Thursday, October 17, 2024

मेथी के शर्ले

 


असंच स्क्रोल करतांना मेथी के शर्ले दिसले.

मेथीची भाजी उत्तर भारतात बटाटा बरोबर खातात हे माहिती होते.पण खास करून जे छोटे बटाटे असतात त्यांच्या बरोबर जालंधर मध्ये थंडीच्या दिवसात हा पदार्थ आवडीने खातात.


साहित्य 

एक जुडी निवडलेली मेथीची पान यात काड्या घ्यायच्या नाहीत.

तीन मोठे बटाटे 

आलं, लसूण,मिरची ,जिरे पेस्ट 

हिंग,धने पावडर,आवडीचा मसाला

एक वाटी डाळीचे पीठ 



कृती

१.मोठे बटाट्याच्या साल न काढता बारीकहून थोड्या मोठ्या फोडी करायच्या.

२.त्यात स्वच्छ केलेली मेथी व बाकीचे जिन्नस एकत्र करायचे.चवीनुसार मीठ टाकायचे.

३.या मेथी ,बटाट्याला पाणी सुटल्यावर एक वाटी डाळीचे पीठ टाकून मिक्स करायचे.

४.आता हे मिश्रण कापडावर छोट्या आकाराचे गोल वडे थापायचे.

५.चांगले खरपूस तळून घ्यायचे.

कालची थाळी पंजाबी मेथी के शर्ले आणि राजस्थानी दाल बट्टी यांचा समेट झाला :)

६.हिरवी पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर यायचे.





Sunday, October 6, 2024

भोंडला खेळू

 


सखे फेर धरू ...गरागर

जात्यावर दळण फिरे... गरागर


पीठाचे मांडे करू...भराभर 

चुलीसाठी सरपण शोधू ...भराभर


रानातून सरपण आणू... झरझरा 

अशी पावले टाकू...झरझरा


रानात गवत पसरले...दूरवर

मागे फिरू ,घर राहिले...दूरवर


घरी पिल्लांचा लाडिकपणा...मनभर 

चिमणीच्या चोचीत दाणा...मणभर


दाणे जवारीचे उडाले... घरभर

हस्ताची समृद्धी पसरू दे...घरदारावर


-भक्ती

(भोंडला लिहिण्याचा एक प्रयत्न)


Wednesday, October 2, 2024

पारनेर -४ कोरठण खंडोबा

 #कोरठण खंडोबा 




सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार!

नगर -पुणे सीमारेषेवरचे कोरठण खंडोबा,दरवेळी चकवा देत होतं.

मंदिर गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरच एक शिलालेख आहे.

पुणे येथील पुरातन शिलालेखांचे अभ्यासक रचपूत यांनी अभ्यास करून या शिलालेखाचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. त्यानुसार खंडोबाचे हे पुरातन देऊळ जावजी विश्वासरावांचा मुलगा कुमाजीराव यांनी माघ शुद्ध १५ शके १४९२, १० फेब्रुवारी १५७१ माघ पौर्णिमा प्रमोद संवस्तरे शुक्रवार मघा नक्षत्र व शोभल योग असताना हे बांधले.



श्री क्षेत्र कोरठण खंडोबा मंदिरातील गाभाऱ्याच्या प्रवेशदाराजवळ कोरलेला हा लेख अनेक वर्ष झाकला गेला होता. १९९४ मध्ये मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम चालू असताना हा लेख उजेडात आला. अनेक वर्ष झाकला गेला असल्याने लेख चांगल्या स्थितीत असला तरी पहील्या पाच ओळी पूर्ण वाचता येत नाहीत. शेवटच्या चार ओळी मात्र व्यवस्थित वाचता येतात. संपूर्ण लेख नऊ ओळीचा व खोदीव अक्षरांचा आहे.


लेखाचा मुख्य उद्‌देश कुमाजीरावांनी शके १४९२ मधे हे मंदिर बांधल्याची माहीती देणे हा आहे.


१ श्री गणेशाय नमः ०००००००००० पा ह ००० मरन्नी सुत ००० मा सुत २० गौड नायक इति थि तो सदा संमुख भी की तिं ॥१॥ तस्या


३ सा सुशीला ००० या ब्राह्मण पोळ ० स्य ना००० स्य निजाम पो वीरवास ० ४० दा ०० ता जना के ना दुर्जय किनीय०० चांदी ०००० बुची ० सीन ०० श्रीद्यानो १० या हि मु० सुमुस्तदीय सुरवात ००० के युगी क० मि ते प्रमेदिते माघे मासेसी तप ६ स्यां ०० दीने सीहगते शरीक ००० राज ००० ६ णा श्रीशके १४९२ प्रमोद स


७ वत्सरे माथ सुद्ध पौर्णमासी सुक्रवासरे मघा नक्षत्रे शोभन नाम योने ००० ८ र सुभदिने श्री जावजी विस्वासराव सुत कुमाजिराव खंडेरायाचे देए


९ तक केळे येणे सु०० श्री भवानि संकर सुप्रसनो भवतु ॥


जावजि विश्वासरावांचा मुलगा कुमाजिराव यांनी माघ शुद्ध १५ शके १४९२ प्रमोद संवत्सर शुकवार या दिवशी मघा नक्षत्र व शोभन योग असताना हे मंदिर बांधले.


लेखातील कालोल्लेख सुस्पष्ट व सविस्तर असून सहाव्या व सातव्या ओळीत शक संवत्सर महिना तिची वार नक्षत्र योग या कमाने दिलेला आहे.


माथ शुद्ध १५ शके १४९२ १० फेब्रुवारी १५७१, प्रमोद संवत्सर, शुक्रवार (१), मघा नक्षत्र, शोभन योग लेखात शुक्रवार असा उल्लेख येतो पण पिल्लेजंभीप्रमाणे या दिवशी शनिवार होता.


ओळ क. ३ मचे निजामाचा उल्लेख आहे. हा आलेख पहिल्या मुर्तजा निजामशहा या काळात अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता व पहिला मुर्तजा निजामशहाजादीवर होता.



(संदर्भ -कोरठण खंडोबा माहिती फलक)