांना तो मी दाखवला.सोनेरी प्रभा
सगळीकडे पसरली होती.सोनेरी उन्हात न्हाहून खाली उतरलो.
खाली उतरल्यावर कोकणकड्याकडे निघालो.कोकणकड्याचे अपूर्व सौदर्य
डोळ्याचे पारणे फेडीत होते.एका टोकाकडून शेवटच्या
टोकापर्यंत अर्धगोलाकार कडा पाहत गेले.जमिनीवर उलट झोपून पाहत राहिले.नळीचा
मार्ग, आजोबा डोंगर,सतीचा डोंगर,जुन्नर गेट,साधाल,नळीचा मार्ग,रोहिदासगड असे काही
गड,वाटा ओळखता आले.कोकणकडा इथे सुर्योदया पूर्वी आलो तर हवामानाच्या अनुकुलतेनुसार
इंद्रव्रज पाहण्याचा योग घडू शकतो.जे पहिल्यांदा इंग्रज शासनातील एका अधिकार्याने
पहिल्यांदा पाहिलं आणि यांची नोंद केली .
नाश्ता केला आणि परत फिरल्यावर मंदिराकडे जाताना जागोजागीचे टेंट
,आबाल वृद्धांची मांदियाळी या पंढरीत दिसत होती.मंदिराचे शिखर आकर्षक आहे. इथे
असलेल्या लेण्या पाहिल्या तारामती शिखरावर लेण्यात दिगंबर बालगणेश मूर्ती आहे.त्याबजुलाच
अनेक मुर्तीविरहीत विश्राम गृह आहेत. ज्ञानेश्वर आणि इतर भावंडानी समाधी
घेतल्यानंतर इथेच चांगदेवाने ‘तत्वसार’ १३ वे शतक ग्रंथ लिहिला त्यात
हरिश्चंद्रगडाचा उल्लेख आणि सौंदर्याची महती(श्लोक -१०२८ -१०३३) त्यात आहे .तसेच अनेक पुराणातही या गडाचा उल्लेख
आहे ,हे रा.चि.ढेरे यांच्या ‘चक्रपाणि’ या ग्रंथात सांगितले आहे.तसेच इथे सापडलेला
शिलालेख हा पुण्यातील चांगावटेश्वर शिलालेखा सारख्याच शैलीत आहे.गोनीदा यांनीही
आपल्या पुस्तकांत हा शिलालेख आणि या गडाचा उल्लेख आहे.
हरिश्चंद्रगड या विषयी प्रा.प्र.के.घाणेकर यांचे एक उत्कृष्ट व्हिडीओ
मी पहिला होता.त्यात सांगितल्या प्रमाणे नवव्या शतकातील झांज या शिलाहार राजाने गोदावरी व भीमाशंकर या व या दरम्यान उगम
पावणाऱ्या नदींच्या उगम स्थानच्या जवळ एका शैलीची इतर बारा शिव मंदिर उभारले.त्यातील पाच नाशिक ,पाच
पुणे तर दोन(रतनवाडी,हरीश्चंद्रगड) नगर जिल्हातील आहेत.हरिश्चंद्रगड गडावर मंगळगंगा
नदीचा उगम होतो तिथे हे हरिश्चंद्रेश्वर शिव मंदिर आहे.हीच नदी पुढे मुळा नदी
होते.त्यामुळेच इथे पाण्याचा अनेक नैसर्गिक टाक्या ज्या अत्यंत स्वच्छ पिण्यायोग्य
आहे.मंदिराबाहेर दोन शिलालेख आहेत ज्यात चांगदेवाचा उल्लेख आहे.समोरच असलेली
सप्ततीर्थ पुष्करणी आणि १४ मंदिर सदृश्य कोनाडे पाहिले.तसेच जागोजागी अनेक छोटे
छोटे मंदिरे आहेत.
त्यांनतर केदारनाथ गुफेत गेलो.त्याच्या जवळच असलेल्या ओढ्यामुळे इथे
पावसाचे पाणी आत शिरते .ओव्हर फ्लो नंतरचे अतिरक्त पाणी २ मीटरच्या आसपास उंची
असलेल्या भव्य शिवपिंडीच्या आजूबाजूला थंडगार पाणी सतत असते.पाण्यात उतरून दर्शन
घेतले.एका भिंतीवर असलेले शिवपूजन शिल्प पाहिले.
मनाची थंडाई झाल्यावर या सुंदर गडाच्या आठवणी साठवून गड उतरायला
लागलो.चढतांना अंधार होता आता सजगतेने गड पाहत उतरू लागलो. गावात पोहचल्यावर गरमागरम
बाजरीची भाकरी ,मटकी,इंद्रायानी भात वाट पाहतच होत.इतक्यात समोर जालावरचे मित्र
असणारे ,योग,ट्रेकिंग याचे सच्चे जाणकार विवेक पाटील समोर दिसले.वाह ,अमला तर खूप
आनंद झाला.इतक्या दिवस त्यांच्या सर्व पोस्ट वाचत आले आहे आणि ९९.९९% त्या मला
पटतात आणि आवडतातच अनेकदा तिथे मी मत मांडते.आम्ही बराच वेळ आरोग्य,ट्रेकिंग,सिनेमा अनेक विषयांवर मोकळ्या गप्पा
मारल्या.मला तर भारी ट्रेक नन्तर हा बोनसच आनंद मिळाला.

माझे काही जुजबी -निरीक्षण हरीश्चंद्रगड हा वेगवेगळया मार्गांनी चढता
येतो.त्यातील सर्वात सोपी पाचनई ही वाट आहे तर अवघड माकडनाळ आहे असे समजले.तसेच
खिरेश्वर,नळीची वाट ,टोलारखिंडीची वाट ट्रेकरकडून जास्त परिचितपणे वापरली
जाते.कोकणकड्याहून सूर्यास्त वा सूर्योदय पाहण्यासाठी,तारामती शिखर सूर्योदय
,रात्रीचे आकाश निरीक्षण (अभ्यास) करण्यासाठी एक रात्र टेंट मध्ये राहण्याचे ,एक
दिवस गड असे नियोजन पाहिजे.पावसाळ्यात मार्गदर्शक सह गडाचा माहोल अनुभवायला
पाहिजे.पुष्पवैभव पाहण्यासाठी पावसाळ्यानंतर एक ट्रेक पाहिजे.आता मोजा मी आणखी
किती वेळा हरिश्चंद्रगडावर जाणार आहे :)
-भक्ती